शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 13 एप्रिल 2021 (11:09 IST)

गुढीपाडवा : शालिवाहन शककर्त्यांबद्दल जाणून घ्या

शालिवाहन शके अर्थात मराठी कालगणनेनुसार गुढीपाडव्याचा दिवस हा नववर्षदिन असतो. हे शककर्ते राजे कोण होते?
 
शालिवाहनाने शकांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून शालिवाहन शक ही नवीन कालगणना तत्कालीन मराठी मुलखात सुरू झाल्याचं म्हटलं जातं. दक्षिण भारतात ही कालगणना आजही वापरात आहे.
 
या कालगणनेविषयी आणि शककर्त्यांविषयी गेल्या काही वर्षांत आणखी एक मतप्रवाह पुढे आला आहे. शालिवाहन राजानं ही कालगणना सुरू केली नसून शकांनीच सुरू केल्याचं काही अभ्यासकांचं मत आहे.
 
ही कालगणना नेमकी कुणी सुरू केली? इतिहासतज्ज्ञ, अभ्यासक याविषयी काय म्हणतात? याचा धांडोळा...
 
2000 वर्षांपूर्वी उत्तर भारतात सातत्याने परकीय टोळ्यांची आक्रमणं व्हायची. याच परकीय टोळ्यांपैकी एक असलेल्या शकांनी तत्कालीन सातवाहन साम्राज्यावर हल्ला केला.
 
सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा पराक्रमी राजा त्यावेळी सत्तेवर होता. गौतमीपुत्र असं नाव लावणारे राजे त्या वेळच्या मातृसत्ताक पद्धतीचे निदर्शक असल्याचंही काही अभ्यासक मानतात.
 
इतिहास अभ्यासकांनुसार, गौतमीपुत्राने या शक - क्षत्रप राजाचा हल्ला परतवून लावला आणि त्याचा युद्धात पराभव केला. हे वर्ष होतं इसवी सन 78. आत्ताच्या नाशिकच्या परिसरात हे युद्ध लढलं गेलं. सातवाहनांच्या साम्राज्याची राजधानी होती पैठण. महाराष्ट्राचं सुवर्णयुग असंही या तत्कालीन वैभवशाली पैठणनगरीचं वर्णन केलं जातं.
 
गौतमीपुत्र सातवाहनाचा पराक्रम
इतिहासतज्ज्ञ प्रभाकर देव यांचा प्राचीन भारताचा अभ्यास आहे. ते नांदेड इथल्या महाविद्यालयात प्राध्यापक होते. ते सांगतात, "इसवी सनपूर्व 236च्या आसपास पैठण परिसरात सातवाहन साम्राज्य म्हणजेच शालिवाहन साम्राज्य स्थापन झालं. सातवाहनांतील सगळ्यांत श्रेष्ठ सम्राट म्हणून गौतमीपुत्र सातकर्णी याचं नावं घेतलं जातं.
 
इसवी सनाच्या पहिल्या शतकात म्हणजेच इसवी सन 72 ते 95 या काळात हा सत्तेवर होता. या राजाशी संबधित एक शिलालेख नाशिकच्या लेण्यांमध्ये सापडला आहे."
 
"मौर्यांच्या साम्राज्यानंतर कुशान, हुन, पल्लव, शक यासारख्या परकीय टोळ्यांनी संपूर्ण उत्तर भारतावर आक्रमण केलं. दक्षिण भारताला या परकीय आक्रमणातून वाचवण्याचं काम हे गौतमीपुत्रानं केलं. गौतमीपुत्रानं शकांचा पराभव केला आणि त्या वेळेपासूनच शालिवाहन शक ही कालगणना सुरू झाली", असं प्रभाकर देव सांगतात.
 
देव यांच्या अभ्यासानुसार, गौतमीपुत्राने इ.स. सन 78मध्ये शक कालगणना सुरू केली हे ऐतिहासिक वास्तव आहे.
 
सातवाहन, सालाहन, साळीहन आणि शालिवाहन
"शालिवाहन म्हणजेच सातवाहन. शालिवाहन हे संस्कृतीकरण आहे. साळीहन हे मूळ प्राकृत भाषेतलं नाव. जैन साहित्यामध्ये सालाहन असं म्हटलं आहे. त्याचं संस्कृतीकरण जेव्हा झालं, तेव्हा ते शालीवाहन झाले," असं शालिवाहन साम्राज्याचे अभ्यासक इतिहासतज्ज्ञ डॉ. रा. श्री. मोरवंचीकर सांगतात. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यरत होते.
 
