बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019 (13:51 IST)

शरद पवार : ईडीच्या कार्यालयात जाऊ नये यासाठी पोलिसांची विनंती

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज अंमलबजावणी संचालनालयासमोर स्वतःहून हजर होणार होते. पण त्यांना ईडीच्या कार्यालयात प्रवेश मिळणार किंवा नाही यावरून तर्कवितर्क लावले जात होते. अखेर दुपारी 1.35 वाजता शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला.
 
1.25: शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयाकडे जाऊ नये अशी विनंती करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले. पोलीस आयुक्त आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक सुरू असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
 
12.45: शरद पवार यांनी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात येण्याची गरज नाही असा ई-मेल ईडीनं पाठवल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. ईडीनं ई-मेल केला असला तरी आम्ही कार्यालयातच जाणार असं मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही उत्तर द्यायला नाही तर प्रश्न विचारायला जात आहोत अशी भूमिका नवाब मलिक यांनी मांडली आहे.
 
Skip Facebook post by BBC News MarathiEnd of Facebook post by BBC News Marathi
12.40: निवडणुकीच्या तोंडावर अशा घटनांचा शरद पवारांसारखे बडे नेते राजकीय फायदा करून घेणारच - अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस झोपली होती पण आता या प्रकरणामुळं झोपी झालेले जागे झाले आहेत. यामध्ये सरकारचा दोष नाही.
 
Skip Facebook post 2 by BBC News MarathiEnd of Facebook post 2 by BBC News Marathi
12.30: ईडी कार्यालयाच्या परिसरामध्ये ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.
 
12.15: शरद पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात आंदोलन केले. यातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं.
 
11.45: चुकांच्या संदर्भात दखलच घ्यायची नाही असं कसं होऊ शकेल. त्यांच्या चुकांबाबत विचारपूसच करायची नाही का? आपल्याला कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार चौकशीला सहकार्य केलं पाहिजे. कर नाही तर डर कशाला अशा शब्दांमध्ये राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
11.30: कोणत्याही चार्जशिटमध्ये शरद पवार यांचे नाव नाही. ईडीचा वापर करून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. कायदासुव्यवस्था जपण्याची आमची एकट्याची जबाबदारी नाही. या देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. काही दिवसांनी देशातील लोकशाही संपलेली असेल अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
 
11.20: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात जाण्याची शक्यता आहे. त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनंही केली. पवारसाहेब तुम आगे बढो, ये सरकार हमसे डरती है अशा घोषणाही त्यांनी दिल्या आहेत.
 
11.15: हिंगोली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे हिंगोली- नांदेड रस्त्यावरील खटकाळी बाय पास रोडवर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
 
11.09: शरद पवारजी यांच्याबाबतीत सरकार सूडाचं राजकारण करत आहे. महाराष्ट्रातील निवडणुका महिन्याभरावर आल्या असताना सरकारनं ही राजकीय संधीसाधुपणाची मालिका चालवली आहे असा शब्दांमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे.
 
10.30: सर्व प्रकारची काळजी घेण्यासाठी आम्ही सुसज्ज आहोत. सर्व परिसरामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. योग्य ती पूर्वकाळजी घेण्यात आली आहे. असं झोन1 चे डीसीपी संग्रामसिंग निशाणदार यांनी सांगितले आहे.
 
10.18: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयामध्ये पोलिसांचे पथक हजर झाले असून श्वानपथकाद्वारे तेथे तपासणी केली जात आहे.
 
10.10: शरद पवार यांच्या घरी पोलिसांचे एक पथक हजर झाले आहे. सहायक पोलीस आयुक्त विजय चौबे या पथकासह तेथे उपस्थित आहेत.
 
10.00: भाजप सरकार ईडीचा दुरुपयोग करत आहे. मुंबई आणि राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.
 
10.10: बलार्ड इस्टेट परिसरामध्ये पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या परिसरातील ईडी कार्यालयाला भेट देण्याची शक्यता आहे.
 
शिखर बँकप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बुधवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. पुढच्या महिनाभरात प्रचारामुळे वेळ मिळणार नसल्याने आज (शुक्रवार) दुपारी 2 वाजता ते मुंबईतील बलार्ड पियर परिसरातील ईडीच्या कार्यालयात स्वतःहून जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. गुरूवारी संध्याकाळीही त्यांनी याबाबत ट्विट करून सांगितलं.
 
