शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 3 डिसेंबर 2019 (19:26 IST)

शरद पवार यांचे 12 गौप्यस्फोट, अजित पवार यांच्याबाबत काय म्हणाले?

1) 'मी अजितला म्हटलं, भाजपशी बोल'
भाजपमधील एक वर्गाला वाटत होतं, की राष्ट्रवादीशी बोलावं. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मला विचारलं, की फडणवीस काही बोलायचं म्हणतात, तर मी जाऊ का? मी म्हटलं, "राजकारणात संवाद ठेवला पाहिजे. त्यांना काही सांगायचं असेल, ते स्वीकारायचं की नाही, हा आपला अधिकार आहे. ऐकून न घेणं हे योग्य नाही. तू जाऊन ते काय म्हणतायत ते ऐक. त्यातच आपण सरकार बनवायचं मांडलं असेल. त्यानंतर अजितसोबत भेट झाली, त्यात फडणवीसांशी झालेल्या चर्चेबद्दल सांगयचंय असं त्यांनी म्हटलं. मी म्हटलं, आपण नंतर बघूया. पण त्याचवेळी संजय राऊतांनी स्पष्टपणे सांगितलं, की आम्ही सोबत यायला तयार आहोत.
 
2) 'त्या मोमेंटला अजित पवारांनी भाजपला हो म्हटलं'
ज्यावेळी अजितने फडणवीसांशी बोलणं केलं, त्यावेळी अजितला असं सांगण्यात आलं, की आजच्या आज तुम्ही शपथ घेत असाल तर आम्ही हे करू, अन्यथा करणार नाही. त्यावेळी त्या मोमेंटला त्यांनी हो सांगितलं आणि शपथ घेतली.
 
अजित पवारांचं पुढे काय होणार? त्यांचं राष्ट्रवादीत आता काय स्थान असेल?
अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षातून का काढलं नाही?
विधिमंडळ सदस्यांची अजित पवारांकडे जी यादी होती, ती बैठकांना हजर असणाऱ्यांची यादी होती. आम्ही कायमच त्याच्या तीन-चार प्रती घेत असतो. पक्षनेता म्हणून याद्या अजितकडे होत्या. त्यात नेहरू सेंटरमध्ये काँग्रेससोबत माझे जे मतभेद झाले, त्या रागात त्यानं फडणवीसांशी बोलणं केलं. तीच यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली.
 
3) अजित पवारांनी शपथ घेतली, त्या सकाळी काय झालं?
सकाळी 6 वाजता मला फोन आला...तेव्हा विश्वासच बसेना. मी टीव्ही लावला तर सगळं दिसायला लागलं. त्यांच्यासोबत जे 5-10 लोक होते. ते सगळं मी सांगितलं तर न बोलणारे होते...मला खात्री झाली...माझ्या नावाचा वापर करून त्यांना तिथे नेलं असावं...ते जाऊच शकत नाही...म्हणून मला वाटलं, की आपण हे दुरुस्त करायचं... हे चुकीचं आहे आणि मोडून काढायचं, असं सक्त मत मी बनवलं आणि तातडीने पावलं टाकली. माझा याला पाठिंबा नव्हता...म्हणून उद्धव ठाकरेंसोबत ताबडतोब पत्रकार परिषद घेतली.
 
4) 'अजित स्वतःहून परत आला'
आम्हाला हा (भाजपसोबत जाण्याचा) मार्ग यत्किंचितही पसंत नाही. कदाचित हे अजितच्या लक्षात आलं. म्हणून सकाळी 6 वाजता येऊन सांगितलं, की चूक झाली आणि असेल ती शिक्षा घ्यायला तयार आहे. मी म्हटलं अक्षम्य चूक आहे. किंमत कुणालाही मोजावी लागेल. याला तूही अपवाद नाहीयेस.
 
