मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

भारत वि. न्यूझीलंड मॅच जिथे होत आहे ते मँचेस्टर आहे कसं?

- नितीन श्रीवास्तव
इंग्लंडचं मँचेस्टर शहर हे एकेकाळी सुती कपड्यांसाठी जगप्रसिद्ध होतं. 1853 साली मँचेस्टर आणि परिसरात सुती कपड्यांचे 107 कारखाने होते.
 
मँचेस्टर जवळच्या 40 मैल परिसरात प्रत्येक गावात सुती कपड्यांचा कमीत कमी एक कारखाना असल्याचं सांगितलं जायचं. त्यावेळी हे कारखाने चालवण्यासाठी भारताचंही महत्त्वाचं योगदान होतं. इथं लागणारा कापूस भारतातूनच पाठवला जायचा.
 
मँचेस्टरच्या सुती वस्त्रोद्योगाचा थेट संबंध भारताच्या कानपूर शहराशी होता. त्यामुळेच की काय कानपूरला त्यावेळी 'पूर्वेचं मँचेस्टर' म्हटलं जात असे.
 
सुती कपड्यांचे कारखाने मूलतः लँकेशायरमधून सुरू झाले. त्यानंतर ते न्यू इंग्लंडमध्ये पसरले. पुढे जाऊन ते अमेरिकेच्या दक्षिणेतील राज्यांपर्यंतही पोहोचले.
 
20 व्या शतकात उत्तर-पश्चिम इंग्लंडच्या वर्चस्वाला अमेरिकेनं संपवलं. त्यानंतर जपान आणि चीन यांचा क्रमांक लागतो.
 
वस्त्र कारखान्यांच्या अनेक इमारती शानदार होत्या. त्यातल्या अनेक इमारतींना आता आधुनिक स्वरूप देण्यात आलं आहे. काहींचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत.
 
सगळ्याच इमारती सुस्थितीत नाहीत. स्थानिक नागरिकांच्या मते कारखान्यांच्या इमारती चटकन नजरेत येत नाहीत.
 
चायना टाऊन
जगातल्या इतर अनेक कॉस्मोपॉलिटन शहरांप्रमाणेच मँचेस्टरमध्ये सुद्धा एक चायना टाऊन आहे. हा परिसर पोर्टलँड स्ट्रीटच्या उजव्या बाजूला वसलेला आहे. इथं संध्याकाळी चारपासून ते मध्यरात्रीपर्यंत प्रचंड गर्दी असते.
 
इथल्या छोट्या गल्लीत ब्रिटिश स्थापत्य कलेनुसार बनलेल्या इमारती आहेत. या इमारतींचे डिझाईन आजही जसेच्या तसे आहेत.
 
या परिसरात चायनीज रेस्टॉरंटच्या बेसमेंट आणि ग्राऊंड फ्लोअरवर तुम्हाला स्वादिष्ट जेवण अगदी माफक दरात मिळू शकतं.
 
विशेष म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला भारतीय थाळीचं चायनीज रुप पहायला मिळतं. नूडल्स, सूप, राईस किंवा इतर कोणताही पदार्थ तुम्हाला 15 पौंडांपर्यंत मिळू शकतो.
 
मी एका इंग्रजी जोडप्याला भेटलो. ते इथं मंद आचेवर भाजलेलं बदकाचं मांस खाण्यासाठी आले होते.
 
इथल्या दुकानाचे मालक चिनी आहेत. परिसरातलं भाडं वाढल्याची त्यांची तक्रार आहे.
 
एका रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या यांगने सांगितलं, "इथलं भाडं खूप वाढलं आहे. माझे मालक प्रत्येक आठवड्याला 3500 पौंड भाडं देतात. भाडं कमी असेल तरच आमचा नफा वाढेल."
 
चायना टाऊनपासून जवळच रूशोल्म करी माईल आहे. या ठिकाणी मिळणारं जेवण प्रेमी जोडप्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
 
जवळपास आठशे मीटर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा अरबी, तुर्की, लेबनीज आणि पाकिस्तानी पदार्थांचे गंध दरवळत असतात.
 
इथं तब्बल पन्नास रेस्टॉरंट आहेत. इथून तुम्ही जेवण पॅक करूनसुद्धा घेऊ शकता. इथे खूप दुरून लोक येतात. या परिसरात दक्षिण आशिया आणि अरब देशांतील अनेक नागरिकांचं वास्तव्य आहे.
 
जवळच एक भारतीय रेस्टॉरंटसुद्धा आहे. त्याचं नाव आहे जिया एशियन. हे हळूहळू लोकप्रिय होत आहे. 2018 च्या वर्षात याला सर्वोत्तम भारतीय रेस्टॉरंटचा पुरस्कार मिळाला आहे. केवळ भारतीयच नव्हे तर मध्य पूर्वेतील देशांचे लोकसुद्धा याठिकाणी येतात.
 
या हॉटेलचे मालक देवांग गोहिल यांनी याठिकाणी पोहोचण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला आहे. ते सांगतात, "हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर माझ्याकडे नोकरी किंवा पैसा यापैकी काहीही नव्हतं. मी हॉटेलांमध्ये भांडी धुतली. एका आठवड्यापर्यंत कारमध्ये झोपलो आणि पुन्हा झेप घेतली. हे इतकं सोपं नव्हतं. या रेस्टॉरंटचं नाव आता होतंय, याचा आनंद वाटतो."
 
उन्हाळ्यात 18 डिग्री तापमान
इंग्लंडमध्ये असाल तर सूर्यदर्शनाची आस, आपोआपच लागते. इथे उन्हाळ्यात तापमान 18 ते 24 डिग्री असतं. लोक सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी घराबाहेर पडतात.
 
पिकेडेली गार्डन म्हणजे शहराच्या मध्यातली एक मोकळी जागा आहे.
 
मँचेस्टरमधल्या गर्दीच्या बाजारपेठा तसंच नॉर्दर्न क्वार्टरच्या जवळच असलेलं पिकेडेली गार्डन ऐतिहासिक आहे. ते आधुनिक इमारतींनी घेरलेलं आहे.
 
पिकेडेली गार्डनजवळच्या चौकातच मँचेस्टर शहरातल्या हिरव्या आणि पिवळ्या ट्राम एकत्र येतात.
 
गार्डनच्या मध्यभागी उजव्या बाजूला कारंजे आहेत. याठिकाणी बच्चेकंपनी धमाल करताना दिसते.
 
क्रिकेट आणि मोफत प्रवास
मँचेस्टरमध्ये जगभरातून क्रिकेटप्रेमी दाखल होत आहेत. रेल्वेस्टेशनच्या बाहेर पडताच त्यांना सरप्राईज मिळतं.
 
पिवळ्या बसेसचा जत्था क्रिकेटप्रेमींची वाट पाहत आहे. त्यांच्या दरवाजांवर 'फ्री राईड अराऊंड द सिटी' असं लिहिण्यात आलं आहे.
 
मँचेस्टरच्या विद्यापीठात शिकणारे विद्यार्थीसुद्धा मोफत प्रवास करू शकतात. म्हणजेच क्रिकेटचा सर्वांना फायदा होत असल्याचं दिसून येत आहे.