सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

वर्ल्ड कप 2019 मधली पडद्यामागची ही टीम इंडिया तुम्हाला माहितेय का?

- पराग फाटक
वर्ल्ड कप जिंकणं हे इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या प्रत्येक संघाचं उद्दिष्ट आहे. मैदानावर 15 खेळाडू दिसतात. मात्र त्यांच्याबरोबरीने एक समांतर टीम कार्यरत असते. ही माणसं प्रसिद्धीझोतात येत नाहीत. अनेकदा त्यांचं योगदान उपेक्षित राहतं. म्हणूनच या बॅकरुम टीम इंडियाचा घेतलेला हा आढावा.
 
रवी शास्त्री, हेड कोच
टीम इंडियाचे हेड कोच. प्लेइंग आणि नॉन प्लेइंग स्टाफचे बॉस. आंतरराष्ट्रीय टीम्सचे कोच हे मॅन मॅनेजमेंट बघतात. कोचिंग संदर्भातलं सर्वसमावेशक धोरण ते ठरवतात. टीम इंडिया कशा पॅटर्नचं क्रिकेट खेळणार हे हेड कोच ठरवतो. खेळाडूंच्या परफॉर्मन्सचा आढावा घेणं, त्यांची कामगिरी सुधारावी म्हणून मदत करणं, बेंच स्ट्रेंथ तयार करणं या जबाबदाऱ्या मुख्य प्रशिक्षक बघतात.
80 टेस्ट आणि 150 वनडेंचा अनुभव असलेल्या शास्त्री यांनी अष्टपैलू खेळाडू म्हणून छाप उमटवली. 1985 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट स्पर्धेत शास्त्री यांना प्लेयर ऑफ द सीरिज म्हणून गौरवण्यात आलं.
 
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सहा षटकार खेचण्याचा विक्रमही शास्त्री यांच्या नावावर आहे. निवृत्ती स्वीकारल्यानंतर दोन दशकं शास्त्री यांनी कॉमेंटेटर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगळी छाप उमटवली आहे.
 
संजय बांगर, बॅटिंग कोच
मूळचे बीडचे असलेले बांगर टीम इंडियाच्या बॅट्समनना मार्गदर्शन करतात. भारतासाठी खेळताना उत्तम कामगिरी. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रेल्वे संघाच्या दमदार वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका.
 
खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यावर कोचिंगमध्ये लक्ष घातलं. बांगर यांच्या अभ्यासाचा, सूचनांचा फायदा होत असल्याचं टीम इंडियाचे शिलेदार सांगतात. फलंदाजीचा कणा बळकट राखण्यात बांगर यांचा सिंहाचा वाटा आहे.
 
भरत अरुण, बॉलिंग कोच
वर्षानुवर्षं बॅटिंग हा भारतीय संघाचा कणा होता. बॅटिंगच्या बळावरच भारतीय संघाने अनेक शिखरं गाठली. मात्र गोलंदाजांच्या कामगिरीत सातत्य नव्हते. भारतीय संघाची गोलंदाजी बळकट करण्यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे भरत अरुण. बॉलर्सना त्यांच्या अॅक्शन तसंच वेगवेगळी अस्त्रं परजण्यात अरुण मदत करतात.
 
विशिष्ट बॅट्समनला रोखण्यासाठी डावपेच आखणीत ते मदत करतात. मोहम्मद शमीच्या बॉलिंगची धार वाढावी यासाठी त्यांनी त्याचा रनअप कमी केला. उमेश यादवला रिव्हर्स स्विंग करण्यासाठी मदत केली. रवीचंद्रन अश्विनला पडणाऱ्या अनेकविध प्रश्नांना ते उत्तरं देतात.
 
