सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (16:05 IST)

समीर बागसिराजः 'लोकसेवेचं व्रत घेतलेला खाकी वर्दीतील संकटमोचक'

"गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळाले. तिचा जीव वाचला. मी फक्त माझं कर्तव्य केलं...वेगळं काहीच नाही."
 
हे शब्द आहेत पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचे कर्मचारी समीर बागसिराज यांचे.
 
लोकसेवेचं व्रत घेतलेल्या या खाकी वर्दीतील संकटमोचकाने, रस्ते अपघातात जखमी मुलीला खांद्यावर घेऊन धावत रुग्णालय गाठलं.
 
रक्ताने माखलेला शर्ट, आग ओकणारा सूर्य याची तमा न बाळगता समीर यांनी दाखवलेलं प्रसंगावधान आणि तात्काळ निर्णयामुळे या लहान मुलीला जीवनदान मिळालं.
 
त्यादिवशी नेमकं काय झालं होतं? पोलीस कर्मचारी समीर बागसिराज यांनी बीबीसी मराठीला आपला अनुभव सांगितला.
 
त्या दिवशी नेमकं काय झालं?
सकाळचे नऊ वाजले असतील...मुंबई-पुणे हाय-वे वर ट्रॅफिक वाढायला सुरूवात झाली होती. वारजे, म्हणजे पुण्यातील रहदारीचा परिसर..त्यामुळे पोलीस कर्मचारी वाहतूक कोंडी होऊ नये याची खबरदारी घेत होते.
 
कोथरूडमध्ये रहाणारे मनोज पुराणिक कुटुंबाला घेऊन आंबेगावच्या दिशेने निघाले होते. गाडीत पत्नी आणि दोन मुली होत्या. रस्ता नेहमीचाच होता. पण, अचानक...
 
त्यांच्या गाडीला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. अपघातात पुराणिक कुटंबीय जखमी झाले.
 
रस्त्याच्या मधोमध अपघात झाल्याने काही मिनिटातच ट्रॅफिक जॅम झालं. पुराणिक कुटुंबीयांना तात्काळ मदतीची गरज होती. त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीला जबर मार लागला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. तात्काळ रुग्णालयात उपचार गरजेचे होते. अॅम्ब्युलन्सला बोलावण्यात आलं..पण, रस्त्यावरचं ट्रॅफिक पहाता अॅम्ब्युलन्स वेळेवर पोहोचू शकत नव्हती.
 
पोलीस पोहोचले...पण, बघ्यांच्या गर्दीमुळे त्यांना काहीच हालचाल करता येत नव्हती. प्रश्न एका कोवळ्या जीवाचा होता...त्यामुळे एकही क्षण वाया घावलणं शक्य नव्हतं. तेव्हा...एक खाकी वर्दीतला पोलीस कर्मचारी त्यांच्या मदतीसाठी घाऊन गेला...त्याने पुढे काय केलं?
 
"मुलीला खांद्यावर घेतलं..आणि रुग्णालयाच्या दिशेने पळत सुटलो"
समीर बागसिराज पुण्यातील वारजे ट्रॅफिक पोलीस चौकीत कर्तव्य बजावतात. तो दिवस, आणि ती दृष्यं त्यांना अजूनही आठवतात. अपघातामुळे लोकांनी ट्रॅफिक जॅम केलं होतं. वाहतूक पूर्णत: थांबलेली होती. ती दृष्य अजूनही आठवतात, बीबीसी मराठीशी बोलताना ते सांगत होते.
 
गाडीच्या पुढची बाजू वर आली होती...आणि मागची बाजू आत अडकलेल्या लोकांच्या अंगावर होती. लोकांच्या मदतीने एक महिला आणि तीन वर्षाच्या मुलीला बाहेर काढण्यात यश आलं.
 
पण, वडील आणि दुसरी मुलगी गाडीतच अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढता येत नव्हतं. आम्ही सर्वांनी अंगातली शक्ती वापरून सीट मागे ओढली आणि लहान मुलीचे अडकलेले पाय सर्वप्रथम बाहेर काढले. या मुलीचे पाय वडीलांच्या पाठीमागे कमरेत बाजूला अडकले होते.
 
तिचं डोकं काचेत अडकून पडलं होतं. ही मुलगी बेशुद्ध अवस्थेत होती. तोंडातून आणि डोक्यातून रक्त येत होतं. पोटात आणि पाठीत काचा घुसल्या होत्या. परिस्थिती फार भयानक होती...
 
दोन्ही बाजूने रस्ता ट्रॅफिकमुळे बंद झाला होता. मी, त्या मुलीला खांद्यावर घेतलं..आणि माई मंगेशकर रुग्णालयाच्या दिशेने पळत सुटलो...50-60 मीटर धावत गेलो तर, एका रिक्षावाल्याने आवज दिला. तो म्हणाला, साहेब पळू नका..रिक्षातून चला...
 
मी त्या मुलीला रिक्षात मांडीवर घेऊन बसलो होतो. रिक्षातून उतरलो आणि मुलीला हातात घेऊन रुग्णालयात धाव घेतली. या मुलीला प्रथमोपचार मिळाले. ती रडत होती. डॉक्टर म्हणाले, या मुलीला अंतर्गत मार लागला असावा. त्यानंतर, आम्ही तिला दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं.
 
या मुलीला 'गोल्डन अवर'मध्ये जीवनदान मिळालं. याचं मला खूप समाधान आहे. मी माझं कर्तव्य पूर्ण केलं...वेगळं काहीच नाही.
 
'खरा तो एकची धर्म..जगाला प्रेम अर्पावे'
समीर म्हणतात, पोलिसांना जात नसते ना धर्म असतो. लोकांचं रक्षण हाच त्यांचा खरा धर्म बनतो. त्यामुळे समीर मानवता हा त्यांचा एकच धर्म मानतात.
 
सद्य स्थितीत देशभरात तणावाचं वातावरण आहे. याबाबत विचारल्यानंतर ते म्हणाले, शाळेत आम्हाला प्रार्थना होती. 'खरा तो एकची धर्म..जगाला प्रेम अर्पावे' आम्ही रोज ही प्रार्थना म्हणायचो. लोकांनी ही प्रार्थना लक्षात ठेऊन काम केलं पाहिजे. सर्वधर्म समभावाने राहिलं पाहिजे.
 
"जात, धर्म महत्त्वाचा नाही"
रस्ते अपघातानंतर मनोज पुराणिक आणि त्यांचे कुटुंबीय आता सावरत आहेत. मनोज यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झालीये. पण, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुली सुखरूप आहेच.
 
प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज पुराणिक बोलताना म्हणाले, "जात, धर्म महत्त्वाचा नाही. माणसाने, माणसासाठी माणसासारखं वागलं पाहिजे." मानवता हाच खरा धर्म आहे.
 
समीर बागसिराज यांच्या प्रसंगावधानाचं वरिष्ठांनीदेखील कौतूक केलंय.
 
"मला गाडीतून निघता येत नव्हतं. पोलिसांनी गाडीचे भाग खेचून आम्हाला बाहेर काढलं. मुलगी जबर जखमी झाली होती. तिला तात्काळ कडेवर उचलून पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी मोठी मदत केली," असं मनोज पुराणिक पुढे म्हणाले.