बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 28 जून 2021 (20:34 IST)

प्रेम सरोसे यांच्या व्हीडिओनंतर लोकांचे उद्धव ठाकरे यांना सवाल

प्राजक्ता पोळ
प्रेम सरोसे यांच्या व्हायरल व्हीडिओमुळे लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील प्रवासाचं दाहक वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे.
 
कल्याणला राहणाऱ्या प्रेम सरोसे या तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही विनंती केली आहे. प्रेम परळच्या एका खासगी कंपनीत काम करतात.
 
कल्याण ते परळ हा प्रवास करण्यासाठी बसला मोठमोठ्या रांगा असतात. तासन् तास रांगांमध्ये उभं राहावं लागतं. त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये सामान्यांना प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बीबीसी मराठीशी बोलताना केली आहे.
 
प्रेम सरोसे यांना रेल्वे विभागाने विना तिकीट फिरताना दंड ठोठावला. मग प्रेम यांनी उद्विग्न होऊन एक व्हीडिओ रेकॉर्ड केला.
 
हा व्हीडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतो आहे. त्यानंतर आम्ही प्रेम यांच्याशी बातचीत केली.
 

तरूणाचा व्हीडीओ व्हायरल

लॉकडाऊनमध्ये प्रेम सरोसे यांची नोकरी गेली. छोटी-मोठी कामं करून त्यांनी कसंतरी दीड वर्ष पोट भरलं. आठवडाभरापूर्वी प्रेम यांना परळला नोकरी मिळाली. त्यानंतर पहिल्या दिवशी कल्याण ते परळ हा प्रवास लोकल ट्रेनविना कसाबसा केला. मग दुसर्‍या दिवशी म्हणजे 26 जूनला लोकल ट्रेनने प्रवास केला.
 
सध्या लोकल ट्रेनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाच प्रवासाची परवानगी आहे. त्यामुळे प्रेम सरोसे यांना लोकल ट्रेनने प्रवास करताना परळ स्थानकात पकडलं. त्यावेळी प्रेम सरोसे यांनी एक सेल्फी व्हीडिओ रेकॉर्ड केला. यात ते म्हणाले, "मित्रांनो, मी आता परळ स्टेशनला आहे. माझ्याबरोबर टी.सी. आहेत. माझ्या नोकरीचा आजचा दुसराच दिवस आहे. मला यांनी लोकल ट्रेनने प्रवास करताना पकडलं आहे. यात यांची काहीच चूक नाहीये. हे सरकारी अधिकारी आहेत. ते त्यांचं काम करतायेत.
 
"माझ्या बँक खात्यात किती पैसे आहेत हे मी त्यांना दाखवलं आहे. माझ्या बँक खात्यात फक्त 400 रूपये आहेत. पण मी गुन्हा केलाय तर मी दंड भरणार आहे. पण मी हा व्हिडीओ यासाठी करतो आहे की, सरकारला कळावं, मी 35 हजार कमवणारा मुलगा दीड वर्ष घरी होतो. आज बँक खात्यात फक्त 400 रूपये आहेत. त्यात आमच्याकडून असा दंड वसूल केला जात आहे.
 
"शेकडो लोक आज ट्रेनमधून फिरतायेत. बस्सं झालं आता... कोव्हीड कोव्हीड... आता लोकल ट्रेन सुरू करा ही विनंती आहे. लोक जगणार कसे? अशी जगतील अन् उपाशी मरतील... " प्रेम सरोसे यांनी हा व्हीडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. मुंबईतल्या असंख्य लोकांनी प्रेम सरोसे यांना पाठिंबा दर्शविला आहे.
 

लोकल ट्रेन सुरू करा

प्रेम सरोसे यांचा व्हीडिओवर प्रतिक्रिया देताना तृप्ती गायकवाड म्हणतात, "खरंच योग्य व्हीडिओ समोर आला आहे. जे लोक सरकारी नोकरीत नाहीत त्यांनी कसं जगावं? लोकल प्रवास सुरू नसल्यामुळे दूर नोकरी करता येत नाही. सर्व पैसे आता संपले आहेत. सरकारने यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात."
 
र फक्त ट्रेनमधूनच कोरोना पसरतो का? राजकीय आंदोलनातून नाही का? असा प्रश्न संजय मोरे यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणतात, "राजकीय आंदोलनं, सभा, बाजारपेठेतील गर्दी हे सर्व व्यवस्थित सुरू आहे. फक्त खासगी ऑफीसमधले लोक लोकल ट्रेनमध्ये गेल्यावरच कोरोना पसरतो का? सरकारी अधिकारी गेल्यावर नाही पसरत का? यावर सरकारने लवकर तोडगा काढला पाहिजे. जर नाही काढला तर लोक उपाशी मरतील."
 
अपर्णा खालप म्हणतात, "बसमध्ये परवानगी आहे. मग ट्रेनमध्ये का नाही? फक्त लोकल ट्रेनमध्ये कोरोना पसरतो का? बसमधून नाही पसरत का? "
 

कोरोना कमी झाल्याशिवाय लोकल प्रवास नाहीच?

मुंबई ही लेव्हल-1 मध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लोकल ट्रेन सामान्य माणसांसाठी सुरू करणार नसल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं.
 
आता काही लोक विनापरवानगी लोकल प्रवास करत असल्यामुळे राज्य सरकार 'क्युआर कोड' ची पध्दत आणणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात राज्य सरकारने रेल्वेला पत्रही लिहिले आहे.असंख्य लोक विनातिकीट, बनावट ओळखपत्र दाखवून रेल्वेतून प्रवास करतात. त्याला आळा घालण्यासाठी क्युआर कोड पध्दत आणण्याचा राज्य सरकार विचार करत आहे.
 
प्रेम सरोसे यांच्या निमित्ताने मुंबईतील नोकरदार लोकांच्या प्रवासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्याच्या घडीला किमान एक लाख लोक लोकल ने प्रवास करताात. मात्र त्याचवेळी प्रेम यांच्यासारखे लाखो लोक लोकल सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नोकरी आणि प्रवास ही मुंबईतील दुहेरी कसरत कोरोनाच्या काळात आणखी बिकट होऊन बसली आहे.