भारतीय क्रिकेट संघाची ओळखच 'मेन इन ब्लू'अशी आहे. याचं कारण म्हणजे टीमची निळ्या रंगाची जर्सी. निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटांमधल्या जर्सी घालूनच आतापर्यंत भारतीय संघ मैदानावर उतरला आहे.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये मात्र हे चित्र बदलू शकतं. वर्ल्ड कपमधील काही सामन्यात टीम इंडिया नारंगी रंगाच्या जर्सीमध्ये खेळू शकते.
बुधवारी भारतीय संघासाठीच्या पर्यायी जर्सीचं रंगरूप प्रदर्शित झालं आणि एका नवीनच वादाला तोंड फुटलं. जर्सीच्या रंगाच्या माध्यमातून आता टीम इंडियाचंही भगवीकरण होत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला भगव्या रंगात रंगविण्याचा प्रयत्न करत असल्याचा' आरोप केला.
"या देशाचा झेंडा तयार करणारी व्यक्ती ही मुसलमान होती. तुम्हाला जर टीमला कोणता रंग द्यायचा असेल देशाच्या झेंड्याचा द्या. ते आम्ही समजून घेऊ. पण प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही भगव्या रंगात रंगवत असाल तर ते चूक आहे. लोकांनी या गोष्टीचा विरोध करायला हवा," असं अबू आझमी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अबू आझमींचा आरोप फेटाळून लावला. 'भगवा रंग बौद्ध धर्मातील भिख्खुंच्या वस्त्राचा आहे, हा रंग शौर्याचा आणि विजयाचा आहे,' असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस पक्षाचे आमदार नसीम खान यांनीही अबू आझमी यांच्या या आरोपाला समर्थन दिलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी मात्र नसीम खान यांच्या वक्तव्याबद्दल राजकीय प्रतिक्रिया दिलेली नाही. टीमचा ड्रेस हा राजकीय विषय नाही आणि संघानं वर्ल्ड कप जिंकावा हीच माझी इच्छा आहे, असं आनंद शर्मा यांनी म्हटलं.
आनंद शर्मा यांनी नसीम खान यांचं वक्तव्यं हे पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचं सूचित केलं असलं तरी जर्सीवरून सुरू झालेला वाद शमला नाहीये. सोशल मीडियावरही जर्सीवरून उलटसुलट चर्चा रंगली आहे.
अनेकांनी टीम इंडिया जिंकणं ही महत्त्वाची गोष्ट आहे, जर्सीच्या रंगावरून काही फरक पडत नाही असं ट्वीट करून या वादात काही अर्थ नसल्याचं स्पष्ट केलं.
सोनम महाजन यांनी टीम इंडियाची ही जर्सी भारताच्याच T-20 टीमच्या जर्सीवरूनच तयार करण्यात आली आहे, असं म्हटलं. पण केवळ मोदी सत्तेत असल्यानं त्यावरून वाद सुरू झाला असल्याचंही त्यांनी म्हटलं.
भाजप नेते परेश रावल यांनी सोनम महाजन यांचं ट्वीट रिट्वीट केलं आहे. जे कोणी या जर्सीवर आक्षेप घेत आहेत, त्यांनी हेराफेरी 3 चं स्क्रीप्ट लिहावं, असंही परेश रावल यांनी म्हटलं.
काही ट्वीटर युजर्सनं जर्सीच्या रंगातला हा बदल फारसा गांभीर्यानं घेतला नाहीये आणि अनेक मजेदार ट्वीट्स केले आहेत.
वुई ब्लीड ब्लू
टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात नवीन जर्सी घालेल, अशी चर्चा सुरू आहे. याबद्दल बोलताना भारतीय संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक भारत अरुण यांनी सूचक विधान केलं आहे.
"आम्ही काय घालणार आहोत, हे महत्त्वाचं नाहीये. आम्ही सगळं लक्ष मॅचवर केंद्रित केलं आहे. वुई ब्लीड ब्लू. निळा रंग नेहमीच उठून दिसेल," असं भारत अरुण यांनी म्हटलं आहे.
काय आहे आयसीसीचं म्हणणं?
आयसीसीच्या सूत्रांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार BCCI ला रंगांचे पर्याय देण्यात आले होते आणि त्यांच्यादृष्टीनं आकर्षक दिसणारी रंगसंगती त्यांनी निवडली आहे. इंग्लंडचा संघही निळ्या रंगाचीच जर्सी घालतो. त्यामुळे टीम इंडियाच्या दुसऱ्या जर्सीचा रंग हा वेगळा असावा हादेखील त्यामागचा उद्देश होता.
या जर्सीचं डिझाइन हे भारताच्या T20 साठीच्या जुन्या जर्सीवरून घेण्यात आल्याचंही ICC नं म्हटलं आहे.