मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (16:19 IST)

कोरोना व्हायरस : या 7 कारणांमुळे राज्यात वाढला कोरोनाचा संसर्ग

मयांक भागवत

मुंबई, पुणे आणि विदर्भातील काही जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरतोय. कोव्हिड-19 चा संसर्ग ग्रामीण भागात पसरत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढलीये.
 
कोरोनासंसर्गावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार विदर्भातील अमरावती, अकोला आणि यवतमाळमध्ये लॉकडाऊनचा विचार करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
तर, वाशिम आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईत गेल्या 12 फेब्रुवारीपासून 4,891 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झालीये.
 
कोरोनासंसर्ग वाढण्याची कारणं काय आहेत? हे आम्ही तज्ज्ञांशी बोलून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
1. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये शिथिल पडलेली सरकारी यंत्रणा
कोव्हिड-19 हा संसर्गजन्य आजार आहे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये झपाट्याने पसरणारा. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील लोकांच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महत्त्वाचं आहे.
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेकडून मोठ्या प्रमाणावर हायरिस्क व्यक्तींच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आलं होतं.
याबाबत IMA महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष आणि अमरावतीत वैद्यकीय सेवा देणारे जनरल फिजीशिअन डॉ. टी. सी. राठोड बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात, "कोरोना रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्टना ट्रेस करणं फार महत्त्वाचं आहे. पण, अमरावतीत सरकारी यंत्रणा यात शिथिल झाल्याचं दिसून आलं. हे रुग्ण वाढण्याचं एक प्रमुख कारण आहे."
 
अमरावतीमध्ये 12 फ्रेब्रूवारीपासून 3 हजार कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. तर, 18 फेब्रुवारीला अमरावती शहरात 542 रुग्ण आढळले. जिल्ह्यातील काही ठिकाणं कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहेत.
 
अमरावती जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी जमावबंदीचे आदेश जारी केलेत. तर, शनिवार संध्याकाळपासून सोमवार सकाळपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय.
 
"पूर्वी लोक सतर्क होते. नियम पाळायचे. मात्र आता लोक नियम पाळत नाहीत," हे देखील जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याचं कारण असल्याचं डॉ. राठोड सांगतात.
 
2. जोमात सुरू झालेले लग्न समारंभ
लॉकडाऊन उघडल्याने राज्यात मोठ्या संख्येने लग्न समारंभ होऊ लागलेत. लग्नात 50 लोकांना परवानगी असताना मोठ्या संख्येने लोकांची हजेरी दिसू लागली आहे.
 
तज्ज्ञांच्या मते, हे देखील कोरोनासंसर्ग पसरण्याचं एक प्रमुख कारण आहे.
 
राज्य सर्वेक्षण प्रमुख डॉ. प्रदीप आवटे सांगतात, "मराठवाडा, विदर्भात लग्न समारंभ पुन्हा जोमाने सुरू झालेत. कोव्हिड पूर्व काळासारखी गर्दी लग्नात पाहायला मिळत आहेत. हे टाळलं पाहिजे."
लग्न समारंभातील लोकांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीवर निर्बंध घालण्यासाठी मुंबईसह इतर जिल्ह्यात लग्न समारंभांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
 
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी बीबीसीशी बोलताना म्हणाले, "लग्न समारंभात 50 नातेवाईकांना परवानगी आहे. त्यापेक्षा जास्त लोक आढळून आले तर, कारवाई करण्यात येईल."
 
यवतमाळचे बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मानकर सांगतात, "लग्न समारंभात 500-1000 लोक येतात. मास्क न घालता फिरतात. नियमांच पालन केलं जात नाही. हे देखील एक प्रमुख कारण आहे."
 
"माझ्या शेजारच्या घरात जानेवारी महिन्यात लग्न होतं. लग्नानंतर काही दिवसातच मुलगी आणि तिच्याघरातील 2-3 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते," अशी माहीत बीबीसीशी बोलताना नाव न घेण्याच्या अटीवर एक डॉक्टरांनी दिली.
 
मुंबई महापालिकेने शहरातील मंगल कार्यालयांवर धाड टाकण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. लग्न समारंभाचे नियम मोडणारे आयोजक आणि व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
 
3. ग्रामपंचायत निवडणुका कोरोना वाढीसाठी कारणीभूत?
राज्यात जानेवारी महिन्यात 14 हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. निवडणुकीसाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला. लोक प्रचार, मतदान यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले.
 
