शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (19:00 IST)

काश्मीरः कट्टरवाद्यांचा काश्मीरमध्ये गोळीबार, तीन घटनांमध्ये 6 ठार

रियाज मसरूर
बीबीसी प्रतिनिधी, श्रीनगर
काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन पाकिस्तान समर्थित कट्टरवादी आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यात एक स्थानिक दुकानदारही जखमी झाला.
 
युरोपीय मुत्सद्द्यांचा गट काश्मीर दौऱ्यावर असताना ही घटना घडल्या आहेत.
 
दरम्यान एका हिंदू रेस्टॉरंटवर हल्ला करणाऱ्या तिघांना अटक केल्याचा दावा पोलिसांनी शुक्रवारी केला. मंगळवारी संध्याकाळी हा हल्ला झाला होता. यात रेस्टॉरंटचे मालक आकाश मेहरा जखमी झाले होते.
15 युरोपीय देशांच्या मुत्सद्द्यांचा गट श्रीनगरला पोहोचल्यानंतर काही वेळातच हा हल्ला करण्यात आला होता.
 
तर श्रीनगरपासून दक्षिणेकडे 60 किमी अंतरावर असलेल्या शोपियामध्ये शुक्रवारी सकाळी एक मोठी चकमक झडली. यात तीन स्थानिक शस्त्रास्त्रधारी कट्टरवाद्यांचा मृत्यू झाला.
 
जम्मू-काश्मीर पोलिसांचे आयजी प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलाच्या जवानांनी या अतिरेक्यांना शस्त्रास्त्र टाकून आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं होतं.
मात्र, अतिरेक्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर तिन्ही अतिरेकी लपून बसलेल्या घराला जवानांनी घेराव घातला.
 
प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार चकमकीत ठार झालेला एक अतिरेकी काही दिवसांपूर्वीच या संघटनेत सामिल झाला होता.
 
दुसरीकडे बडगाम जिल्ह्यातही एक चकमक झडली. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. यातल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
मोस्ट वाँटेड कट्टरवादी कमांडर युसुफ कंटरू सुरक्षा जवानांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र, तो जखमी झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
 
आयजी प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही रक्ताच्या डागांचा माग करत दुसऱ्या गावाला वेढा घातला."