मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

नथुराम गोडसे वाद : RSSने महात्मा गांधींना मनापासून स्वीकारलं आहे का?

- श्रीकांत बंगाळे
"नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि देशभक्त राहतील. जे लोक त्यांना दहशतवादी म्हणतात, त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अशा लोकांना निवडणुकीत चोख उत्तर देऊ," असं साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटलं.
 
त्या भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत.
 
त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपनं आपण या विधानाशी सहमत नाही आणि साध्वी यांना माफी मागावी लागेल असं म्हटलं. त्यानंतर साध्वी यांनी माफी मागितली.
 
एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप महात्मा गांधींचं नाव दररोज घेताना दिसून येतात, त्यांना गांधीजी प्रात:स्मरणीय आहेत, असंही म्हटलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर गांधींजींचा आदर्श समोर ठेवून स्वच्छ भारत योजनाही सुरू केली आहे.
 
'संघानं गांधींना सोय म्हणून स्वीकारलं'
संघानं गांधींना सोय म्हणून स्वीकारलं, असं मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे मांडतात.
 
ते सांगतात, "संघाला ज्या दिवशी गांधी प्रात:स्मरणीय होतील, त्यादिवशी संघ, संघ राहणार नाही. याचं कारण संघानं गांधींची विचारसरणी जर स्वीकारली, तर ते हिंदू राष्ट्राचा आग्रह धरणार नाहीत. याचाच दुसरा अर्थ असा, संघानं केवळ दाखवायला म्हणून देखाव्यासाठी गांधींना प्रात:स्मरणीय केलं आहे. गांधींच्या खुनानंतर संघावर संशय होता आणि बंदीही घालण्यात आली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांनी गुरु गोळवलकर यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे म्हटलं आहे की, गांधींच्या खुनासाठी देशभरात जे विषारी वातावरण तयार करण्यात आलं, त्याला संघ जबाबदार आहे."
 
"संघानं गांधींना सोय म्हणून स्वीकारलं आहे. कारण गांधी मारूनही संपला नाही, हे त्यांना जाणवलं आहे. पण प्रज्ञा सिंह ठाकूरसारख्या दहशतवादाच्या आरोपीला तिकीट देऊन आपला गांधींवर विश्वास नाही, हेच भाजपनं सिद्ध केलं आहे," ते पुढे सांगतात.
 
"प्रज्ञा सिंह गोडसेला देशभक्त म्हणते, ही काही तिची अचानक आलेली प्रतिक्रिया नसते. हा संघाच्या व्यापक कटाचा एक भाग आहे. गोडसेबद्दलची राष्ट्रीय भावना संघ वेळोवेळी तपासत असतो. गोडसे हा दहशतवादी नाही, खूनी आहे ही चर्चाही त्याचाच भाग आहे. हिंदुराष्ट्रनिर्मितीसाठी वातावरण निर्मिती करण्याच्या संघ परिवाराच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे. त्यामुळे संघाला गोडसेविषयीच प्रेम आहे, गांधीविषयी नव्हे," असंही त्यांचं मत आहे.
 
'टीकाकारांनी प्रमाण द्यावं'
संघाची गांधीभक्ती खोटी आहे, असं म्हणणाऱ्यांनी या गोष्टीचं प्रमाण द्यावं, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचारप्रमुख प्रमोद बापट मांडतात.
 
ते सांगतात, "संघाची गांधीभक्ती खोटी आहे, संघाला नथुराम प्रिय आहे, असं काही मंडळी स्वत:च्या मनानंच म्हणत असतात. या गोष्टींचं त्यांनी कधीही प्रमाण दिलं नाही. ते कशाच्या बेसिसवर असं म्हणत आहे, हेही सांगत नाहीत. संघावर टीका जरूर करावी, पण ती प्रामाणिक असावी.
 
"संघाला गांधींबद्दल आदर आहे, हे पटवून देण्याची आम्हाला गरज वाटत नाही. संघाच्या मनात गांधींविषयी असलेली भावना ही कुणालातरी दाखवण्यासाठी नाही. आम्हाला जे वाटतं त्याआधारे आम्ही समाजात काम करतो, समाज त्याचा स्वीकार करतो. हे पुरेसं आहे. आम्ही समाजाला बांधील आहोत."
 
हिंदुराष्ट्र निर्मितीच्या उद्देशानं ही वक्तव्यं केली जात आहे, असं म्हटलं जात आहे, यावर ते सांगतात, "नथुराम गोडसेंबाबत ही विधानं राजकीय पक्षाची काही मंडळी करत आहेत. संघ करत आहे का? त्याचा जाब त्यांनाच विचारायला हवा. "
 
गांधी हत्या आणि संघ
महात्मा गांधी यांची हत्या झाली तो दिवस 30 जानेवारी 1948. तेव्हापासून आजपर्यंत एक प्रश्न सतत चर्चेत येतो तो म्हणजे गांधी यांची हत्या झाली त्या दिवशी नथुराम गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होता का?
 
नथुराम गोडसे आणि विनायक दामोदर सावरकर यांचे वंशज सत्याकी गोडसे यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला.
 
"सांगलीत असताना 1932 साली नथुराम यांनी संघपरिवारात प्रवेश केला होता. हयातीत असेपर्यंत ते संघाचे बौद्धिक कार्यवाह होते. त्यांनी कधीही संघाला सोडचिठ्ठी दिली नव्हती वा त्यांना संघातून बेदखल करण्यात आले नव्हते," असा दावा त्यांनी केला आहे.
 
'संघ आता गांधीवादी झाला आहे'
नथुराम गोडसे यांचे बंधू गोपाळ गोडसे यांनी 28 जानेवारी, 1994 रोजी फ्रंटलाइन मासिकाला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत सांगितलं होतं, "आम्ही सगळे भाऊ संघाचे कार्यकर्ते होतो. नथुराम, दत्तात्रेय, मी स्वतः आणि गोविंद. किंबहुना आम्ही घरात नाही तर संघातच लहानाचे मोठे झालो, वाढलो असेही तुम्ही म्हणू शकता.
 
"संघ हाच आमचा परिवार होता. नथुराम पुढे संघाचा बौद्धिक कार्यवाह म्हणून काम पाहू लागला. नथुरामने आपल्या चौकशीदरम्यान, संघ सोडल्याचे सांगितलं होतं. मात्र गांधीजींच्या हत्येनंतर गोळवलकर गुरूजी आणि संघ परिवार अडचणीत येऊ नये म्हणून त्याने हा जबाब नोंदवला होता. वास्तविक नथुरामने संघाला कधीही सोडचिठ्ठी दिली नव्हती."
 
हिंदू महासभेचे सध्याचे सरचिटणीस मुन्ना कुमार शर्मा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "आरएसएस अर्थात संघ आता गांधीवादी झाला आहे. त्यांना आता नथुरामची अडचण होत आहे."
 
त्याकाळी संघ आणि हिंदू महासभा फार वेगळ्या संघटना नव्हत्याच मुळी, असा दावाही शर्मा यांनी केला.