राज्याचे मुख्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे ग्रामपंचायत निवडणुका रुग्णवाढीचं एक कारण असल्याचं सांगतात.
 
"शहरांमध्ये काम करणारे लोक मतदानासाठी ग्रामीण भागात गेले. प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. लोकांची सरमिसळ झाली. अमरावती, साताऱ्यातील ग्रामीण भागात काही पॉकेट्समध्ये कोरोनाच्या केसेस वाढलेल्या पाहायला मिळाल्या."
या भागात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या हे देखील महत्त्वाचा भाग असल्याचं डॉ. आवटे पुढे सांगतात.
 
इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर म्हणतात, "रुग्णसंख्या वाढण्याचं खापर फक्त लोकल ट्रेनवर फोडून चालणार नाही. राजकीय नेते, पुढारी यांचे कार्यक्रम, मोठ-मोठ्या रॅली होत आहेत. लोकांना कोव्हिड-19 बाबत भीती राहिली नाही. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात पालिका अयशस्वी ठरतेय," असे अनेक घटक रुग्णसंख्या वाढण्यासाठी कारणीभूत आहेत.
 
4. मास्क वापरण्यास टाळाटाळ
रस्त्यावरून चालताना अनेक लोकांचे मास्क हनुवटीवर, गळ्याभोवती लटकलेलं किंवा हातात असल्याचं पाहायला मिळतं. काही लोक मास्कशिवाय फिरताना आढळून येतात.
अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरिअल मेडिकल कॉलेजचे माजी अधीष्ठाता डॉ. पद्माकर सोमवंशी सांगतात, "मास्क लोकांच्या आणि समाजाच्या सुरक्षेसाठी आहे. पण, लोकांना बहुदा याचा विसर पडलाय. पोलीस कारवाई करतील म्हणून मास्क घालण्याची प्रवृत्ती दिसून येते. मास्क बचावासाठी आहे, अशी लोकांची वृत्ती दिसत नाही."
 
लोकांचा मास्क वापरण्याबाबत निरुस्ताह हेदेखिल रुग्णसंख्या वाढण्याचं एक कारण असल्याचं तज्ज्ञांच मत आहे.
 
अमरावती जिल्ह्यात 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालयं सुरू होणार होती. पण, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता कॉलेज उघडण्याबाबतचा निर्णय लांबवणीवर पडलाय.
 
मुंबई महापालिकेने लोकल ट्रेनमध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी 300 मार्शलची नियुक्ती केली आहे.
 
5. तापमानात झालेला बदल
गेल्याकाही दिवसांपासून राज्यात पुन्हा थंडी वाढली आहे. उत्तरभारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्यात अनेक जिल्ह्यात तापमान कमी झालेलं पाहायला मिळालं आहे.
महाराष्ट्राचे मुख्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात, "जेवढी थंडी हिवाळ्याच्या सुरूवातीला नव्हती, तेवढी थंडी आता पडतेय. वातावरणाचा एक लाभ या प्रसाराकरता होत आहे."
 
तज्ज्ञांच्या मते, शाळा, कॉलेज सुरू होत असताना शिक्षकांच्या टेस्ट करण्यात आल्या. यात काही लोक पॉझिटिव्ह आढळून आले.
 
6. आजाराबद्दल लोक गांभीर नाहीत
यवतमाळ जिल्ह्यात सद्यस्थितीत 692 कोरोनाचे अक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 465 रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झालाय. गेल्या 24 तासांत यवतमाळमध्ये 131 नवीन रुग्ण आढळून आले आहेत
 
यवतमाळमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मानकर सांगतात, "लोक आता बिनधास्त झाले आहेत. सोशल डिस्टंसिंग पाळलं जात नाही."
 
डॉ. राठोड पुढे सांगतात, "लोक पूर्वी सतर्कता पाळत होते. नियमांच पालन करत होते. आता परिस्थिती बदलली आहे. लोक नियम पाळताना दिसत नाहीत."
 
7. कोरोना नाही असा गैरसमज
कोरोनाबाबत लोकांमध्ये आजही अनेक गैरसमज आहेत. त्यातील एक प्रमुख म्हणजे, कोरोना खरा नाहीच.
 
डॉ. पद्माकर सोमवंशी म्हणतात, "कोरोना नाहीच, असा अपप्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय. यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरत आहेत. अशिक्षित लोक याला बळी पडतात."
 
तज्ज्ञ सांगतात, लोकांनी नियम पाळले नाहीत तर संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही.
 
नियम न पाळल्यास कडक निर्बंधांना सामोरं जावं लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच दिला आहे.