"या साम्राज्याचा बाविसावा राजा गौतमीपुत्र हा अतिशय पराक्रमी होता. त्याने जवळपास संपूर्ण महाराष्ट्र आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. गौतमीपुत्र आणि शकांमध्ये साम्राज्यावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी घनघोर युद्ध झालं. या युद्धात गौतमीपुत्रानं शक-शत्रप घराण्यातल्या नहपान या राजाचा समूळ पराभव करून त्याला मारून टाकलं."
 
"सातवाहनांनी शकांच्या प्रदेशावर विजय मिळवल्यानंतर शालिवाहन शकं कालगणना सुरू झाली. गौतमीपुत्राने प्रतिस्पर्धी शक शत्रप यांचा पराभव करून आपली नाणीही प्रचारात आणली," असं डॉ. मोरवंचीकर म्हणतात.
 
चष्टन राजाने सुरू केला शक?
पुण्यातील इंडॉलॉजिस्ट आणि पुरात्त्वज्ञ साईली पलांडे दातार यांनी मात्र यापेक्षा वेगळी माहिती दिली. त्या म्हणाल्या की, "सातवाहन राजाने शकांना हरवलं आणि तेव्हापासून शक संवत्सर (कालगणना) सुरू झालं हा गैरसमज आहे."
 
"शक हे इराणधून - तिथल्या सिथीया प्रांतातून आले होते. त्यांनी तत्कालीन भारतीय संस्कृती आत्मसात केली. धर्म स्वीकारले. त्यांच्या घराण्याच्या क्षहरात आणि कार्दमक अशा दोन शाखा होत्या. श क्षहरातांपैकी नहपान याचं गुजरात आणि राजस्थानमध्ये राज्य होतं. हा राजा नाशिक इथंही राज्य करत होता. त्याच्या संदर्भातील शिलालेख पांडव लेण्यात सापडतात. नाशिकजवळ गोवर्धन इथं गौतमीपुत्र सातकर्णी या पराक्रमी राजाने नहपानाचा पराभव केला आणि क्षहरातांचा निर्वंश केला. त्यानंतर सातवाहन राजांनी नाशिक जवळील नहपानाचं राज्य आपल्या अखत्यारीत घेतलं."
 
साईली पुढे सांगतात, "गुजरातधील कार्दमक शाखेचा पहिला राजा चष्टन गादीवर आला. इसवी सन 78मध्ये चष्टनने स्वतःचं राज्य सुरू करून राज्याभिषेक शक सुरू केला. त्याने काढलेल्या नाण्यांवर शकाचा पहिला उल्लेख आढळतो. तो त्याच्या वंशातल्या राजांनी 300 वर्षं वापरला. पुढे वाकाटक राजा देवसेन आणि चालुक्य सम्राट पुलकेशी यांच्या लेखातही आपल्याला शकाचा (शालिवाहन शक नव्हे) उल्लेख आढळतो. नंतरच्या काळात शालिवाहन हे त्याला जोडलं गेलं आहे."
 
जुन्नरच्या लेण्यांध्येही शिलालेख
"जुन्नर आणि परिसरातल्या लेण्यांमध्ये या काळाशी संबधित शिलालेख मिळाले आहेत. रोमच्या व्यापारावर आपलं वर्चस्व असावं यासाठी त्याकाळी लढाया व्हायच्या. गौतमीपुत्राने नहपानावर वर्चस्व मिळाल्यावर त्याच्या प्रत्येक नाण्यावर आपले शिक्के मारले", असं सायली पलांडे दातार म्हणाल्या.
 
जर्मनीचे डॉ. हॅरी फाल्क हे इंडॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनातून ही नवीन माहिती समोर आल्याचं सायली यांनी सांगितलं.
 
शालिवाहनापुढे 'शके' कसे आले?
शालिवाहन शके या कालगणनेतला 'शके' हा शब्द शक राजांशी निगडीत नाहीच, असं प्रभाकर देव यांचं म्हणणं आहे. "शक ही कालगणनेची पद्धत आहे. काही लोक त्याचा संबंध शकांशी लावतात. माझ्या कल्पनेनुसार, शक हा संवत अशा अर्थाने वापरात असलेला शब्द आहे. आपल्याकडे विविध शकं म्हणजे कालगणना आहेत. त्यापैकी इसवी सानाच्या 78व्या वर्षी शालिवाहन राजानं सुरू केलेली ही कालगणना आपण मराठी कालगणना म्हणून मानतो," देव सांगतात.
 
कशी होती सातवाहनकालीन महाराष्ट्राची राजधानी?
डॉ. मोरवंचीकर यांनी सातवाहन काळाचं वर्णन केलं. ते म्हणाले, "या सातवाहनांची पैठण ही राजधानी होती. त्या वेळी पैठणला प्रतिष्ठान नगरी म्हटलं जायचं."
 
