मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 एप्रिल 2021 (19:02 IST)

नागपुरातील मिनी कोव्हिड हॉस्पिटलमध्ये आग, चौघांचा होरपळून मृत्यू

नागपूरच्या अमरावती रोडवरील वाडी येथील 'वेल-ट्रीट' या हॉस्पिटलला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
 
मिनी कोव्हिड हॉस्पिटल असणाऱ्या 'वेल ट्रीट' हॉस्पिटलच्या ICU ला आग लागली. त्यात तीन पुरुष आणि एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
 
नागपूर-अमरावती महामार्गावर असलेल्या खासगी वेल ट्रीट हॉस्पिटलमध्ये 35 बेड्स होते. या हॉस्पिटलला खासगी मिनी कोव्हिड हॉस्पिटलचा दर्जा देण्यात आला होता.
 
9 एप्रिलला रात्री आठ वाजून 10 मिनिटांनी ही आग लागल्याची माहिती नागपूर महानगर पालिकेच्या अग्निनशमन विभागाला देण्यात आली, अशी माहिती नागपूरचे चीफ फायर ऑफिसर राजेंद्र उचके यांनी दिली.
 
आगीच्या घटनेदरम्यान वेल ट्रीट हॉस्पिटलमध्ये 32 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. आधी ICU ला आग लागली, नंतर इतरत्र पसरली, असं अग्निशमन विभागाने सांगितलं.
 
अग्निशमन विभागाने तिसऱ्या मजल्यावरील 21 रुग्णांना सुरक्षित आगीतून बाहेर काढले. वेल ट्रीट हॉस्पिटलमधील आगीतून सुरक्षित बाहेर पडलेल्या रुग्णांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय या रुग्णालयांमध्ये हलवलं आहे.
 
"नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात चार मृतदेह आणण्यात आणण्यात आले आहेत. 'वेल ट्रीट हॉस्पिटलमधील इतर कोरोनाबाधित रुग्णांना शहरातील इतर कोव्हिड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे," अशी माहिती नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.
 
'वेल-ट्रीट' हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये एअर कंडिशनरचा अचानक शॉर्ट सर्किटमुळे भडका उडाला. यावेळी आयसीयूमध्ये 5 रुग्ण उपचार घेत होते. आगीची माहिती कर्मचाऱ्यांनी कामावर असणाऱ्या परिचारिका आणि हॉस्पिटलचे प्रमुख संचालक डॉ. राहुल ठवरे यांना दिली.
 
या घटनेबद्दल वेल ट्रीट हॉस्पिटलचे संचालक डॉ. राहुल ठवरे सांगतात, "आगीची माहिती मिळताच मी धावत आयसीयूकडे पोहोचलो. यावेळी हॉस्पिटलमध्ये परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सुरज वानखेडे उपस्थित होते. त्यांनी अग्नीशमन यंत्राने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र यात काही भागातीलच आग विझली.
 
याच दरम्यान हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने मी आणि कर्मचाऱ्यांनी आयसीयू कक्षातील रुग्णांना एका पाठोपाठ बाहेर हलवण्यास सुरुवात केली. पूर्ण आयसीयू कक्षात धूर पसरल्याने यातील 3 गंभीर रुग्णांना बाहेर काढले.
 
दरम्यान स्थितीचे गांभीर्य पाहता कर्मचार्‍यांनी इतर माळ्यावर उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना बाहेर काढण्यास सुरुवात केली."
 
नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या घटनेत जखमी झालेल्यांना योग्य उपचार देण्याच्या सूचना केल्या आहेत. तर रुग्ण आणि जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली आहे.
 
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.