सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

'कुराणाच्या प्रती वाटायला सांगणं हा माझ्या मुलभूत अधिकाराचा भंग': रिचा भारती

- रवी प्रकाश
"फेसबुक पोस्टसाठी दुसऱ्या धर्माच्या (इस्लाम) केंद्रावर जाऊन कुराणाच्या प्रती वाटण्याच्या आदेशामुळे मी अस्वस्थ झाले आहे."
 
रांची विमेन्स कॉलेजची विद्यार्थिनी रिचा भारती उर्फ रिचा पटेल बीबीसीशी बोलत होती.
 
"मला फार वाईट वाटतंय मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करते मात्र उच्च न्यायालयात मला माझी बाजू मांडण्याचा अधिकारही आहे. माझ्या मुलभूत अधिकारांचा भंग कुणी कस करू शकतं? फेसबुकवर आपल्या धर्माबद्दल लिहिणं हा कोणता गुन्हा आहे? मी एक विद्यार्थिनी असूनही मला अचानक अटक झाली."
 
ती म्हणते, "ज्या पोस्टसाठी झारखंड पोलिसांनी मला अटक केली ती पोस्ट मी नरेंद्र मोदी फॅन्स क्लब नावाच्या एका ग्रुपवरून माझ्या फेसबुक पेजवर टाकली होती. त्यात इस्लामविरुद्ध काहीही नव्हतं. मला आतापर्यंत कोर्टाच्या निर्णयाची प्रत मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर कुराणाच्या प्रती वाटायच्या की या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात कोर्टात अपील करायचं याचा निर्णय घेईन."
 
रिचा पटेल कोण आहे?
रिचा पटेल पदवीच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. ती रांची शहरातील पिठोरिया या भागात आपल्या कुटुंबाबरोबर राहते. तिच्या विरोधात मुस्लीम संघटना अंजुमन इस्लामियाचे प्रमुख मन्सूर खलिफा यांनी पिठोरिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
 
रिचा पटेलच्या फेसबुक पोस्टमुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आहेत असं पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. यामुळे सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे असंही पुढे नमूद करण्यात आलं. त्यानंतर 12 जुलैला संध्याकाळी तिला अटक करण्यात आली.
 
रिचाच्या अटकेची माहिती मिळताच विविध हिंदू संघटनांनी पिठोरिया पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि रिचाच्या सुटकेची मागणी केली.
 
दुसऱ्या दिवशी रांचीमध्ये निदर्शनं झाली आणि अलबर्ट एक्का चौकात हनुमान चालीसा पठण करण्यात आलं ,तसंच 'जय श्रीरामच्या' घोषणाही देण्यात आल्या. या लोकांनी पोलिसांवर पक्षपाती कारवाई केल्याचा आरोप केला आणि रिचाची बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली.
 
जामीन म्हणून कुराणाच्या प्रती वाटण्याची अट
 
दरम्यान, दोन्ही पक्षांनी तडजोड केली आणि सोमवारी रांची सत्र न्यायालायात तिच्या जामिनाचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर सुनावणी करताना रांची सत्र न्यायालयाचे दंडाधिकारी मनीष कुमार सिंह यांनी कुराणाच्या पाच प्रती खरेदी करून अंजुमन कमिटी आणि पुस्तकालयात वाटण्याची अट रिचासमोर ठेवली.
 
त्याची पावतीही कोर्टात जमा करण्याचा आदेशही देण्यात आला. यादरम्यान ,पोलिसांनी रिचाला योग्य सुरक्षाव्यवस्था पुरवावी असा आदेशही कोर्टाने दिला आहे.
 
कुराणाची प्रत मिळाली नाही
या प्रकरणात रिचाविरुद्ध तक्रार करणाऱ्या मन्सूर खलीफानेही बीबीसीशी बातचीत केली. कोर्टाने ठेवलेल्या अटीनुसार रिचाने अजूनही कुराणाच्या प्रती वाटलेल्या नाहीत.
 
पोलिसात तक्रार केल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी आणि समाजातील काही लोकांनी तिचं वय लहान आहे, आणि भविष्याचा विचार करा असं म्हणत तडजोडीचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव आम्ही स्वीकारला. म्हणून तिला जामीन मिळणं सोपं झालं, असं त्यांनी म्हटलं.