रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मे 2019 (13:43 IST)

Modilie: असा कोणताही शब्द अस्तित्वात नाही, ऑक्सफर्डचं स्पष्टीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे डिक्शनरीमध्ये एका शब्दाची भर पडली आहे असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. त्यांचा हा दावा अयोग्य असल्याचं स्पष्टीकरण ऑक्सफर्ड डिक्शनरीने दिलं आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने खोटं बोलतात त्यामुळे Modilie हा शब्द डिक्शनरीत टाकण्यात आला आहे. असं राहुल म्हणाले होते. सतत खोटं बोलणं, न थकता खोटं बोलण्याला Modilie असं म्हणतात हे राहुल यांनी म्हटलं होतं.
 
त्यांच्या म्हणण्याचं समर्थन करताना त्यांनी एक स्क्रीनशॉटही टाकला होता. त्या स्क्रीनशॉटमध्ये Modilie (मोदीलाय) या शब्दाचा अर्थ सांगण्यात आला आहे. हा स्क्रीनशॉट पाहिला तर असं वाटतं की हा ऑक्सफर्ड लिव्हिंग डिक्शनरीचा आहे पण जर ऑक्सफर्डच्या डिक्शनरीत आपण सर्च केलं तर तसा कोणताही शब्द आपल्याला सापडत नाही.
 
त्यांच्या या ट्वीटला ऑक्सफर्डच्या ऑफिशिएल ट्विटर हॅंडलने उत्तर देत म्हटलं आहे की आम्ही खात्रीनं सांगू शकतो की असा कुठलाही शब्द डिक्शनरीमध्ये नाही.
राहुल गांधी यांनी 'मोदीलाय'वर पुन्हा एक ट्वीट केलं आहे. ते सांगतात की हा नवा शब्द आहे आणि जगभरात लोकप्रिय ठरत आहे. पंतप्रधान मोदी हे किती वेळा खोटं बोलले याचा हिशेब एक वेबसाइट ठेवत आहे. असं देखील त्यांनी सांगितलं. सोबत त्यांनी या वेबसाइटची लिंक दिली आहे.
 
राहुल यांनी हे ट्वीट शेअर केल्यानंतर त्यांच्यावर भाजप समर्थक टीका करताना दिसत आहेत. राहुल गांधी यांचे जुने व्हीडिओ पुन्हा टाइमलाइनवर शेअर होताना दिसत आहेत.