शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

मरियाना ट्रेंच: पॅसिफिक महासागरातील सर्वांत खोल ठिकाणीही आढळलं प्लास्टिक

प्लास्टिक प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस इतका घट्ट होत चालला आहे, की जगातील सर्वांत खोल अशा मरियाना गर्तेत (ट्रेंच) संशोधकांना प्लास्टिक आढळून आलं आहे. पॅसिफिक महासागरात असलेली मरियाना गर्ता ही जवळपास 11 किलोमीटर (7 मैल) खोल आहे.
 
अमेरिकन संशोधक व्हिक्टर व्हेस्कोवो समुद्रातील या सर्वाधिक खोल ठिकाणी उतरले होते.
 
मरियाना ट्रेंचचा तळ तपासण्यात त्यांनी कित्येक तास घालवले. समुद्रामध्ये इतक्या खोलवर निर्माण होणारा दबाव झेलण्यासाठी सक्षम अशा पाणबुडीसह ते मरियाना ट्रेंचमध्ये उतरले होते.
 
तिथं त्यांना काही सागरी जीव आढळून आले, पण त्याचबरोबर प्लास्टिकच्या पिशव्या आणि काही रॅपर्सही सापडले.
 
व्हिक्टर व्हेस्कोवो आणि त्यांच्या टीमला मरियाना ट्रेंचमध्ये समुद्री जीवांच्या चार नवीन प्रजाती आढळून आल्या. साधारणतः 7 ते 8 किलोमीटरच्या टप्प्यात या प्रजाती सापडल्या. पण त्याचबरोबर इतक्या दुर्गम ठिकाणीही पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपाच्या खुणा प्लास्टिकच्या रूपानं दिसून आल्या.
 
समुद्रामध्ये दरवर्षी हजारो टन प्लास्टिकचा कचरा वाहून येतो. पण त्यापैकी बऱ्याच कचऱ्याचं नेमकं होतं काय, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
 
संशोधक आता त्यांना नव्यानं सापडलेल्या सागरी जीवांमध्ये मायक्रोप्लास्टिकचा अंश आहे का, हे तपासण्याचा प्रयत्न करणार आहेत. कारण अलीकडच्या काळात अनेक सागरी जीवांच्या शरीरात सापडणारं प्लास्टिक ही मोठी समस्या बनली आहे.
 
मरियाना ट्रेंचमधील यापूर्वीच्या डाइव्ह
समुद्राच्या तळाशी एवढ्या खोलवर एखाद्या मनुष्यानं जाण्याची ही तिसरी वेळ आहे.
 
मरियाना ट्रेंचमध्ये पहिली डाइव्ह 1960 साली अमेरिकेच्या नौदलातील लेफ्टनंट डॉन वॉल्श आणि स्वीस इंजीनिअर जॅक पिकार्ड यांनी यशस्वीपणे पार पाडली.
 
त्यानंतर चित्रपट दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी 2012 मध्ये एकट्यानं मरियाना ट्रेंचमध्ये बुडी मारली होती.
 
व्हिक्टर व्हेस्कोवो आणि त्यांच्या टीमची मोहीम ही आधीच्या मोहिमांपेक्षा अधिक यशस्वी म्हणावी लागेल. कारण व्हेस्कोवो हे मरियाना ट्रेंचमध्ये जवळपास 10,927 मीटर खोलवर गेले.
 
व्हेस्कोवो आणि त्यांच्या टीमनं मरियाना ट्रेंचमध्ये एकूण पाचवेळा बुडी मारली. "आम्ही आता जे काही मिळवलं त्याचा आनंद शब्दात सांगू शकत नाहीत. आमची पाणबुडी आणि जहाजावरील अतिशय गुणवान कर्मचाऱ्यांनी मरिन टेक्नॉलॉजीमध्ये एक नवीन उंची गाठली आहे," असं व्हेस्कोवो यांनी म्हटलं.
 
इतर ठिकाणच्या सागरी मोहीमा
मरियाना ट्रेंचप्रमाणेच गेल्या सहा महिन्यांत अटलांटिक महासागरातील प्युर्तो रिको ट्रेंच (8,367 मीटर), साउथ सँडविच ट्रेंच (7,433 मीटर) त्याचप्रमाणे हिंदी महासागरातील जावा ट्रेंच (7, 192 मीटर) या ठिकाणीही मोहिमा हाती घेण्यात आल्या होत्या.
 
व्हिक्टर व्हेस्कोवो यांच्याच टीमनं या मोहिमा पार पाडल्या. आता या मोहिमांनंतरच त्यांचं पुढचं लक्ष्य हे आर्क्टिक महासागरातील 'मोलोय डीप' हे असेल. ऑगस्ट 2019 मध्ये 'मोलोय डीप'ची मोहीम पार पाडली जाईल. यासोबतच व्हेस्कोवो यांची जगातील पाच महासागरांमधील पाच खोल ठिकाणी डाइव्ह करण्याचा प्रकल्प पूर्ण होईल.