बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

वर्ल्ड कप 2019: पाकिस्तानाची सेमीफायनलमध्ये घोडदौड होणार?

वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचं भवितव्य काय? हार-जीत आणि गणितीय समीकरणं यांच्या बळावर पाकिस्तान संघ सेमी फायनल गाठणार का?
 
क्रिकेट विश्वचषक २०१९ मध्ये बांग्लादेशला २८ धावांनी हरवून भारत उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा संघ बनला आहे. त्याचवेळी बांगलादेश स्पर्धेबाहेर पडलेला तिसरा आशियाई संघ बनला आहे.
 
यापूर्वी अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचं वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
 
बुधवारी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा तिसरा संघही निश्चित होईल. हा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंडदरम्यान होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणाऱ्याची अंतिम चार संघातील जागा पक्की होईल.
 
मात्र उपांत्य फेरीतील चौथा संघ कोणता असेल याचा निर्णय गुरूवारी पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्यानंतर होईल.
 
बांगलादेश यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर झाला असला तरी पाकिस्तानकडे अजूनही संधी आहे. पण सेमी फायनलमधला पाकिस्तानचा प्रवेश हा बहुतांशी न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामन्यावर अवलंबून आहे.
 
हा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंडसाठीही तितकाच महत्त्वाचा असेल. कारण या सामन्यात पराभूत झालेल्या संघाचा निर्णय पाकिस्तानच्या सामन्यावर अवलंबून असेल.
 
स्पर्धेतील प्राथमिक फेरीत भारताने पाकिस्तानला यापूर्वीच हरवलं आहे. पुढच्या फेरीत भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा आमनेसामने येतील का याची उत्सुकता साऱ्या जगभरात आहे. त्यामुळे न्यूझीलंड-इंग्लंड आणि पाकिस्तान-बांग्लादेश या सामन्यांकडे साऱ्या जगाचं लक्ष आहे.
 
परिस्थिती क्रमांक १ : न्यूझीलंड जिंकलं तर काय होईल ?
 
या सामन्यापूर्वी गुणतालिकेत न्यूझीलंड ११ तर इंग्लंड १० गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर विराजमान आहेत. म्हणजेच हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीतील तिसरा संघ बनेल हे नक्की.
 
पण पाकिस्तानला वाटत असेल की हा सामना न्यूझीलंडने जिंकावा कारण किवींच्या विजयामुळे इंग्लंडच्या खात्यात १० गुणच राहतील. त्यानंतर बांग्लादेशविरुद्धचा सामना जिंकून चौथा संघ बनणं पाकिस्तानसाठी सोपं होईल. पाकिस्तानचे सध्या ९ गुण असून बांग्लादेशविरुद्ध जिंकल्यानंतर त्यांचे ११ गुण होतील.
 
परिस्थिती क्रमांक २ : इंग्लंडचा विजय
हा सामना जर इंग्लंडने जिंकला तर न्यूझीलंडकडे ११ गुण राहतील. ही परिस्थिती पाकिस्तानसाठी अवघड ठरू शकते. अशा स्थितीत बांग्लादेशविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवणं त्यांना अनिवार्य असेल. त्यानंतरच पाकला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवता येऊ शकतो.
 
सध्या पाकिस्तानचा नेट रनरेट -०.७९२ आहे. तर न्यूझीलंडचा रनरेट ०.५७२ इतका आहे. दोघांमध्ये जवळपास एकचा फरक असून इतक्या अंतराने विजय मिळवणं ही पाकिस्तानसाठी तारेवरची कसरत असेल. रन रेटचा विचार केल्यास इंग्लडचा संघ १.००० रनरेटसह मजबूत स्थितीत आहे.
 
नेट रन रेटची मोजणी कशी होते ?
एखाद्या संघाचा नेट रनरेट मोजायचा असल्यास त्यासाठी खूपच सोपा फॉर्म्युला आहे.
 
संघाने जितक्या धावा बनवल्या आहेत त्याला खेळलेल्या ओव्हरने भागावं. दुसऱ्या शब्दांत याला पूर्ण स्पर्धेत एखाद्या संघाची प्रति ओव्हर बॅटिंगची सरासरी असं म्हणता येईल.
 
आता त्या संघाविरुद्ध प्रति ओव्हर किती धावा बनल्या आहेत ते काढावं, म्हणजेच बॉलिंगची सरासरी.
 
बॅटिंग सरासरीतून बॉलिंग सरासरी वजा केल्यास मिळतो तो नेट रनरेट.
 
प्राथमिक फेरीतील सामन्यात भलेही पाकिस्तानने न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांना मात दिली आहे. मात्र रनरेटचा विचार केल्यास याबाबत पाकिस्तान दोन्ही संघांपेक्षा खूपच मागे आहे. सद्य स्थितीत याबाबत पाकिस्तान मागे पडण्याचीच जास्त शक्यता आहे.
 
परिस्थिती क्रमांक ३ : पाऊस बिघडवेल पाकिस्तानचा खेळ
स्पर्धेत आतापर्यंत चार सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. प्राथमिक फेरीच्या सुरूवातीला श्रीलंकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. जर न्यूझीलंड-इंग्लंड सामन्यात पावसाने आपला खेळ दाखवल्यास त्याचा फटका पाकिस्तानला बसेल.
 
पावसामुळे हा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात येईल. अशा स्थितीत न्यूझीलंडचे १२ गुण होऊन ते आपोआप उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. तर इंग्लंडचे ११ गुण होतील. त्यानंतर इंग्लंडच्या पुढे जायचे असेल तर पाकिस्तानला बांगलादेशविरूद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल.
 
जर बांगलादेशविरूद्ध सामन्यात पावसाने आडकाठी घातली तर पाकिस्तान अलगदपणे विश्वचषक स्पर्धेबाहेर फेकला जाऊ शकतो. अशा स्थितीत रनरेटच्या आधारावर पाकिस्तान न खेळताच स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता आहे.