मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 28 जून 2021 (19:03 IST)

कोरोना : मुंबईत 50 टक्के मुलांमध्ये कोव्हिड-19 विरोधी अँटी बॉडीज

मुंबईत 50 टक्के लहान मुलांमध्ये कोव्हिड-19 विरोधी अँटी बॉडीज (प्रतिपिंड) आढळून आल्या आहेत. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.
 
कोव्हिड-19 च्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्ग जास्त प्रमाणात होईल,अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत 'सीरो' सर्वेक्षण करण्यात आलं होतं.
 
पालिका अधिकारी सांगतात, यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणापेक्षा यावेळी मुलांमध्ये अँटी बॉडीज  जास्त प्रमाणात निर्माण झाल्याचं दिसून आलंय.
 
कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी मुंबई महापालिकेने 2 हजारपेक्षा जास्त बेड्सचं कोव्हिड रुग्णालय मुंबईतील मालाडमध्ये बांधलंय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (28 जून) ते महापालिकेला हस्तांतरित केलं.
 

मुंबई महापालिकेचं सर्वेक्षण

कोव्हिड-19 च्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त संसर्ग होण्याची शक्यता आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. त्यामुळे लहान मुलांमध्ये कोरोनासंसर्ग किती पसरलाय, हे जाणून घेण्यासाठी मुंबई महापालिकेने हे सिरो सर्वेक्षण केलं होतं.
 
51.8 टक्के लहान मुलांमध्ये प्रतिपिंड (अँटी बॉडीज ) तयार झाल्या आहेत.
 
10 ते 14 वर्षं वयोगटातील सर्वाधिक 53.43 मुलांमध्ये अँटी बॉडीज  आढळून आल्या.
 
1 ते 4 वर्षं वयोगटातील 51 टक्के बालकांमध्ये अँटी बॉडीज  तयार झालेल्या पाहायला मिळाल्या.
 
तर 5 ते 9 वर्षं वयोगटातील 47.33 टक्के मुलांमध्ये अँटी बॉडीज  होत्या.
 
15 ते 18 वर्षं वयाच्या 51 टक्के मुलांमध्ये कोव्हिडविरोधी अँटी बॉडीज  तयार झाल्या आहेत.
 

याबाबत बोलताना मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, "मार्च महिन्यात करण्यात आलेल्या अभ्यासात 39 टक्के मुलांमध्ये अँटी बॉडीज  तयार झाल्याचं आढळून आलं होतं. याचा अर्थ कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत 18 वर्षांपेक्षा लहान मुलं आणि बालकं कोव्हिड-19च्या संपर्कात आली होती."
 

केव्हा करण्यात आला सिरो सर्व्हे

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार,1 एप्रिल ते 15 जून दरम्यान हे सिरो सर्वेक्षण करण्यात आलं.
 
यासाठी 2,176 मुलांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते .
 
सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांतून हे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
 

सुरेश काकाणी पुढे सांगतात, "कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये जास्त संसर्ग पसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, सिरोसर्व्हे पाहाता असं लक्षात आलंय की, 50 टक्के मुलांना यापूर्वीच कोरोनाची बाधा झाली आहे किंवा ही मुलं विषाणूच्या संपर्कात आली आहेत."
 

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून, लहान मुलांमध्ये संसर्गाचं संक्रमण कमी करण्यासाठी आरोग्य शिक्षण, कोव्हिडच्या नियमांची जनजागृती करण्यात आल्याची माहिती, पालिकेने दिली आहे.