शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये मुकाबला न्यूझीलंडशी

प्राथमिक फेरीच्या शेवटच्या लढतींनंतर सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झालं असून, टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान असेल. 9 जुलैला, मंगळवारी ओल्ड ट्रॅफर्ड इथं ही लढत होईल.
 
प्राथमिक फेरीत भारत-न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द झाला होता. वर्ल्ड कपमधे या दोन संघांमध्ये 8 सामने झाले असून, न्यूझीलंडने 4 तर भारतीय संघाने 3 सामने जिंकले आहेत. एक सामना रद्द झाला आहे.
 
सेमी फायनलच्या दुसऱ्या लढतीत 11 जुलैला, गुरुवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड समोरासमोर असतील. बर्मिंगहॅम इथं ही लढत होईल.
 
शनिवारी झालेल्या लढतींमध्ये टीम इंडियाने रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या दमदार शतकी खेळींच्या बळावर श्रीलंकेचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला.
 
अन्य लढतीत, दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर दहा धावांनी मात केली. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा बॅटिंग करताना 325 धावांची मजल मारली. फॅफ डू प्लेसिसने शतकी खेळी केली तर व्हॅन डर डुसेने 95 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने 315 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 122 तर अॅलेक्स कॅरेने 85 धावांची खेळी केली.
 
1992 नंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेनं वर्ल्डकपमधे ऑस्ट्रेलियाला चीतपट करण्याची किमया केली.
 
टीम इंडियाने श्रीलंकेला हरवलं आणि दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला नमवल्यामुळे गुणतालिकेत भारतीय संघ 15 गुणांसह अव्वल ठरला. ऑस्ट्रेलियाचा संघ 14 गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला.