शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (00:30 IST)

पाकिस्तानी पत्रकार अर्शद शरीफ यांची केनियात गूढ हत्या

Arshad Sharif
पाकिस्तानी पत्रकार अर्शद शरीफ यांची केनियामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या पत्नीने सोमवारी (24 ऑक्टोबर) सकाळी ट्विटरवरून त्यांच्या मृत्यूची बातमी दिली.
 
त्यांच्या पत्नी जवारिया सिद्दीकी ट्वीटमधून सांगितलं की, "आज मी माझा मित्र, पती आणि आवडत्या पत्रकाराला गमावलंय."
 
जवारिया सिद्दीकी पुढे लिहितात की, "अर्शद शरीफची केनियात हत्या झाल्याचं पोलिसांकडून कळलं."
 
केनियातील पाकिस्तानी उच्चायुक्त स्थानिक अधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती मिळवत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते आसिम इफ्तिखार यांनी सांगितलं.
 
अर्शद शरीफ यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. एआरवाय न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, त्यांच्या चॅनेलशी संबंधित पत्रकार अर्शद शरीफ यांचा केनियामध्ये अपघाती मृत्यू झाला आहे.
 
एआरवायमध्ये काम करणाऱ्या अर्शद यांच्या सहकाऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. चॅनलचे मुख्य कार्यकारी सलमान इक्बाल, शरीफ यांच्या निधनावर आदरांजली वाहताना म्हणाले की, या घटनेवर त्यांचा विश्वास बसत नाहीये. व्यक्त होण्यासाठी त्यांच्या जवळ शब्द नाहीयेत.
 
एआरवाय न्यूज अँकर काशिफ अब्बासी यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "माझा भाऊ, मित्र, सहकारी अर्शद शरीफ यांची केनियामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. हे चुकीचं घडलं. हे दुःखद आहे. तुझ्यावर नेहमीच प्रेम राहील."
 
वादात सापडल्यावर पाकिस्तान सोडलं
अर्शद शरीफ त्यांच्या एका मुलाखतीमुळे वादात सापडले होते.
 
या वर्षीच्या ऑगस्टमध्ये शरीफ यांच्यासह एआरवाय डिजिटल नेटवर्कचे अध्यक्ष सीईओ सलमान इक्बाल, हेड ऑफ न्यूज कंटेंट अँड करंट अफेयर्स अम्माद युसूफ, अँकर खावर गुम्मन आणि एका प्रोड्युसरच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) नेते डॉ. शाहबाज गिल यांच्या मुलाखतीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 8 ऑगस्टला ब्रॉडकास्ट झालेली ही मुलाखत वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
 
या घटनेनंतर पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने चॅनेलचं 'नो ऑब्जेक्शन सर्टिफीकेट' रद्द केलं. एजन्सींकडून निगेटिव्ह रिपोर्ट मिळाल्यामुळे गृहमंत्रालयाने ही कारवाई केल्याचं म्हटलं गेलं.
 
मात्र, सिंध हायकोर्टाच्या आदेशानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.
 
पण या घटनेनंतर अर्शद शरीफ यांनी पाकिस्तान सोडलं.
 
अर्शद शरीफ हे लष्कराच्या जवळचे मानले जातात. इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागल्यानंतर शरीफ यांनी लष्करावर सडकून टीका केली होती.
 
पाकिस्तान सोडलेल्या शरीफ यांचा आणि न्यूज चॅनेल एआरवायचा काहीच संबंध नसल्याचं एआरवायने न्यूज चॅनेलने स्पष्ट केलं होतं. पण यामागे नेमकं कारण काय होतं याबाबत कंपनीने कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलं नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेली मतं कंपनीच्या धोरणांशी सुसंगत असावीत.
 
अर्शद शरीफ कोण आहेत?
अर्शद शरीफ यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1973 रोजी पाकिस्तानच्या कराची शहरात झाला होता.
 
त्यांचे वडील पाकिस्तानी नौदलात कमांडर होते.
 
इन्व्हेस्टीगेटिव्ह जर्नालिजम ही त्यांची खासियत होती.
 
23 मार्च 2022 रोजी पाकिस्तान सरकारने त्यांना प्राइड ऑफ परफॉर्मन्स या पुरस्काराने गौरवलं.