"त्याकाळात पैठण एवढं मोठं शहर दुसरं नव्हतं. ते जगातल्या त्या काळच्या सर्व मोठ्या बाजारपेठांशी जोडलेलं होतं. पैठणमधून रोमशी थेट व्यापार चालायचा आणि याचे पुरावे इतिहासतज्ज्ञांना मिळालेले आहेत. पैठणजवळच्या उत्खननात रोमन नाणी मिळाली आहे," ते सांगतात.
 
"तत्कालीन भारतात व्यापार मार्गांना सार्थवाह पथ असं म्हणायचे. हे सर्व सार्थवाह पथ पैठणमधून जात होते. पैठण हा त्याकाळी मोठा व्यापारी थांबा होता. बहूतांश व्यापारी हे महिनोंमहिने मुक्कामी राहत असतं. याचं वर्णन हाल सातवाहन याच्या गाथेमध्ये केलं आहे. त्यातील सातशे पदांपैकी चारशे पदं ही व्यापारावर आहेत."
 
शालिवाहन शके आणि मराठी नववर्ष
सातवाहनकालीन दरबारी पंडित गुनाढ्य यानं बृहतकथा लिहिली. पैठण हे गोदावरीच्या किनाऱ्याने पाच मैलापर्यंत पसरलेलं होतं, असं त्यानं म्हटलं आहे. भव्य प्रासाद, धार्मिक वास्तू, उद्यानं याचा उल्लेख त्यात आहे. प्राकृत भाषेचा उदय याच काळात झाला. यातूनच पुढे आधुनिक मराठीचा जन्म झाला असं मानतात.
 
प्रभाकर देव यांनी ग्रीक भाषेत सापडलेल्या एका अनामिक ग्रीक प्रवाशाच्या प्रवासवर्णनातील संदर्भ याच्या पुष्ट्यर्थ दिले. ते म्हणाले, "पेरीप्लस ऑफ द युरेथ्रियन सी या प्रवासवर्णात सातवाहनाचा संपन्न कालखंड दिला आहे. हा प्रवासी इसवी सनाच्या पहिल्या शतकात महाराष्ट्रात आला होता. त्याने मराठवाड्यातील अप्रतिम शहरांचं वर्णन केलं आहे."
 
"पैठणचा उल्लेख तो पैतान असं करतो. पैठणहून तो भोगवर्धन (भोकरदन, जालना) इथं गेला. तिथून तगरपूरला (तेर, उस्मानाबाद) गेला. ही 2000 वर्षांपूर्वीची भारतातली मोठी शहरं होती. त्या काळातील नऊ महानगरांपैकी तीन आजच्या मराठवाड्यात होती. या शहरांतून मोठ्या प्रमाणावर व्यापार व्हायचा. निर्यात केली जायची," देव सांगतात.
 
450 वर्षांचा सुवर्ण कालखंडाची आठवण
शालिवाहन शक कालगणनेच्या रूपानं एका सुवर्ण कालखंडाची आठवण आपण ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा देव व्यक्त करतात. ते सांगतात, "या साडेचारशे वर्षांच्या काळात जे व्यापारीमार्ग तयार झाले त्या मार्गांवर लेणी कोरली गेली. 1200 पैकी 900 लेणी याच मार्गांवर आढळतात. पश्चिम किनारपट्टीवर व्यापारी बंदरं होती. तिथे मोठी शहरं उदयास आली."
 
"याच काळात इंडो-रोमन व्यापार भरभराटीस आला. दुर्दैवानं आपला इतिहास उत्तर भारतावर केंद्रित आहे. गुप्त साम्राज्यापेक्षाही शालिवाहनांचं साम्राज्य मोठं होतं. कार्ले, भाजे, नाशिक, जुन्नर, पितळखोरा, वेरुळच्या लेण्यांमध्ये सातवाहन राजांचा उल्लेख आढळतो."
 
"आर्थिक संपन्नता आणि राजकीय स्वास्थ्य या काळात लाभलं आहे. या काळात दक्षिण भारतातल्या समुद्र किनाऱ्यावरून आपले व्यापारी आग्नेय आशियात जात असत. तिथून मसाल्याचे पदार्थ भरून आणत," देव सांगतात.
 
"भारतातील पैठणचं कापड, रेशीम, हस्तिदंताच्या वस्तू, चंदन, मसाल्याचे पदार्थ निर्यात केले जात. युरोपात पैठण आणि तगरपूरच्या (तेर) कापडाला मोठी मागणी होती. गुजरातमधल्या भ्रुभू कच्छसह (भडोच) महाराष्ट्रातील कलीना (कल्याण), सुरपारक (सोपारा), स्थानक (ठाणे), दाभोळ, जयगड, देवगड, मालवण अशा सगळ्या बंदरांवरून समुद्री व्यापार चालत असे," असं देव यांनी सांगितलं.