गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (00:26 IST)

विराट कोहली: फ्री हिटवर त्रिफळाचीत आणि 3 रन्स; काय आहे डेड बॉलचा नियम?

virat kohli
लाखभर चाहत्यांच्या साक्षीने विराट कोहलीने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी करत भारतीय संघाला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध थरारक विजय मिळवून दिला.
 
कोहलीच्या खेळीची जनमानसात, सोशल मीडियावर चर्चा असतानाच डेड बॉल थिअरी आणि विशिष्ट उंचीपेक्षा जास्त उंचावर बॉल टाकल्याने देण्यात आलेला नोबॉलही चर्चेत आहेत. पाकिस्तानचे चाहते पराभवाने नाराज आहेत, त्यांनी या दोन नियमांवर बोट ठेवलं आहे.
 
पाकिस्तानने दिलेल्या 160 या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 19व्या ओव्हरमध्ये 144/4 अशा स्थितीत होता. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता होती. बॉलर होता मोहम्मद नवाझ. डावखुऱ्या फिरकीपटू नवाझने विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांची ताकद लक्षात घेऊन मीडियम पेस अक्शनने बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिल्याच बॉलवर हार्दिकचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बाबर आझमच्या हातात जाऊन विसावला.
 
दुसऱ्या बॉलवर नवीन बॅट्समन दिनेश कार्तिकने एक धाव घेतली. तिसऱ्या बॉलवर कोहलीने यॉर्कर खणून काढत दोन धावा घेतल्या. उर्वरित 3 चेंडूत 13 धावांची आवश्यकता होती. समीकरण अवघड झालं होतं.
 
पुढचा चेंडू फुलटॉस मिळाला आणि कोहलीने लेगसाईडला सिक्स मारला. सिक्स मारताक्षणी कोहलीने स्क्वेअर लेग अंपायर्सच्या दिशेने हाईट नो संदर्भात विचारणा केली. रॉड टकर आणि मारएस इरॅसमस यांनी चर्चा केली आणि नोबॉलची खूण केली.
 
बॅट्समनच्या कंबरेपेक्षा अधिक उंचीवर बॉल पडल्यास नोबॉल देण्यात येतो. अंपायर्सनी नोबॉल दिल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि खेळाडूंनी अंपायर्सना यासंदर्भात विचारलं, नाराजी व्यक्त केली. पण अंपायर्स निर्णयावर ठाम राहिले. कोहली क्रीझच्या बाहेरून खेळत असल्यामुळे नोबॉल कसा अशी विचारणा पाकिस्तानच्या चाहत्यांनी केली.
 
या सिक्समुळे समीकरण 3 चेंडूत 6 असं झालं. नोबॉलमुळे पुढच्या चेंडूवर फ्री हिट मिळाली. पण नवाझचा पुढचा चेंडू वाईड देण्यात आला. त्यामुळे फ्री हिट लागू झाली नाही.
 
तांत्रिकदृष्ट्या नवाझने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर कोहली त्रिफळाचीत झाला पण फ्री हिट लागू असल्यामुळे कोहली आऊट झाला नाही. स्टंप्सचा वेध घेतल्यानंतर बॉल थर्डमॅन भागात गेला. कोहली-कार्तिक जोडीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत तीन धावा धावून काढल्या. फ्रीहिट लागू असलेल्या बॉलवर धावा मिळाल्याने त्यांची नोंद बाईज म्हणून करण्यात आली.
 
या बॉलनंतर डेड बॉलचा नियमावरून सोशल मीडियात उधाण आलं. कोहली त्रिफळाचीत असतानाही आऊट नाही आणि वरती तीन धावा त्याला आणि पर्यायाने भारताला कशा मिळाल्या यावरून उलटसुलट चर्चा रंगली.
 
आयसीसीच्या नियमानुसार
फ्री हिट लागू झालेल्या बॉलवर बॅट्समन आऊट झाला तर तो धाव घेऊ शकतो. बॅट्समन जेवढ्या धावा करेल त्यांची नोंद बॅट्समनच्या खात्यात करण्यात येते. बॅटला लागून आऊट होऊन बॉल अन्यत्र गेला तर बॅट्समनला धाव घेण्याची संधी नियमात आहे.
 
परंतु बॉल बॅटला न लागता बॅट्समन आऊट झाला तर नंतर त्याने काढलेल्या धावांची नोंद एक्स्ट्रामध्ये करण्यात येते. हाच नियम कोहलीच्या बाबतीत लागू झाला. त्या बॉलवर फ्री हिट लागू होती. कोहली त्रिफळाचीत झाला. यानंतर कोहली-कार्तिकने तीन धावा धावून काढल्या आणि अंपायर्सनी या धावांची नोंद बाईज म्हणून केली कारण बॉल कोहलीच्या बॅटला न लागता गेला होता.
 
