शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (19:53 IST)

रस्ते अपघात आणि मजूर : ‘शंभर रूपये रोज आणि जेवायला खिचडी एवढ्यावरच ते राबतात’

अनघा पाठक
बीबीसी मराठी
जळगावहून पुढे रावेरचा रस्ता धरला की केळीच्या बागा दिसायला लागतात. हा भागच केळीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. शेजारी धुळे जिल्ह्यात पपईच्या बागा असतात.
 
"तुम्ही मुंबई पुण्यात गेलात आणि कोणी विचारलं खान्देशच्या कोणत्या भागातून तुम्ही आलात आणि तुम्ही रावेर सांगितलं तर समोरच्याचं ठरलेलं उत्तर असतं, अरे, मग तुम्हाला काय कमी! हा भाग सधन आहे तसा," जळगावमधले पत्रकार सचिन गोसावी मला रावेरला जाताना सांगत होते.
 
पण याच रावेर तालुक्यात अनेक आदिवासी गावंही येतात. याच गावांमधले मजूर केळी आणि पपयांच्या बागांमध्ये 100 रूपये रोजाने मजूरी करतात. सधन असणाऱ्या रावेर तालुक्यात बहुतांश जनता साध्या-साध्या सुविधांनी वंचित आहे हा इथला विरोधाभास.
 
याच जनतेपैकी काही मजुरांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या बातमीसाठी मी या भागात आले होते. चार दिवसांपूर्वी रावेर तालुक्यातल्या तीन गावांमधल्या पंधरा जणांचा पपया भरून घेऊन जाणारा ट्रक उलटल्यामुळे मृत्यू झाला. यात आभोडा गावातल्या दहा जणांचा समावेश आहे.
 
आभोडा गावात आल्यावरच दिसला तो इथल्या सुविधांचा अभाव. अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी इथे आल्याने गावावर शोककळा तर पसरली होतीच. आदल्या दिवशी संपूर्ण गावात चूल पेटली नव्हती. वाघ कुटुंबाच्या घरासमोर काही पुरुष मंडळी बसली होती. मधून मधून कोणी भावकीतलं भेटायला यायचं आणि आतून महिलांचे रडण्याचे आवाज यायचे.
 
पद्मावती वाघ यांच्यावर आभाळ कोसळलं होतं. त्यांचा मुलगा, सून आणि तीन वर्षांचा नातू या अपघातात मृत्यूमुखी पडले होते. आता त्यांच्या घरात फक्त 11 वर्षांचा नातू आणि त्या शिल्लक आहेत.
 
"गावात भीक मागून मागून लेकाला मोठं केलं आणि आता लेक, त्याची बायको आणि माझा नातू हातातून गेले. आता मी म्हातारीने काय करावं," त्या केविलवाण्या आवाजात विचारत होत्या.
 
पद्मवती बाईंच्या घरात दैन्य नजरेस पडत होतंच. आधीच्या खोपटाशेजारी घरकुल योजनेत त्यांना एक खोली बांधून मिळाली इतकीच त्यांची मिळकत.
 
माझ्याशी बोलताना त्यांनी संयम ठेवला खरा पण नातेवाईक महिला भेटायला आणि धान्य द्यायला आल्यानंतर त्यांचा बांध फुटला. नातवाची आठवण काढून रडायला लागल्या. "माझा हुशार नातू, सारखा माझ्याकडे खाऊ मागायचा. किती उंच होता. तो घरी येईल म्हणून मी वाट पाहात होते तर कापडात बांधूनच घरी आला."
 
बाहेर बसलेल्या पुरुषांचे अध्येमध्ये आवाज यायचे, कोणी आतमध्ये डोकावायचं. एवढ्याश्या खोलीत अंधार होता, त्यामुळे दारात आलेल्या प्रत्येकाला बाजूला व्हायला सांगावं लागायचं कारण प्रकाश अडत होता. घरात लाईटचा बल्ब दिसत असला तरी वीज नव्हती आणि जितका वेळ मी तिथे होती तोवर आलीही नाही.
 
लोक मध्येच तावातावाने बोलत गोंगाट करायचे, त्यांना ओरडून शांत बसा, मी रेकॉर्ड करतेय सांगवं लागायचं. कसंतरी वाटायचं! पद्मावती बाईंचा नातू समाधान भकास चेहऱ्याने बसला होता, त्याचा शॉट घेताना प्रचंड अपराधी वाटलं.
 
