मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified गुरूवार, 16 मे 2019 (17:46 IST)

पश्चिम बंगालमधील राजकीय रणधुमाळीतून कुठे गायब झालेत डावे पक्ष?

पश्चिम बंगालमधील राजकीय रणधुमाळीतून कुठे गायब झालेत डावे पक्ष?
- जुबैर अहमद
 
बुधवारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) अर्थात सीपीएमनं अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराविरोधात मोर्चा काढला होता. मी मोर्चा सुरू व्हायच्या थोडा वेळ आधीच पोहोचलो. लोक जमायला सुरूवात झाली होती.
 
त्या मोर्चासाठी एक निवृत्त शिक्षिका आल्या होत्या. नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांनी बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर आपलं मत व्यक्त केलं. "हिंसाचाराचं सर्वच पक्ष राजकारण करत आहेत. भाजप स्वतःला असहाय्य दाखवून, तृणमूल काँग्रेस बंगाली संस्कृतीचं रक्षण करण्याच्या निमित्तानं तर डावी आघाडी हिंसाचाराचा विरोध करून या मुद्द्याचं राजकीय भांडवल करत आहेत."
 
वाढत्या गर्दीमध्ये ती वृद्ध शिक्षिका गायब झाली. मात्र ती जे बोलली त्यामध्ये तथ्य असल्याचं मला जाणवलं.
 
डाव्या पक्षाच्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले होते. बंगालमध्ये आपण आजही संघटनात्मक पातळीवर मजबूत आहोत हे दाखविण्याची सीपीएमसाठी ही एक संधी होती का? किंवा निवडणुकीच्या रणधुमाळीत आपलं अस्तित्त्व टिकून असल्याचं त्यांना लोकांना दाखवून द्यायचं होतं? डाव्या पक्षांना राज्यात पुन्हा संजीवनी देण्याचा हा एक प्रयत्न आहे का?
 
ममतांनी संपुष्टात आणली 34 वर्षांची राजवट
बंगालमध्ये राजकीय पातळीवर डाव्यांचं अस्तित्व संपुष्टात आलं आहे का, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. लाल झेंडे आता पूर्वीप्रमाणे फडकत नाहीत. लोक कॉम्रेड लेनिन आणि स्टॅलिनला विसरले आहेत. कार्यकर्त्यांची संख्याही प्रचंड घटली आहे.
 
डाव्यांनी बंगालमध्ये 34 वर्षें राज्य केलं. ममता बॅनर्जींनी 2011 साली विधानसभा निवडणुकीत डाव्यांना मात दिली. सीपीएमचा दारूण पराभव झाला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सीपीएमनं अवघ्या दोन जागा जिंकल्या होत्या. पक्षाच्या मतांची टक्केवारी घसरून 17 टक्क्यांवर आली.
 
डाव्या विचारधारेच्या नेत्यांना भेटण्यासाठी मी कोलकात्यातील सीपीएमच्या कार्यालयात पोहोचलो. कधीकाळी या कार्यालयात नेते, कार्यकर्ते, तक्रारकर्त्यांची रिघ लागलेली असायची. कार्यालयाच्या मोठ्या हॉलमध्ये राजकीय चर्चा आणि बैठका व्हायच्या. आता मात्र तिथं अगदी तुरळक वर्दळ होती. कार्यालयात शांतता होती. काही कर्मचारी काम करत होते, पण एकूणच त्या वातावरणात काहीच चैतन्य नव्हतं.
 
पक्षाचे कार्यकर्ते सांगतात, की राज्यात आमचा जोर ओसरलेला आहे, पण आमचं अस्तित्त्वच संपुष्टात आलंय असं नाही.
 
तरूणांचा सीपीएमला पाठिंबा
सीपीएमचा एक तरूण कार्यकर्ता सांगत होता, "आम्ही राज्यातून पार हद्दपारच झालोय, असं म्हणणं योग्य नाहीये. आमचं संख्याबळ घटलं आहे, पण राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आमची संघटना आजही अस्तित्त्वात आहे."
 
आमच्या पक्षात एक नवीन जोश संचारला असल्याचा दावाही त्यानं केला. "फेब्रुवारीमध्ये झालेल्या आमच्या पक्षाच्या सभा या मोदी आणि ममतांच्या सभांहूनही मोठ्या झाल्या होत्या."
 
आसनसोल शहरातून आलेल्या मीनाक्षी मुखर्जी डोक्यावर सीपीएमची लाल रंगाची टोपी घालून मोठ्या आत्मविश्वासानं सांगत होत्या, की तरूणांमध्ये पक्ष पुन्हा एकदा लोकप्रिय होत आहे.
 
"तरूण नेहमीच आमच्या पक्षासोबत राहिले होते आणि आजही ते आमच्या सोबत आहेत," मीनाक्षी मुखर्जी सांगत होत्या.
 
"आम्ही महागाई, बेरोजगारी आणि सांप्रदायिकतेविरुद्ध गेल्या दहा वर्षांत अनेकदा आंदोलन केलं होतं. आमच्या आंदोलनात लाखो लोक सहभागी झाले होते."
 
विकास रंजन भट्टाचार्यांचा शांत प्रचार
सीपीएमने बंगालमध्ये 42 पैकी 40 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्यापैकी एक आहेत विकास रंजन भट्टाचार्य. प्रचाराला जाण्यापूर्वी ते आपल्या कार्यालयात बसले होते. मात्र त्यांच्याकडे बघून हे उमेदवार आहेत असं वाटतच नव्हत. एखाद्या सर्वसाधारण कार्यकर्त्याप्रमाणे ते बसून होते. त्यांच्या आसपासही कोणी नव्हतं.
 
रंजन भट्टाचार्य आपल्या मोबाईलमध्ये ममता बॅनर्जींच्या सभेचे व्हीडिओ पाहण्यात गुंतले होते. त्यांच्या पाठीमागे लेनिनचं एक मोठ्ठं पेंटिंग टांगलेलं होतं. भट्टाचार्य यांचं सगळं लक्ष फोनमध्ये होतं.
 
विकास रंजन भट्टाचार्य हे जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत. फोनमधलं लक्ष काढून ते आपल्या दोनच सहकाऱ्यांसोबत गाडीत बसले आणि एका हाऊसिंग कॉलनीमध्ये प्रचारासाठी गेले.
 
ते घराघरात जाऊन लोकांशी संवाद साधत आहेत. प्रचारादरम्यान कोठेच माध्यमांचा गराडा नव्हता की घोषणाबाजी. अतिशय साधे कपडे आणि डोक्यावर पक्षाची टोपी चढवून ते सोसायटीतल्या लोकांच्या समस्या ऐकून घेत होते. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची मदत करण्याचं आश्वासन भट्टाचार्य यांनी दिलं.
 
विकास कोलकात्याचे महापौर होते. त्यांच्याविरोधात प्रसिद्ध टीव्ही स्टार आणि तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार मिमी चक्रवर्ती रिंगणात आहेत.
 
मिमीबद्दल ते सांगतात, "राजकारण ही गांभीर्यानं करण्याची गोष्ट आहे. ग्लॅमर विश्वातील लोकांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणं हा मतदारांचा अपमान आहे."
 
मात्र विकास नेमकं कोणाला आपला खरा विरोधक मानतात? या प्रश्नाचं उत्तर देताना ते सांगतात, "भाजप आणि तृणमूल दोघेही आमचे विरोधकच आहेत."
 
दोन्ही पक्ष आरएसएसनं लिहिलेल्या स्क्रीप्टनुसार काम करत आहेत. आरएसएस बंगालमध्ये समाजाची हिंदू आणि मुस्लिम अशी विभागणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आरएसएसला टीएमसीनंच राज्यात पाय पसरायला जागा दिली. आम्ही सत्तेवर होतो तेव्हा आरएसएसचा प्रभाव काही ठराविक भागापुरताच मर्यादित होता.
 
ममता बॅनर्जी आणि मिमी जेव्हा जाधवपूरमध्ये प्रचार करतात, तेव्हा डाव्या पक्षाच्या उमेदवाराचा उल्लेखही करत नाहीत. असं वाटत, की विकास यांना त्या गांभीर्याने घेत नाहीत. विश्लषेक सांगतात, की दशकभर सत्तेमधून बाहेर राहिल्यानंतरही सीपीएमने स्वतःला पुन्हा उभं करण्यासाठी विशेष प्रयत्नच केले नाहीत.
 
का झाली डाव्यांची पीछेहाट?
प्रोफेसर सब्यसाची बसु रॉय चौधरी रबीन्द्र भारती विद्यापीठाचे कुलपती आहेत. त्यांच्या मते सीपीएमच्या पुनरागमनाची वेळ अजून आली नाहीये.
 
ते सांगतात, "गेल्या आठ वर्षांत सीपीएम तरूण चेहऱ्यांना पुढे आणू शकली नाहीये. पक्षात अजूनही सूर्यकांत मिश्र आणि बिमान बोससारखे जुनेच लोक दिसतात. सुजान चकवर्ती पक्षाचा सर्वांत तरूण चेहरा आहे. त्यांचं वय आहे 60 वर्षं."
 
तरूणांना पक्षासोबत जोडून घेण्यासाठी 2015 पासून राज्यभर अभियान चालविण्यात येत आहे, असं पक्षाकडून तरी सांगितलं जातयं.
 
बिमान बोस पक्षाचे सर्वांत महत्त्वाचे नेते आहे. डाव्या पक्षांच्या शक्तिशाली पॉलिट ब्यूरोचे ते सदस्य आहेत.
 
पक्षाच्या आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणून सोशल मीडियावर आम्ही क्रियाशील झालो आहोत, तरूणांना जोडून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, असं बिमान बोस यांनी सांगितलं.
 
त्यांच्याशी खूप वेळ गप्पा मारल्यानंतर लक्षात आलं, की त्यांना अजूनही पक्षातील कमतरतांची जाणीव नाहीये. डाव्यांच्या अधोगतीचं खापर त्यांनी माध्यमांवर फोडलं. माध्यमांमधून केवळ उजव्या विचारांच्या पक्षांच्याच बातम्या दिल्या जातात आणि डाव्यांकडे दुर्लक्ष केलं जातं, असं त्यांचं मत होतं.
 
निवडणुकीच्या एकूण पद्धतीलाही त्यांनी दोष दिला. "2011 मध्ये जी निवडणूक आम्ही हरलो होतो, ती नीट निवडणूक होती. मात्र त्यानंतर कोणतीही निवडणूक योग्य पद्धतीने, निष्पक्षपणे पार पडली नाही. त्यामुळेच आम्ही हरलो."
 
या निवडणुकीत काय असेल चित्र?
गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षानं केवळ दोनच जागांवर विजय मिळवला होता. यावेळी 10 जागा मिळतील, असा पक्षाचा अंदाज आहे. मात्र अनेक तज्ज्ञ याच्याशी सहमत नाहीयेत.
 
शुभोजिच बागची हे 'द हिंदू' चे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत. सीपीएमच्या 10 जागा जिंकण्याच्या दाव्याबद्दल बोलताना ते म्हणतात, "2011 पासून पक्षाच्या मतांची टक्केवारी घसरतीये. या निवडणुकीत ती अजून कमी होईल." डाव्या पक्षांच्या पराभवामुळे बंगालच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली होती, जी भाजपनं भरून काढली असं बागची यांचं म्हणणं आहे.
 
सीपीएमला एकही जागा मिळणार नाही असं प्रोफेसर चौधरींचं म्हणणं आहे.
 
सीपीएमचं नेत्यांना मात्र तज्ज्ञांचे अंदाज मान्य नाहीयेत. बोस सांगतात, "यावेळी तज्ज्ञांचे अंदाज चुकतील. आमच्या जागाही वाढतील आणि मतांची टक्केवारीही."
 
मात्र हे तितकं सोपं नाहीये. कारण राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा पक्ष बनण्यासाठी सीपीएमची स्पर्धा भाजपसोबत आहे.