शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (19:12 IST)

पूजा चव्हाण प्रकरण : संजय राठोड गायब नाहीत, आजच मी त्यांच्याशी बोललो - अजित पवार

यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड गायब नाहीत, आजच मी त्यांच्यासोबत फोनवरून संवाद साधल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
 
अजित पवार माध्यमांशी बोलत होते.
 
यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड गायब आहेत, असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, "संजय राठोड गायब आहेत असं तुम्हाला कोणी सांगितलं? आजच मी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांना फोन करून सांगितलं की, या जिल्ह्यांमधील कोरोनाच्या बाबतीतली परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल."
 
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी अरुण राठोड नावाच्या तरुणाला ताब्यात घेतल्याची चर्चा आहे.
 
याविषयी विचारले असता अजित पवार म्हणाले, "मीसुद्धा याविषयी ऐकलं आहे. ही ऐकीव बातमी आहे. पण, माझं याविषयी पोलिसांबरोबर काही बोलणं झालेलं नाहीये."
 
संजय राठोड आज बोलणार?
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शिवसेना नेते संजय राठोड आज त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं जात आहे. आतापर्यंत तरी संजय राठोड यांनी अद्याप या प्रकरणावर भाष्य केलेलं नाहीये.
 
परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्यानंतर संजय राठोड यांचं नाव चर्चेत आलं आहे.
या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपमध्ये अरूण नावाचा एक तरुण महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यांशी संवाद साधताना दिसत असल्याचं माध्यमांमध्ये सांगण्यात आलं होतं. त्यानंतर भाजपनं याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर आरोप केले होते.
 
संजय राठोड आज (18 फेब्रुवारी) आपली बाजू मांडतील, असं पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी सांगितलं आहे. संजय राठोड यांना समर्थन देण्यासाठी यवतमाळमध्ये हालचालीही सुरू झाल्या आहेत. असं एबीपी माझानं वृत्त दिलं आहे.
 
याप्रकरणी विरोधी पक्ष भाजपनं शिवसेना नेते संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर लावून धरली आहे.
 
राजीनाम्याची चर्चा
महाविकास आघाडी सरकारमधील वन मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त टीव्ही नाईन या मराठी वृत्तवाहिनीने दिलं आहे. त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करण्याची मागणी केली.
 
राठोड यांनी मातोश्रीवर पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
"एकाने 'मारल्यासारख करायचं, दुसऱ्याने रडल्यासारख करायचं' असं होता कामा नये. तसंच राजीनामा दिल्यानंतर निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी," अशीसुद्धा त्यांनी मागणी केली आहे.
 
दुसरीकडे बीबीसी मराठीशी बोलताना संजय राऊत यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचं वृत्त फेटाळलं आहे.
 
"मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर यावर निर्णय होईल, मला कुठल्याही राजीनाम्याची माहिती नाही," असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्ररकरणावर बोलताना म्हटलंय, "पूजा चव्हाण प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल. त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. पण, गेले काही दिवस काही महिने लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे प्रकारही समोर आले आहेत. या प्रकरणात तसं काही होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे."