मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 26 सप्टेंबर 2019 (16:11 IST)

इंडोनेशियात आकाश अचानक लाल रंगाचं का झालं?

इंडोनेशियात मागच्या आठवड्यात लागलेल्या आगीमुळे जांबी भागातलं आकाश लाल झालं आहे. जंगलात लागलेल्या आगीमुळे इंडोनेशियाच्या मोठ्या भागाला फटका बसला आहे.
 
जांबी भागात राहणाऱ्या एका व्यक्तिने सोशल मीडियावर टाकलेले लाल आकाशाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले. धुरामुळे डोळे आणि घशात त्रास जाणवतो आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
 
दरवर्षी जंगलात लागणाऱ्या आगीमुळे इंडोनेशियात धुराचा पडदा तयार होतो. या आगीचा फटका संपूर्ण दक्षिण पूर्व आशियाई क्षेत्राला बसतो.
 
मान्सून विज्ञान तज्ज्ञांनीही इंडोनेशियातील आकाशाचा रंग लालसर झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रेले स्केटरिंग म्हणजेच प्रकाश किरण विखुरल्यामुळे आकाशाचा रंग बदलतो.
 
जांबी भागात मेकर सारी गावात राहणाऱ्या 21 वर्षीय युवतीनंही रक्ताच्या रंगाच्या आकाशाचा फोटो शेअर केला. त्यादिवशी धुरक्याची तीव्रता जास्त होती. तेव्हापासून फेसबुकवर हा फोटो 34,000 वेळा शेअर करण्यात आला आहे.
 
अनेक नेटिझन्सनी हे फोटो खरे आहेत का याविषयी बीबीसी इंडोनेशियाकडे साशंकता व्यक्त केली. हे फोटो आणि व्हीडिओ मी माझ्या फोनमधून काढले आहेत. सोमवारी (22 सप्टेंबर) धुक्याची स्थिती गंभीर होती.
 
ट्वीटर युझर जूनी शोफी यतुन निसा यांनी लाल आकाशाचा व्हीडिओ शेअर केला आहे. फोटोबरोबर त्यांनी लिहिलं आहे, की हे मंगळ ग्रहाचे फोटो नाहीत, जांबी आहे. आम्हाला जगण्यासाठी स्वच्छ हवा आवश्यक आहे. धुरकं नकोय.
 
इंडोनेशिया मान्सून विज्ञान एजन्सी बीएमकेजी सॅटेलाईटद्वारे चित्रण केलं. जांबी परिसरात आकाश लाल झालं आहे आणि धुक्याची राळ आकाशात पसरली आहे.
 
कसं होतं रेले स्केटरिंग?
 
सिंगापोर महाविद्यालयात सामाजिक विज्ञानाचे प्राध्यापक असलेले कोह टीह योंग यांनी रेले स्केटरिंगची प्रक्रिया उलगडली. धुकं-धुराचे काही कण प्रकाश पडल्यावर स्वत:चा रंग बदलतात. त्यावेळी आकाशाचा रंग बदलतो. धुक्याच्या कणांचा आकार 1 मायक्रोमीटर असतो. मात्र हे कण प्रकाशाचा रंग बदलत नाही.
 
काही कण आणखी लहान असतात. त्यांचा आकार 0.05 मायक्रोमीटर पेक्षाही कमी असतो. धुक्यात यांचं प्रमाण अधिक असतं. आकाशाचा रंग लाल करण्यात हे कण महत्वाची भूमिका बजावत आहेत.
 
ते पुढे सांगतात, 'हा फोटो दुपारी काढण्यात आला आहे. त्यामुळे सूर्य डोक्यावर आहे. त्यामुळे आकाशाच्या लाल रंगाचं गहिरेपण अधिक भासतं. मात्र याने तापमान कमी जास्त होत नाही.
 
आधीच्या वर्षांच्या तुलनेत जंगलात लागलेल्या आगीचं प्रमाण वाढल्याने आकाश लाल होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. याचं कारण म्हणजे इंडोनेशियात बिगरमोसमी कालखंडात जमीन जाळण्याची पद्धत आहे. जुलै ते ऑक्टोबर या काळात हा प्रकार वाढतो. इंडोनेशियाच्या आपात्कालीन यंत्रणेनुसार वर्षातील पहिल्या आठ महिन्यात 328, 724 हेक्टर जमीन जाळली जाते.
 
हवेत पसरलेल्या धुलीकणांचं कारण हेही आहे. यासाठी मोठ्या कंपन्या आणि छोटे शेतकरी कारणीभूत आहेत. ते 'स्लॅश अँड बर्न' पद्धतीचा वापर करतात. जमीन साफ करण्यासाठी 'स्लॅश अँड बर्न' अर्थात 'कापा आणि जाळा' ही पद्धत शेतकऱ्यांसाठी सोपी मानली जाते. पीकाला एखाद्या रोगाची लागण झाली असेल तरीही हीच पद्धत वापरली जाते.
 
जमीन जाळताना नियंत्रित पद्धतीने लावलेली आग आटोक्यात राहत नाही आणि दूरवर पसरते. ही आग संरक्षित वनांच्या प्रदेशापर्यंत जाते. इंडोनेशियात जमीन जाळण्याची पद्धत अवैध आहे. मात्र अनेक वर्षांपासून जमीन जाळण्याचा प्रकार नियमितपणे घडतो. यामुळे भ्रष्टाचार आणि कमकुवत शासनाचं फावतं असंही काही लोकांचं म्हणणं आहे.