वर्ल्ड कप 2019: ख्रिस गेल-युनिव्हर्स बॉसच्या वर्ल्ड कप वारीची भेसूर भैरवी
जगभरातल्या बॉलर्सची कत्तल करणाऱ्या ख्रिस गेलचा हा शेवटचा वर्ल्ड कप. विक्रमी पाचवा वर्ल्ड कप खेळणाऱ्या गेलला या वर्ल्ड कपमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
वनडे क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या मोजक्या 14 बॅट्समनच्या यादीत गेलचा समावेश होतो. अशी कामगिरी करणारा गेल हा वेस्ट इंडिजचा केवळ दुसरा खेळाडू आहे.
मात्र अनुभवी खेळाडू असूनही गेलला एकाही वर्ल्ड कपमध्ये नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली नाही. कार्ल हुपर, ब्रायन लारा, जेसन होल्डर आणि डॅरेन सॅमी यांच्या नेतृत्वाखाली गेल खेळला.
"मी जगातला सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. अर्थातच मी युनिव्हर्स बॉस आहे. यात बदल होणे नाही. जग सोडतानाही ही गोष्ट कायमस्वरुपी माझ्याबरोबर राहील",हे शब्द आहेत धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलचे. हा माझा शेवटचा वर्ल्ड कप असेल असं गेल म्हणाला होता.
अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये दावलत झाद्रानने वाईड लेंथचा बॉल टाकला. तो बॉल मैदानाबाहेर भिरकावून देण्यासाठी गेल सरसावला. मात्र हा प्रयत्न फसला आणि विकेटकीपर इक्रम अलिखिलने सोपा कॅच टिपला. 39 वर्षीय गेलला वर्ल्ड कपमध्ये पाहण्याची ही चाहत्यांची शेवटची संधी असेल.
50, 21, बॅटिंग केली नाही, 36, 0, 87, 6, 35, 7 -ही आहे गेलली यंदाच्या वर्ल्ड कपमधली आकडेवारी.
गेलची मात्रा चालली नाही आणि वेस्ट इंडिजसाठी हा वर्ल्ड कप दुस्वप्न ठरला. वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान या दोन संघांनी पात्रता फेरीचा अडथळा पार करत वर्ल्ड कपसाठी पात्र होण्याचा मान मिळवला. मात्र प्रत्यक्ष स्पर्धेत वेस्ट इंडिजला फक्त पाकिस्तानला नमवता आलं.
गेलचा हा पाचवा वर्ल्ड कप. मात्र कोणत्याही वारीत गेल वेस्ट इंडिजचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.
चार वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्ड कपमध्ये कॅनबेरा इथं झिम्बाब्वेविरुद्ध गेलने 215 धावांची विक्रमी खेळी केली होती. गेलने 10 चौकार आणि 16 षटकारांसह ही खेळी सजवली होती.
गेलची वर्ल्ड कपमधली कामगिरी
मॅचेस धावा सर्वोच्च अॅव्हरेज स्ट्राईक रेट शतकं/अर्धशतकं
35 1186 215 35.93 90.53 2/6