मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , शनिवार, 10 एप्रिल 2021 (16:33 IST)

नाशिक मनपा व क्रेडाईच्या ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित

ठक्कर डोम येथे ३५० बेड्सच्या कोविड केअर सेंटरची पुनर्निमिती ही महानगरपालिका व क्रेडाई संस्थेने केलेली अत्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा असून शेवटचा रुग्ण जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत ही लढाई संपणार नाही. क्रेडाई संस्थेच्या  मार्गदर्शन व प्रेरणेतून इतर संस्थांनी देखील कोरोनाच्या या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन  राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बेड्सची संख्या अपुरी पडत आहे. त्यादृष्टीने नाशिक महानगरपालिका व क्रेडाई या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या ठक्कर डोम येथे पुन्हा एकदा ३५० बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी भुजबळ बोलत होते.
 
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, देशात कोविडचा प्रादुर्भाव वाढला त्यावेळी नाशिकमध्ये ठक्कर डोमची व्यवस्था नाशिकमध्ये केली. मध्यंतरीच्या काळात कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ही व्यवस्था बंद केली होती. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा कार्यान्वित करावी लागत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव वाढत असून आपण उपाय योजना करत असतांना मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आपण व्यवस्था करण्यात कमी पडत आहोत ही परिस्थिती आहे. त्यामुळे या कामासाठी खाजगी डॉक्टर, नर्स, परिचारिका यांनी कामासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
 
यावेळी महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले की, कोरोनाच्या काळात आवश्यकता लक्षात घेवून पुन्हा एकदा नाशिककरांसाठी क्रेडाई ने कोविड केअर सेंटरची केलेली निर्मिती ही कौतुकास्पद बाब आहे. मनपा आणि शासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाय योजना करण्यात करण्यात येत असल्याने नागरीकांनी घाबरून न जाता वेळेत उपचार व निर्बंधांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
 
प्रास्ताविक करतांना कोविडचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा एकदा सामाजिक जबाबदारी म्हणून क्रेडाई संस्था यात उतरली आहे. समाजातील इतर संस्थांनी देखील सामाजिक जबाबदारी चे भान ठेवून कोरोनाच्या या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन यांनी केले.