1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (17:11 IST)

पुतीन यांनी -14 डिग्री सेल्सिअस गोठलेल्या पाण्यात डुबकी मारली, कारण..

रशियाचे 68 वर्षांचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी (19 जानेवारी) उणे 14 डिग्री सेल्सिअस तापमानात राजधानी मॉस्को जवळ एक क्रॉस आकाराच्या पुलात डुबकी मारली.
 
गोठलेल्या पाण्यात डुबकी मारत असल्याचा पुतीन यांचा फोटो राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. पुतीन पुलापर्यंत शीपस्किन ओव्हरकोट घालून येतात. पण डुबकी मारताना ते फक्त अंतर्वस्त्रे घालतात.
 
हा व्हिडिओ रशियात टीव्हीवरही दाखवण्यात आला. पुतीन यांनी या गोठलेल्या पाण्याच्या पुलावर तीन वेळा डुबकी मारली. या पुलाच्या चहूबाजूंनी बर्फ जमा झाला आहे.
 
ही एक धार्मिक परंपरा आहे. पुतीन ख्रिश्चनांच्या एका पवित्र विधीचे पालन करत होते. या दिवसाला फिस्ट डे म्हणजेच एपिफनी म्हटले जाते. दरवर्षी एपिफनी दिवशी ख्रिश्चन धर्मियांमध्ये नदी किंवा सरोवरात डुबकी मारत येशू ख्रिस्ताची प्रार्थना करण्याची प्रथा आहे.
 
 
या डुबकीला पवित्र मानले जाते. पुतीन एका डाव्या विचारसरणीच्या राजवटीत मोठे झाले आहेत. पण राष्ट्राध्यक्षपदी असताना पुतीन धर्मनिष्ठ ख्रिश्चनाप्रमाणेच राहिले आहेत.
 
एपिफनीच्या निमित्तानं रशियातील लोक पारंपरिक पद्धतीने जवळच्या नदी किंवा तलावात जाऊन बर्फाळ पाण्यात डुबकी मारतात. एपिफनीच्या मध्यरात्री सर्व पाणी पवित्र होते असे मानले जाते. या पवित्र पाण्यात डुबकी घेऊन पापं धुतली जातात अशी धारणा आहे.
 
रशियातील प्रसार माध्यमांनी कायम राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची प्रतिमा धाडसी आणि रशियाला पाश्चिमात्य देशांपासून वाचवणारी अशी दाखवली आहे. पण आता माध्यमांनी पुतीन यांची प्रतिमा मसिहाच्या स्वरुपात दाखवण्यास सुरुवात केली आहे.
 
2018 मध्ये रशियातील सर्वात मोठे सरकारी चॅनेल रोसिया 1 वर एक डॉक्यूमेंट्री दाखवण्यात आली होती. ही डॉक्यूमेंट्री वलाम नावाच्या एका मठाशी संबंधित आहे. हा मठ उत्तरेकडील लादोगा सरोवरजवळील द्वीप स्थळी आहे.
 
हे पुतीन यांचे सर्वाधिक पसंतीचं ठिकाण मानले जाते. या डॉक्युमेंट्रीनुसार, पुतीन यांच्या नेतृत्त्वात सोवियत संघ सैन्य नास्तिकतेकडून पुन्हा एकदा धार्मिकतेच्या दिशेकडे वळवला गेला.