शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

बंगाल लोकसभा : अमित शहा यांच्या कोलकाता रोडशोमध्ये नेमकी का पडली ठिणगी?

कोलकात्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोला हिंसक वळण लागल्याने आधीच राजकीयदृष्ट्या तापलेल्या बंगालमध्ये ठिणगी पडली आहे.
 
शहा यांचा कोलकतामध्ये रोड शो सुरू होता. तेव्हा त्यांच्या ट्रकवर एकाने काठी भिरकावल्यानंतर दोन गटांमध्ये दगडफेक सुरू झाली. तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाल्याचं सांगितलं जातंय.
 
त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
 
"मेडिकल कॉलेजच्या आतून काही विद्यार्थी आले आणि त्यांनी आमच्या रोड शोवर हल्ला केला. पोलिसांनी त्यावेळी काहीच केलं नाही. रोड शो संपत आलाच होता, तेव्हा हा हल्ला करण्यात आला. पोलीस मूकदर्शक बनून पाहात होते," असं अमित शहा यांनी वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्सला फोनवरून सांगितलं.
 
तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचा आरोप आहे की भाजपनं जाणूनबुजून हिंसाचार घडवून आणला.
 
"शक्तिप्रदर्शन करण्यासाठी भाजपच्या लोकांनी हिंसाचार घडवून आणला. त्यानंतर पोलिसांना लाठीमार करावा लागला," असा आरोप तृणमूल काँग्रेसचे सचिव पार्थ चटर्जी यांनी केला आहे.
नक्की काय घडलं?
अमित शाह यांचा मंगळवारी कोलकात्यात रोड शो सुरू होता. तेव्हा तृणमूल विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. "अमित शाह गो बॅक," अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
 
घटनास्थळी उपस्थित असलेल्या बांगला दैनिकाचे वरिष्ठ पत्रकार सोमान सेन यांनी सांगितलं की, "विद्यासागर कॉलेजच्या गेटसमोर तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषदेचे शेकडो कार्यकर्ते अमित शाह यांच्या रोड शो आधीच जमा झाले होते. त्यांच्या हातात काळे झेंडे होते. पोलिसांनी त्यांना रोखून धरलं होतं.
 
"पण अमित शाह यांचा रोड शो कॉलेजसमोर येताच त्यांनी काळे झेंडे दाखवायला सुरुवात केली. त्यांनंतर शाह यांच्या गाडीवर दगड आणि काठ्या फेकण्यात आल्या. त्यावेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सामील होते," सेन यांनी सांगितलं.
 
त्यामुळे काही काळासाठी तिथे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
 
आरोप-प्रत्यारोप
'आजतक' या वृत्तवाहिनीशी बोलताना अमित शहा म्हणाले, "मला स्वामी विवेकानंद यांच्या घरी जाण्यापासून रोखण्यात आलं. शांतेतत आमचा रोड शो सुरू होता, पण त्यांनी जाळपोळ आणि गोंधळ केला."
 
भाजपने बाहेरून गुंड बोलवून तणाव निर्माण केला आणि हिंसाचार घडवला, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. जवळच्या विद्यासागर कॉलेजमध्ये कथितरीत्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीचा त्यांनी निषेध केला आहे.
 
दुसऱ्या बाजूला अमित शहा यांच्या रोड शोमध्ये अडथळा आणण्यासाठी तृणमूलनं हे कारस्थान घडवून आणलं आहे, असं भाजपचं म्हणणं आहे. "माझे देशभरात कार्यक्रम होत आहेत, फक्त पश्चिम बंगालमध्येच हिंसाचार का होतो? ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष यामागे आहे," असंही अमित शाह एका वाहिनीवर बोलताना म्हणाले.
 
या रोड शोच्या मुद्द्यावरून आधीपासूनच तणाव आणि आरोप-प्रत्यारोप होत होते. रोड शोच्या दोन तास आधी पोलिसांनी लेनिन सरणी या रस्त्यावरून, जिथे भाजपचा रोड शो होणार होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि कोलकाता उत्तरचे भाजप उमेदवार राहुल सिन्हा यांचे बॅनर, झेंडे आणि कटआऊट काढून टाकले होते.
 
पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांनी निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून कटआऊट आणि बॅनर काढले होते. विनापरवानगी हे बॅनर राज्यातल्या सार्वजनिक ठिकाणी लावले होते, असं ते म्हणाले.
 
पण भाजपने आरोप केलाय की पोलिसांच्या आड लपून तृणमूल काँग्रेसच्या लोकांनीच हे कृत्य घडवून आणलं आहे. याच्या विरोधात भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी काही काळासाठी धर्मतल्ला भागात धरणे आंदोलनही केलं.
 
"निवडणूक आयोगानं शहा यांच्या रोड शोसाठी परवानगी दिली होती. तरीही तृणमूल सरकारने आम्हाला रस्त्यांवर झेंडे आणि बॅनर लावू दिले नाहीत. आम्ही निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करू," असं भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यावेळी म्हणाले.
 
'हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा'
 
अमित शहांनी सांगितलं होतं की, "मी मंगळवारी कोलकात्याला येतोय आणि 'जय श्रीराम'च्या घोषण देईन. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करून दाखवावी."
 
"सोन्यासारख्या बंगालला ममता बॅनर्जी सरकारने कंगाल केलं," अशी टीका त्यांनी यावेळी केली.
 
तृणमूल काँग्रसचे राष्ट्रीय प्रवक्ता डेरेक ओ'ब्रायन यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना म्हटलं, "'कंगाल बंगाल'सारखं वक्तव्य करून शहांनी आपल्या घाणेरड्या मानसिकतेचा परिचय करून दिला आहे. अशा मानसिकतेला लोक आता त्यांच्या मतांमधूनच उत्तर देतील."
 
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी यावेळी ट्वीट करून म्हटलं, "बंगालमध्ये गुंडांचं सरकार आलंय का? अमित शहांच्या शांततापूर्ण रॅलीवर तृणमूलने केलेला हल्ला निंदनीय आहे. बंगालमध्ये स्वतंत्र आणि निष्पक्ष मतदान शक्य आहे का? आता निवडणूक आयोगानेच काहीतरी करावं."
 
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर ANI वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, "ममता बॅनर्जी यांना आता आपल्या पराभवाची भीती वाटतेय, म्हणून त्या लोकशाहीचा गळा घोटत आहेत, त्या कुणाला बंगालमध्ये आता प्रचारही करू देत नाही आहेत. निवडणूक आयोगाने लक्ष घालावं."