आर.श्रीधर, फिल्डिंग कोच
कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. आधुनिक क्रिकेटमध्ये फिल्डिंग हा महत्त्वपूर्ण पैलू मानला जातो. जेवढ्या रन्स वाचवल्या जातात त्या मॅच फिरवू शकतात. टीम इंडियाचं फिल्डिंग स्टँडर्ड सुधारण्यात श्रीधर यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
 
सरावादरम्यान फिल्डिंगची वेगवेगळी ड्रिल्स ते करून घेताना दिसतात. स्लिप कॅचिंग, टफ कॅचेस, डाईव्ह मारणं, स्लाईडिंग, रनआऊट्स ही सगळी कौशल्यं घोटीव करून घेतात.
 
शंकर बसू, ट्रेनर
दहा वर्षांपूर्वी दिल्लीचा खात्यापित्या घरचा मुलगा असं विराट कोहलीचं वर्णन केलं जात असे. मात्र आता जगातल्या सर्वोत्तम अॅथलिट्समध्ये कोहलीचं नाव घेतलं जातं. कोहलीला आणि पर्यायाने टीम इंडियाला फिट करणारं हे व्यक्तिमत्व.
 
खेळाडूंना परफॉर्मन्सच्या बरोबरीने सर्वांगीण फिट असणं आवश्यक आहे. हालचाली वेगवान व्हाव्यात यासाठी वजन नियंत्रणात असणं आवश्यक आहे. जिम कल्चर रुजवण्यात महत्त्वाचा वाटा. व्यायाम कोणता करावा, किती करावा, का करावा हे ठरवण्याचं काम शंकर करतात.
 
सुनील सुब्रमण्यम, मॅनेजर
स्थानिक क्रिकेटमध्ये तामिळनाडूचं प्रतिनिधित्व करताना दमदार कामगिरी. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनचे लहानपणीचे कोच. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन अकादमीचे प्रशिक्षकपद भूषवणाऱ्या सुनील यांच्याकडे मॅनेजरपदाची जबाबदारी आहे.
 
पॅट्रिक फरहार्ट, फिजिओ
खेळाडूंचं लाडकं व्यक्तिमत्व. फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव पॅट्रिक यांच्याकडे आहे. ऑस्ट्रेलियाच्या पॅट्रिक यांनी फिजिओथेरपी क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाबरोबर ते काम करत होते. दुखापतींचं व्यवस्थापन ही पॅट्रिक यांच्यावरची जबाबदारी.
 
टीम इंडिया सतत खेळत असते. साहजिक खेळाडूंना दुखापती होण्याची शक्यता सर्वाधिक. खेळाडूंना दुखापती होऊ नयेत म्हणून पॅट्रिक आखणी करतात.
 
दुखापत झाली तर त्या खेळाडूला लवकरात लवकर बरं करण्याचं काम पॅट्रिक बघतात. मैदानावर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर तिथे जाऊन उपचार करण्याची जबाबदारी पॅट्रिक यांच्यावरच आहे.
 
नुवान सेनेविरत्ने, थ्रोडाऊन स्पेशलिस्ट
2017 मध्ये श्रीलंकेच्या नुवानला टीम इंडियाने लेफ्ट आर्म बॉलरच्या शॉर्ट पिच थ्रोडाऊनसाठी ताफ्यात समाविष्ट केलं. डावखुरा बॉलरचा सामना करणं अवघड जाऊ नये यासाठी वेगात बॉल फेकणारा नुवान टीम इंडियाच्या बॅट्समनला बॉल टाकतो.
 
रघू,थ्रोडाऊन स्पेशलिस्ट
टीम इंडियाचा अनसंग हिरो. शॉर्ट पिच बॉल अर्थात बाऊन्सरचा सामना करण्यासाठी रोबोआर्म नावाचं मशीन वापरलं जातं. या मशीनच्या साह्याने बॅट्समनच्या दिशेने वेगात बॉल सोडला जातो.
 
सबकाँटिनंट पिचेवर बॉलला एवढी उसळी मिळत नाही, मात्र देशाबाहेर गेल्यानंतर शॉर्ट पिच बॉलचा सामना करताना अडचणी येतात. यावर उपाय म्हणून थ्रोडाऊनचा वापर केला जातो.
 
