मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

आसाम-बिहार पूरः राहुल गांधींनी ट्वीट केलेले फोटो पूरग्रस्तांचे नाहीत?-फॅक्ट चेक

बिहार आणि आसामच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे शेकडो गावं पाण्याखाली गेली आहेत. या दोन्ही राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं.
 
एकट्या आसाम राज्यात पुरामुळे जवळपास 42 लाखांहून अधिक नागरिकांना फटका बसला. 180 हून अधिक मदत आणि बचाव केंद्रं स्थापन करावे लागले.
 
या राज्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सोशल मीडियावरून अनेकजण प्रार्थना करत आहेत आणि प्रार्थनापर मेसेजचे फोटोही शेअर करत आहेत.
 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही एक ट्वीट करून पूरग्रस्तांना मदती करण्याचं आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलंय, "आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरममध्ये पुरामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. या सर्व राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, सर्वसामान्य लोकांसाठी मदतकार्यात आणि बचावकार्यात तातडीने सहभागी व्हा."
या ट्वीटसोबत राहुल गांधींनी पुराचे काही फोटोही शेअर केले. मात्र हे फोटो काही वर्षं जुने असल्याचं आमच्या लक्षात आलं.
 
त्यापैकी एक फोटो 2015 सालचा आणि दुसरा फोटो 2016 सालचा आहे.
 
मात्र राहुल गांधी काही असे एकटे नाहीत, ज्यांनी पुराचे जुने फोटो आताचे समजून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
 
असे शेकडो फोटो आहेत, जे फेसबुकवरील मोठ्या-मोठ्या ग्रुप्सवर शेकडोवेळा शेअर केले आहेत किंवा शेकडो जणांनी ट्विटर आणि व्हॉट्सअपवरून पोस्ट केले आहेत. मात्र या सर्व फोटोंचा बिहार किंवा आसाममधील सद्यस्थितीशी 
 
काहीही संबंध नाही.
 
पहिला फोटो
एका वृद्ध व्यक्तीने चिमुकल्याला खांद्यावर घेतलं आहे. वृद्ध व्यक्ती अशी जागी आहे, जिथे त्याच्या नाकापर्यंत पाणी भरलं आहे. हा फोटो 2013 सालापासून पुराची तीव्रता दाखवण्यासाठी वापरला जात आहे.
 
रिव्हर्स इमेज सर्चमधून मिळालेल्या माहितीनुसार, 24 जून 2013 रोजी एका तमिळ ब्लॉगमध्ये हा फोटो वापरण्यात आला होता.
 
त्यानंतर चेन्नईच्या 'राऊंड टेबल इंडिया ट्रस्ट' नावाच्या एका संस्थेने 2015 साली आसाममधील पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करण्यासाठी याच फोटोचा वापर पोस्टरवर केला होता.
 
दुसरा फोटो
पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी चार मुलं घराच्या छपरावर बसलेले आहेत. हा फोटो 27 जुलै 2016 रोजी फोटो जर्नलिस्ट कुलेंदु कालिता यांनी काढला होता.
 
एका एजन्सीच्या माहितीनुसार, हा फोटो आसामच्या गुवाहाटीमधील कामरूप जिल्ह्यातील आहे.
 
2016 साली बह्मपुत्र नदीची पातळी वाढल्याने कामरूप जिल्ह्यातील दक्षिण-पश्चिम भाग पाण्याखाली गेला होता.
 
तिसरा फोटो
पाण्यात मृतावस्थेत पडलेल्या वाघाशेजारी होडीत वनविभागाचे कर्मचाऱ्यांचा हा फोटो जवळपास दोन वर्षं जुना आहे. मात्र हा फोटो यंदाचा असल्याचे सांगत सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
 
मात्र 18 ऑगस्ट 2017 रोजी AP फोटो एजन्सीचे फोटो जर्नलिस्ट उत्तम सायकिया यांनी काजीरंगा नॅशनल पार्कजवळ हा फोटो काढला होता.
 
आसाममधील पुरामुळे काजीरंगा नॅशनल पार्कमधील 225 प्राण्यांचा मृत्यू झाला, असं लिहून 2017 साली हा फोटो अनेक वृत्तपत्रांनी छापला होता.
 
काजीरंगा नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 2012 साली 793 आणि 2016 साली 503 प्राण्यांचा मृत्यू झाला होता.
 
चौथा फोटो
चहुबाजूंनी पाण्याने वेढलेल्या काही घरांचा आकाशातून काढलेला एक फोटो गेल्या काही दिवसांपासून #AssamFloods हॅशटॅगने शेकडोवेळा शेअर केला गेला आहे. मात्र हा फोटो आसाममधील नाही.
 
रिव्हर्स इमेज सर्चनुसार, बिहारमध्ये 2008 साली आलेल्या पुराचा हा फोटो आहे.
 
या फोटोचा 2008 साली वापर केलेला कोणता लेख किंवा बातमी इंटरनेटवर सापडली नाही. मात्र 2014 आणि 2015 साली प्रकाशित झालेल्या काही लेख आणि बातम्यांमध्ये हा फोटो वापरण्यात आला होता.