मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

राज ठाकरे-सोनिया गांधी भेट - विधानसभेसाठी काँग्रेस-मनसे आघाडीची नांदी?

EVM तसंच निवडणूक प्रक्रियेबद्दलच्या शंका व्यक्त करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. पण राज ठाकरेंचा दिल्ली दौरा हा केवळ या एका भेटीपुरता मर्यादित नव्हता.
 
राज ठाकरे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचीही भेट घेतली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राज यांनी थेट सोनिया गांधींची भेट घेतल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
 
निवडणूक आयोगामधील भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज यांनी निवडणूक आयोगावर आमचा कवडीचा भरवसा नाही असं स्पष्ट केलं. ही भेट म्हणजे विधानसभेची तयारी का, असा प्रश्न विचारल्यावर ही विधानसभेची तयारी आहेच पण त्याचवेळी मॅच फिक्स असेल तर तयारी तरी काय करायची असं ते म्हणाले.
 
मात्र त्यावेळी त्यांनी सोनिया गांधीसोबत भेट घेतली किंवा घेणार असल्याचा उल्लेखही केला नाही. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे, मात्र "यावेळी उभयतांत विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा झाली," असं मनसेच्या ट्विटर अकाऊंटवरून सांगण्यात आलं.
 
राज ठाकरे यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना आम्ही EVM संबंधी चर्चा केली, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असंच सांगितलं. पण राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर लोकसभा निवडणुकीपूर्वी आघाडी झाली नाही, म्हणून राज यांनी थेट हाय कमांडची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली का? हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.
 
याविषयी लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात, की सोनिया गांधी आणि राज ठाकरे यांची ही भेट केवळ सदिच्छा भेट असावी.
 
"लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाविरोधात राज ठाकरे यांनी प्रचार केला होता म्हणून त्यांनी सदिच्छा भेट घेतली असावी. पण एका मर्यादेच्या पलीकडे दोन्ही पक्षांनी सलगी केली तर मनसेच्या भूमिकेमुळे काँग्रेसवर परिणाम होऊ शकतो. काँग्रेसची विचारधारा सर्वसमावेशक असेल आणि ती बदलणारी नाही. त्यांच्या मुलभूत भूमिकेत बदल होऊ शकणार नाही. त्यामुळे भाजपाविरोध हा सामायिक धागा सोडला तर या भेटीत फारसे राजकारण नसावे," असं प्रधान यांना वाटतं.
 
ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके म्हणाले, "EVM वर संशय आणि लोकसभा निवडणुकीत जो धक्का बसला आहे, त्याचा दोष ते EVM ला देत आहेत. काँग्रेसची भूमिका EVMच्या बाबतीत संदिग्ध आहे. सर्व पक्ष आलटून पालटून EVMला दोष देत असतात. काँग्रेसने मात्र त्यावर कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. मुख्य विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची एक महत्त्वाची भूमिका आहे. राज ठाकरेंनी निवडणूक लढवली नाही तरी त्यांना धक्का बसला आहे. कारण सभांना गर्दी होती पण त्यांना मतं मिळाली नाही. त्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं आणि व्यापक आघाडी व्हावी हाही त्यामागचा हेतू आहेच."
 
या मुद्दयावर बोलताना काँग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, की "मला जिथपर्यत माहिती आहे, तिथपर्यंक त्यांच्या भेटीचा मुख्य मुद्दा EVM हा होता. त्यांनीही त्यांचा पुनरुच्चार केला. त्यात काही आणखी राजकीय बाबी असतील तर त्याची मला कल्पना नाही. तसंच मनसे आणि काँग्रेसच्या आघाडीबदद्ल ठोस असं काही अद्याप झालेलं नाही."