कर्नाटकतल्या कुमटा मधून रघू मुंबईला दाखल झाला. क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही मात्र त्याचं हे कौशल्य सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी टिपलं.
 
रघुमुळे मी १४०च्या स्पीडने येणाऱ्या बॉलचा सामना करू शकतो, असं विराटने सांगितलं. टीम इंडियाचा एकमेव फॉरेन बॉलर असं रघुबाबत धोनी गमतीने म्हणतो. रघु यांना विदेशी टीम्सकडून ऑफर्स येतात, मात्र टीम इंडियाच्या प्रेमापोटी त्यांनी सगळ्या प्रस्तावांना नकार दिला आहे.
 
अरुण कनाडे, मसाजर
अरूण आधी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाशी संलग्न होते. सतत खेळल्यानंतर शरीर थकतं. पुढच्या मॅचसाठी ऊर्जा गोळा करण्यासाठी शरीराला मसाजची आवश्यकता असते. मानेकाका उर्फ रमेश माने टीम इंडियाचं लाडकं व्यक्तिमत्व होतं. अरुण कनाडे या मांदियाळीतलं पुढचं नाव आहे.
 
हृषिकेश उपाध्याय, लॉजिस्टिक मॅनेजर
टीम इंडिया सतत प्रवास करत असते. या प्रवासाची आखणी तसंच एअरपोर्ट ते स्टेडियम, स्टेडियम ते हॉटेल, सराव सत्र कुठे होणार अशा अनेक गोष्टी सुरू असतात. त्या सगळ्याचं नियोजन लॉजिस्टिक मॅनेजरकडून केलं जातं. हृषिकेश ते लिलया करतात.  
 
धनंजय, व्हीडिओ अॅनलिस्ट
धनंजय हे व्हीडिओ अनॅलिस्ट आहेत. व्हीडिओच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंचा खेळाचा अभ्यास करून त्यानुसार डावपेच आखले जातात. अनेक खेळाडू स्वत:च्या खेळातील उणीवाही जाणून घेतात.
 
एखाद्या विशिष्ट खेळाडूसाठी डावपेच आखण्यासाठी व्हीडिओंचा वापर केला जातो. व्हीडिओंचा अभ्यास करून खेळाडूंना आवश्यक माहिती पुरवण्याचं काम धनंजय करतात.
 
मौलीन पारीख आणि राजल अरोरा, मीडिया मॅनेजर
हे दोघे माध्यम व्यवस्थापनाचं काम बघतात. टीम इंडियाचे अपडेट्स प्रेस रिलीजच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांना पोहोचवणं, प्रेस कॉन्फरन्सेस आयोजित करणं, अन्य मीडिया कमिटमेंट्स सांभाळण्याचं काम या दोघांतर्फे केलं जातं.
 
कोणत्याही मोठ्या स्पर्धेदरम्यान खेळाडूंना कठोर आचारसंहितेचं पालन करावं लागतं. माध्यम व्यवस्थापक खेळाडू, संघ यांच्याबद्दलची माहिती मीडियाला ते देतात. दुखापती, सराव सत्र, बदली खेळाडू याबरोबरच एखादा वाद उद्भवला असेल तर या दोघांतर्फे बाजू कळवली जाते.
 
या सपोर्ट स्टाफच्या बरोबरीने टीम इंडिया व्यवस्थापनाने चार नेट बॉलर्सना इंग्लंडमध्ये नेलं आहे. अवेश खान, दीपक चहर, नवदीप सैनी आणि खलील अहमद हे चौघंजण टीम इंडियाबरोबर आहेत.
 
वर्ल्ड कपसाठीच्या अधिकृत संघाचा ते भाग नाहीत, पण टीम इंडियाच्या सराव सत्रावेळी हे चौघं उपस्थित असतात. वर्ल्ड कपवेळी बरेच संघ असतात. नेटमध्ये फलंदाजांना सराव मिळावा यासाठी राखीव बॉलर्सची आवश्यकता असते. त्यादृष्टीने या चौघांना संघाबरोबर नेण्यात आलं आहे.