आयसीसीच्या नियमात याबाबत पुरेशी स्पष्टता आहे.
 
नियम 20.1.1 अन्वये- बॉल डेड तेव्हाच होतो जेव्हा बॉल विकेटकीपर किंवा बॉलरच्या हातात जाऊन विसावतो आणि बॉलची हालचाल स्थिरावते.
 
नियम 20.1.1.2 अन्वये- बॉल बाऊंड्रीबाहेर गेल्यानंतर डेड समजला जातो.
 
नियम 20.1.1.3 अन्वये- बॅट्समन आऊट झाल्यानंतर तो बॉल डेड होतो. सोप्या शब्दात त्या बॉलवर पुढे काही होऊ शकत नाही, त्या बॉलचा प्रवास समाप्त होतो.
 
कोहलीच्या बाबतीत वरच्या तीन शक्यतांपैकी काहीच लागू होत नव्हतं. कोहली त्रिफळाचीत झाला पण त्या बॉलवर फ्री हिट लागू असल्याने त्याला नियमानुसार धाव घेण्याची संधी होती. कोहलीने या संधीचं सोनं करत तीन धावा काढल्या.
 
पाचव्या बॉलवर दिनेश कार्तिकला विकेटकीपर मोहम्मद रिझवानने स्टंपिग केलं. कार्तिकचा स्वीप करण्याचा प्रयत्न फसला. बॉल लेगसाईडच्या दिशेने गेला. रिझवानने शिताफीने बॉल टिपत बेल्स उडवल्या. कार्तिक आऊट झाल्यामुळे नवीन बॅट्समन मैदानात आला.
 
सहाव्या बॉलवर 2 धावांची आवश्यकता होती. नवाझने टाकलेला हा बॉल अंपायरने वाईड दिला. यामुळे भारतीय संघाला अतिरिक्त बॉल मिळाला आणि लक्ष्य एका धावेने कमी झालं.
 
सहाव्या बॉलवर अश्विनने तटवून काढत एक धाव घेतली आणि मैदानातील भारतीय चाहत्यांनी एकच जल्लोष झाला.
 
कोहलीवर कौतुकाचा वर्षाव
मॅचनंतर स्वतः विराट कोहलीनं म्हटलं की, ही माझ्या आयुष्यातली सर्वांत सुंदर रात्र आहे.
 
2007 च्या वर्ल्ड कपमध्ये सहा सिक्सर ठोकत क्रिकेट फॅन्सच्या आठवणीत कायमची जागा बनवलेल्या युवराज सिंगने म्हटलं, "किंग कोहली इज बॅक
 
युवराज सिंगने विराट कोहलीच्या खराब कामगिरीवर टीका करणाऱ्यांनाही प्रत्युत्तर दिलं होतं. या टीकाकारांपैकी काहींनी भारताच्या ट्वेंटी-20 टीममध्ये विराट कोहलीच्या समावेशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
 
सचिन तेंडुलकरनेही विराटच्या खेळीचं कौतुक करताना म्हटलं, "विराट, निःसंशयपणे ही तुझ्या आयुष्यातली सर्वांत सुंदर खेळी होती. तुला खेळताना पाहणं हा एक विलक्षण अनुभव होता."
 
विराटच्या खेळीनंतर त्याची पत्नी अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहिली. अनुष्काने लिहिलं, "सुंदर, खूपच सुंदर. आज तुम्ही लोकांच्या आयुष्यात इतका आनंद घेऊन आला आहात...तोसुद्धा दिवाळीच्या एक दिवस आधी!"
 
तिनं पुढं म्हटलं आहे की, "तू अतिशय भारी माणूस आहेस. मी आताच माझ्या आयुष्यातली सर्वांत सुंदर मॅच पाहिली. आपली आई का नाचतीये, ओरडतीये हे कळण्याइतकी आपली मुलगी अजून मोठी झाली नाहीये. पण एक दिवस तिला नक्की कळेल की, आपले वडील त्या रात्री त्यांच्या आयुष्यातील एक सुंदर इनिंग खेळले होते...तेही त्यांच्या आयुष्यातील एका कठीण टप्प्यानंतर.
 
मला तुझा अभिमान आहे. तुझ्यातली ऊर्जा संसर्गजन्य आहे. आयुष्यातील सगळ्या चढउतारात कायम तुझ्यावर प्रेम करत राहीन."