बाहेर पुरुषांच्या कोंडाळ्यात परत आवाज वाढला म्हणून बाहेर येऊन पाहिलं तर राजकीय नेत्यांवरून विषय चालला होता. कोणी काय केलं, कोणी काय केलं नाही, आपल्या वाटेल कधीच कसं काही येत नाही. ते ऐकताना वाटलं की गावातली राजकीय समीकरणं काही का असेना पण इथे जगणाऱ्या माणसांच्या जगण्याचा संघर्ष संपला नाहीये.
 
"या गावात, याच कशाला, आसपासच्या अनेक लहान लहान गावांमध्ये रोजगाराचं काही साधनच नाहीये," रावेरचे पत्रकार शालीक महाजन सांगत होते.
 
"थोडी फार शेती असली कोणाची तर असली, पण सगळी जमीन कोरडवाहू. त्यामुळे वर्षांतून आठ महिने रोजगाराचा प्रश्न यांच्यापुढे उभा असतो. म्हणून मग आपल्या कच्च्याबच्च्यांना पाठीशी घेऊन हे लोक चार-चार पाच-पाच दिवस केळीच्या नाहीतर पपईच्या बागेत राबायला जातात. तिथेच राहायचं. शंभर रूपये रोज आणि जेवायला खिचडी एवढ्यावर ते राबत असतात."
 
याच शंभर रूपयांपायी आमच्या गावातल्या दहा लोकांचा जीव गेलाय असं एका बाईने रडत रडत सांगितलं. तिचं नावही माहिती नाही मला. अशा अनेक जणी होत्या, भग्न चेहऱ्याने आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या मरणाचं दुःख पचवत होत्या.
 
दीपिका आणि खुशी तशाच दोन चिमुकल्या. काय घडलं याचा नीटसा अंदाज न येणाऱ्या. त्यांना इतकंच कळलं की त्यांची आई आता परत येणार नाही. त्याची आई, भाऊ आणि बहीण पपईच्या बागेत कामाला गेले होते, आणि येताना ट्रक उलटून जो अपघात झाला त्यात तिघांचाही जीव गेला. या मुलींचे वडील आधीच वारलेत. त्यामुळे आता या मुलींना म्हाताऱ्या आजीशिवाय कोणी नाही.
 
या मुलींशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना नीट बोलताही येत नव्हतं. बोलता येण्यासारखं त्यांचं वयही नव्हतं. खुशीच्या हातात रडणं थांबवण्यासाठी कोणीतरी दिलेलं वेफर्सचं पाच रूपयाचं पाकीट फक्त कुरकुर वाजत होतं.
 
'माणसं मेली तरी आम्हाला जावंच लागणार'
घरची माणसं गेल्याच्या सुतकातही या लोकांचे ट्रकवर जायचं वेळापत्रक ठरत होतं. कारण मजूरीला गेलं नाही तर खाणार काय?
 
"ज्या गोष्टीनी आमची माणसं मरतात, उद्या तीच गोष्ट करायला आम्हीही लेकरबाळं घेऊन जाणार आणि जात राहाणार. दुसरं आहेच काय इथे. काम केलं तर मरू न मरू, पण काम केलं नाही तर निश्चित उपाशी मरू. लहानाथोर सगळेच केळीच्या बागेत जातात. म्हातारी माणसंही हाडं मोडेस्तोवर काम करतात. आमच्या गावात कधी कुठली कंपनी येत नाही की सरकार रोजगार हमीचं काम आणत नाही. जंगलातली कामंही जेसीबी लावून करतात. आता मशिनच सगळी कामं करायला लागली तर माणसांनी कुठे जायचं आणि काय खायचं? एक बाई तळतळून विचारत होती.
 
केळीच्या बागेत मजूरी करणाऱ्यांचे प्रश्न प्रकाशात येत नाहीत, माध्यमंही त्याकडे लक्ष देत नाहीत, असं शालीक यांचं मत आहे. "उसतोड कामगारांचे प्रश्न गंभीर आहेत यात वाद नाही, पण त्यांची निदान दखल घेतली जाते. इथल्या मजूरांच्या वाटेला तेही नाहीये."
 