कार्यकर्त्यांना न जमण्याचं आवाहन
शरद पवार यांनी गुरूवारी संध्याकाळी ट्विटरवर लिहिलं, "ठरल्याप्रमाणे शुक्रवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता मी ईडीच्या कार्यालयात तिथल्या अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे. सदर कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये.
 
ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तिथं शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी. परिसरातील वाहतुकीला तसेच सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी, पोलीस प्रशासन व इतर सर्व सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करावे."
 
मुंबई पोलिसांचा जमावबंदीचा आदेश
दरम्यान, बॅलार्ड पियर परिसरात मुंबई पोलिसांनी जमावबंदीचा आदेश दिला आहे. गुरूवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी ईडी कार्यालयाच्या परिसरात जमावबंदीचा आदेश लागू केला.
 
कुलाबा, कफ परेड, मरिन ड्राईव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जेजे मार्ग तसंच एमआरए मार्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कलम 144 लागू करण्यात आलं असून या भागात जमावबंदी असल्याची मुंबईकरांनी नोंद घ्यावी, असं मुंबई पोलिसांनी ट्विट करून सांगितलं.
 
रोक सको तो रोक लो - जितेंद्र आव्हाड
शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना ईडी कार्यालय परिसरात जमू नये असं आवाहन केलं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी परिसरात जाण्याची पुरेपुर तयारी केल्याचं दिसून येत आहे. मुंबई पोलिसांनी जमावबंदीचा आदेश लागू असल्याचं ट्विट केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 
तुम्ही आम्हाला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. आम्ही तिथं पोहोचणारच. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
 
शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याबाबत सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद पवार यांना अधिकृतरित्या चौकशीसाठी बोलावलेलं नसल्यामुळे त्यांना ईडीच्या कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता नसल्याच्या बातम्या बहुतांश माध्यमांनी प्रसिद्ध केल्या आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी दोन वाजता बॅलार्ड पियर परिसरात काय होतं? याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेलं आहे.
 
घोटाळा नेमका काय आहे?
ज्या राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे, ते प्रकरण तरी नेमकं काय आहे?
 
याचिकाकर्ते सुरिंदर अरोरा यांनी या प्रकरणी 2010 साली हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान 22 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला बँकेच्या संचालक मंडळावर पुढील पाच दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
 
या आदेशानंतर मुंबईतील एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. याच आधारावर आता ईडीनं या नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
 
या बँक घोटाळ्यात सकृतदर्शनी सर्वांविरोधात 'विश्वसनीय पुरावे' आहेत, असं मत मुंबई उच्च न्यायालयातील न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने नोंदवलं होतं.
 
राज्य सहकारी बँकेने 2005 ते 2010 या कालावधीत मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केलं होतं. सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, कारखाने आणि इतर कंपन्यांना हे कर्ज देण्यात आलं होतं. ही सर्व कर्जं बुडीत निघाली होती.
 
ही कर्ज देताना नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करत सुरिंदर अरोरा यांनी 2010 साली मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. जवळपास 25 हजार कोटींचा हा गैरव्यवहार असल्याचा आरोप अरोरांनी याचिकेतून केला आहे.
 
चौकशीत काय झालं?
राज्य सहकारी बँकेनं केलेल्या कर्जवाटपाची 'महाराष्ट्र सहकार कायदा कलम-83' नुसार सहकार विभागानं चौकशी केली होती. कर्जवाटप करताना नाबार्डच्या 'क्रेडिट मॉनिटरिंग अरेंजमेंट'चं उल्लंघन केल्याचा ठपका या चौकशीत ठेवण्यात आला होता.
 
याशिवाय, 14 कारखान्यांना तारण किंवा सहकारची थकहमी न घेता कर्जवाटप करणं, कर्जासाठीची कागदपत्र न तपासणं, नातेवाईकांना कर्जाचं वाटप करणं, या प्रकारांमुळे बँकेला हजारो कोटींचं नुकसान झाल्याचं चौकशीत समोर आलं होतं.
 
2011 मध्ये सरकारनं राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर बरखास्तीची कारवाई केली होती आणि त्यानंतर 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'नं राज्य सहकारी बँकेवर प्रशासकाची नेमणूक केली होती.