शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (15:54 IST)

वाराणसी : नरेंद्र मोदींविरोधात प्रियंका गांधींनी निवडणूक का लढवली नाही?

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये स्वतःला 'गंगापुत्र' म्हणवतात. तर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी फूलपूरमध्ये जातात तेव्हा 'गंगेची पुत्री' म्हणून त्यांचं स्वागत केलं जातं.
 
दोघेही निवडणूक प्रचार रॅलीमध्ये एकमेकांना लक्ष करतात. त्यामुळे हे दोघं एकमेकांविरोधात निवडणूक लढवतील, असे अंदाजही बांधले जात होते. मात्र, गुरुवारी काँग्रेसने वाराणसीतून आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आणि या सर्व शक्यतांना पूर्णविराम मिळाला.
 
पक्षाने नरेंद्र मोदींविरोधात प्रियंका गांधींऐवजी स्थानिक नेते आणि माजी आमदार अजय राय यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
प्रियंका गांधी यांनी मोदींविरोधात निवडणूक लढवावी, अशी पक्ष कार्यकर्त्यांचीही इच्छा होती. स्वतः प्रियंका यांनीदेखील या प्रश्नांना स्पष्टपणे नकार दिला नव्हता.
 
काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांनी प्रियंका गांधींना निवडणूक लढवण्याविषयी प्रश्न विचारला तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, "पक्षाची इच्छा असेल तर निवडणूक लढवेन."
 
निवडणूक प्रचारादरम्यान प्रियंका गांधी वाराणसीलाही गेल्या होत्या. तिथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं.
असं असूनदेखील पक्षाने त्यांना निवडणूक रिंगणात उतरवलेलं नाही. यामागे काय कारण असावं?
 
याचं उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार नवीन जोशी म्हणतात, "प्रियंका यांना उमेदवारी देण्याची चर्चा केवळ वातावरण तापवण्यासाठी होती. ती फार गंभीर चर्चा नव्हती. हे आधीच कळायला हवं होतं. "
 
"प्रियंका गांधी यांना निवडणुकीच्या राजकारणात उतरायचे असेल तर त्याची सुरुवात मोदींविरोधात निवडणूक लढवून करायची, अशी त्यांची इच्छा खचितच नसेल. त्या रायबरेलीतून निवडणूक लढतील, अशीही सुरुवातीला चर्चा होती आणि इथून संसदेत जाण्याचा मार्ग सोपा होता. वाराणासीतून नाही."
 
पूर्व उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 29 जागा आहेत. यातल्या 27 जागा भाजपच्या ताब्यात आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघही येतो.
मोदी विरोधापासून सुरुवात
सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर 23 जानेवारीला प्रियंका गांधी यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश झाला. त्यांना सरचिटणीसपद देण्यात आले आणि सोबतच पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली.
 
सक्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतरदेखील त्यांनी त्यांचं पहिलं भाषण मोदींचा गढ असलेल्या गुजरातमध्ये केलं. या भाषणात त्यांनी नरेंद्र मोदी यांनाच लक्ष केलं.
 
त्यांची सुरुवातच नरेंद्र मोदींच्या विरोधाने झाली. अशा परिस्थितीत पक्षाने त्यांना उमेदवारी का दिली नाही. यावर ज्येष्ठ पत्रकार जतीन गांधी म्हणतात, "भाषण आणि प्रतिक्रिया देणं, वेगळी गोष्ट आहे आणि निवडणूक लढणं वेगळी. निवडणूक लढण्यासाठी जमिनीवर कार्यकर्त्यांची कुमक लागते. वाराणसीमध्ये काँग्रेसजवळ कार्यकर्त्यांची ती फळी नाही."
 
सपा-बसप यांच्या झालेल्या आघाडीमुळेदेखील काँग्रेसने प्रियंका यांना निवडणूक मैदानात उतरवलं नाही, अशी मांडणीही ते करतात. ते म्हणतात, "समाजवादी पक्षाने सोमवारी शालिनी यादव यांची उमेदवारी जाहीर केली. त्याचदिवशी हे स्पष्ट झालं होतं."
 