इथल्या डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासींना रोजगारासाठी फळबागांमध्ये काम करणं हा एकच पर्याय आहे. आभोड्याच्या पुढे उंचावर असणाऱ्या गावांमधून ही मंडळी खाली उतरून येतात.
 
मुकादम त्यांना ट्रकमध्ये बसवतो, आसपासच्या जिल्ह्यांमधल्या बागांमध्ये घेऊन जातो. तेव्हा हे ट्रक रिकामे असतात. पपया तोडून झाल्या की ते ट्रक पपयांनी लोड केले जातात. त्याच लोड झालेल्या, कधी कधी ओव्हरलोड झालेल्या ट्रकच्या टपावर हे मजूर बसतात आणि त्यांना परत आणून सोडतात.
 
तीन राज्यं, आदिवासी मजूर आणि सुरक्षेचा अभाव
अंकलेश्वर-बुऱ्हापूर या राज्यमार्गामुळे जोडली गेलेली गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश ही तीन राज्य या पट्ट्यात येतात. त्यामुळे इथे मालवाहतूक प्रचंड होते. इथला माल आसपासच्या राज्यांमध्ये जातो, तसंच तिथे काम करायला इथले मजूरही जातात. त्यांच्या दळणवळणाची दुसरी काहीच सोय नसते.
 
तीन-चार दिवसांत बाग तोडून झाली की हे मजूर ट्रक लोड करतात आणि रात्री परतीचा प्रवास सुरू करतात. दिवसभराच्या श्रमाने थकलेले हे लोक आहे त्या अवस्थेत झोपतात. गाडी माल खचाखच भरलेला असल्याने त्याच्यावर बसतात. असा प्रवास धोकादायक असतो.
 
किनगावजवळ झालेल्या अपघातात हीच परिस्थिती होती. ट्रकमध्ये लोड केलेल्या पपयांवर हे लोक बसले होते. त्यातच काहींना झोप लागली होती, अशात चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. अनेकांचे मृत्यू पपया अंगावर पडल्यामुळे झाले.
 
शालीक महाजन घटनास्थळी सर्वांत आधी पोहचणाऱ्या पत्रकारांपैकी एक होते. त्यांनी सांगितलं की रात्रीची वेळ असल्याने त्यांच्यापर्यंत मदतही लवकर पोहचू शकली नाही. रस्त्यावरच्या गाड्या थांबल्या नाहीत. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर जखमींसाठी रूग्णवाहिका आली. उशीर झाल्यामुळे अनेकांचा जीव वाचू शकला नाही.
 
दिलीप कांबळे जळगाव जिल्हा केळी कामगार युनियनचे नेते आहेत. त्यांनी माझ्याशी बोलताना सांगितलं की, "ट्रकमध्ये अनेकदा 10, 12, 15 टनाचा माल भरलेला असतो. त्यातच परत 20-25 मजूर असतात. अशा धोकादायक परिस्थिती ते प्रवास करतात. ही घटना मोठी आहे आणि यात अनेकांचा जीव गेला असला तरी ही पहिलीच घटना नाही. लहान मोठ्या प्रमाणावर अशा घटना घडत असतात. काही काळापूर्वी दोन मजूर असेच टपावर बसले होते तर ओव्हरहेड वायरचा शॉक लागून मेले. बरं, स्वतःच्या खर्चाने परत येणं या मजूरांना परवडण्यासारखं नसतं."
 
दैन्य आणि गरिबी इतकी पसरली आहे की हे मजूर म्हणूही शकत नाहीत की बाग तोडल्यानंतर व्यापाऱ्याने/बागायतदाराने आमची परत येण्याची व्यवस्था करावी. "असं म्हणालो तर आपल्याला काम मिळणार नाही अशी भीती त्यांना असते. शंभर रूपयासाठी ही सगळी कसरत असते," सचिन उत्तरतात.
 
नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक बँकेच्या अहवालात असं म्हटलंय की जगात सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात आणि त्यात दरवर्षी जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. या अहवालासंबंधी बोलताना केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी असंही म्हटलं होतं की रस्ते वाहतूक भारतासाठी कोव्हिड-19 च्या साथीपेक्षाही भयानक संकट आहे.
 
एरवी असे अनेक आकडे येतात, आपण दोन मिनिटं हळहळत बातमी बाजूला टाकतो, पण याच रस्ते अपघातांमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडतात त्याची गणना कशी करायची?