"सुरुवातीला चर्चा होती की महाआघाडीतर्फे उमेदवार द्यायचा नाही. मात्र, महाआघाडी ही जागा काँग्रेससाठी सोडणार नाही, हे जेव्हा स्पष्ट झालं. तेव्हा अशी परिस्थिती उद्भवली की प्रियंका गांधींनी निवडणूक लढवली तर त्या केवळ पराभूत होणार नाहीत तर महाआघाडीचं पारडं जड असल्याने त्या दुसऱ्या स्थानावरही येण्याची शक्यता धूसर झाली."
प्रियंकाच्या येण्याने समिकरण बदललं असतं?
वाराणसीतून काँग्रेसने अजय राय यांना मैदानात उतरवलं आहे. तर महाआघाडीतर्फे समाजवादी पक्षाने शालिनी यादव यांना उमेदवारी दिली आहे.
 
2014मध्ये काँग्रेस, सपा, बसप यांच्याव्यतिरिक्त आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनीदेखील नरेंद्र मोदींना आव्हान दिलं होतं.
 
नरेंद्र मोदी यांना जवळपास 5.8 लाख मतं मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर असलेले केजरीवाल यांना 2 लाख तर तिसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे अजय राय यांना केवळ 75 हजार मतं मिळाली होती.
 
प्रियंका गांधी मैदानात उतरल्या असत्या तर हे समीकरण बदललं असतं का? ज्येष्ठ पत्रकार नवीन जोशी सांगतात, "प्रियंका यांना वाराणसीतून उमेदवारी मिळाली असती तर काँग्रेसला नक्कीच फायदा झाला असता. मात्र, विजय मिळाला नसता."
 
"प्रियंकांचा प्रभाव वाराणसीच्या आसपासच्या जौनपूर, मऊ आणि आजमगढ यासारख्या जागी दिसला असता. मात्र, या छोट्या फायद्यांसाठी पक्षाला प्रियंका गांधी यांच्या रुपात मोठी किंमत चुकवावी लागली असती."
 
ज्येष्ठ पत्रकार जतीन गांधी हेदेखील मान्य करतात की आपल्या भविष्यातल्या नेत्याची सुरुवात पराभवाने व्हावी, हे काँग्रेसलाही पटणार नाही.
 
ते म्हणतात, "प्रियंका पक्षाचा मोठा चेहरा आहे. त्या पक्षाचं भविष्य आहेत. त्यांचा चेहरा इंदिरा गांधींसारखा दिसतो. लोकांना त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. त्यामुळे सुरुवातीलाच त्यांचा पराभव व्हावा, हे पक्षाला कधीच मान्य होणार नाही."
 
जतिन गांधी यांच्या मते या निवडणुकीत प्रियंका यांच्यांमुळे पक्ष मजबूत झाला नाही तरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यात त्या नक्कीच यशस्वी ठरतील. याचा लाभ पक्षाला येणाऱ्या निवडणुकांमध्ये होईल.
 
परंपरा टिकवण्याचा प्रयत्न
भारतीय राजकारणात दिग्गज चेहऱ्यांसमोर दिग्गज उमेदवार उतरवण्याचाही इतिहास राहिला आहे. मात्र, बहुतेकवेळा कुठलाच पक्ष विरोधकांच्या दिग्गज नेत्याविरोधात आपला भक्कम उमेदवार देत नाही. मग ते श्यामा प्रसाद मुखर्जी असो किंवा अटल बिहारी वाजपेयी. काँग्रेस या नेत्यांविरोधात मजबूत उमेदवार देत नव्हती.
 
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आपल्या विरोधकांचाही आदर करायचे आणि त्यांनीही संसदेत यावं, अशी त्यांची इच्छा असायची. 1957 साली अटल बिहारी वाजपेयी यांचं संसदेतलं भाषण ऐकून ते म्हणाले होते, "हा तरुण एक दिवस भारताचा पंतप्रधान होईल."
 
हीच परंपरा काँग्रेसने कायम ठेवली आहे का? ज्येष्ठ पत्रकार नवीन जोशी सांगतात, "याला नेहरूंची परंपरा म्हणता येईल किंवा लोकशाहीची. मोठ्या नेत्यांना संसदेत बघणं, विरोधकांनाही आवडतं. त्यांच्या उपस्थितीमुळे लोकशाहीवादी चर्चेचा दर्जा सुधारतो."
 
"दोन दिग्गजांचा सामना व्हावा, अशी लोकांची इच्छा असू शकते. मात्र, उत्तम आणि मोठ्या नेत्यांनी संसदेत जायला हवं. त्यामुळे लोकशाही बळकट होते."

अभिमन्यू कुमार साहा