5) अजित पवारांचा शपथविधी का झाला नाही?
ज्यावेळी शपथविधीचा प्रश्न आला, त्यावेळी राष्ट्रवादीच्या दोनच लोकांनी शपथ घेतली. साहजिकच विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून अजित पवारांची शपथ होणार होती. पण आम्ही निर्णय घेतला, की अजित पवारांची शपथ होणार नाही. जयंत पाटील आणि छगन भुजबळांनी शपथ घेतली.
 
6) अजित पवार मंत्रिपदाची शपथ घेतील?
कार्यकर्त्यांची समस्या असेल तर सोडवणूक करण्याचं काम अजित करतो. माझ्यापर्यंत येत नाहीत. सगळ्या सदस्यांना वाटतं साहेब उपलब्ध नसतात. शेवटी आपल्या प्रसंगला अजित पवार उभे राहतात, असं मानणारा हा मोठा वर्ग आहे.
 
पक्षाच्या सहकऱ्यांना वाटतं, की अजितने असलंच पाहिजे (मंत्रिमंडळ). पण अजितची भूमिका अशी आहे, की आता घाई करू नका. दुर्दैवाने माझ्यामुळे पक्षात जे वातावरण झालं ते सावरणं, दुरुस्त करणं यात मला आधी लक्ष घालायचंय. त्यामुळे हा विचार आत्ता लगेच केल नाही.
 
7) पवारांचे काँग्रेससोबत का झाले होते मतभेद?
अजित पवारांच्या नाराजीचं मूळ काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांशी घातलेल्या वादात आहे. स्वत: शरद पवार यांनी या मुलाखतीत यासंदर्भात सांगितलं.
 
शरद पवारांनी म्हटलं, "आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतच बैठका होत होत्या. नेहरू सेंटरमधील बैठकीत काँग्रेसच्या काही सहकाऱ्यांशी माझे मतभेद झाले... त्या वादावादीत मी बैठकीतून बाहेर पडलो. त्यानंतर अजित पवारांनी पक्षाच्या सहकाऱ्यांना सांगितलं, की आताच जर हे (काँग्रेस) अशी टोकाची भूमिका घ्यायला लागले, तर नंतर सरकार चालणार कसं? अजित पवारांनी काँग्रेससोबत सत्तेत जाण्यास आक्षेप व्यक्त केला. त्याच रात्री देवेंद्र फडणवीसांकडे जात चर्चा करून निर्णय घेतला."
 
8) सोनिया गांधींचा शिवसेनेसोबत जाण्यास विरोध
शिवसेनेसोबत जाण्याचा विषय सोनिया गांधीसमोर मांडल्यावर त्यांनी म्हटलं, की शिवसेना मर्यादित दृष्टिकोन असलेला पक्ष असल्यानं आपण त्यांच्यासोबत जाऊच शकत नाही. त्यांना मी सांगितलं, की काँग्रेसनं टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही. इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केल्यावर बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेनं एनडीएसोबत असतानाही पाठिंबा मिळाला होता. या सर्व गोष्टी सोनिया गांधींच्या निदर्शनास आणल्या.
 
9) सोबत येण्याची मोदींकडून ऑफर
मोदींना शेतकरी संकटाबद्दल बऱ्याच दिवसांपूर्वी वेळ मागितली होती. त्यांनी याच वेळेला वेळ दिली. कदाचित त्यांच्या कार्यलयाला वाटलं असेल, की यावेळी वेळ दिल्यामुळे गैरसमज वाढतील.
 
ती बैठक संपल्यानंतर मी उठायला लागलो तेव्हा पीएम म्हणाले, की आपण एकत्र येऊन काम केलं तर मला आनंद होईल. मी म्हटलं आपले व्यक्तिगत संबंध उत्तम आहेत, ते राहतील. पण एकत्र काम करणं राजकीयदृष्ट्या मला शक्य नाही. मी म्हटलं राष्ट्रीय प्रश्न आले तर विरोधासाठी विरोध करणार नाही. त्याची चिंता करू नका. मी त्यांना विनम्रतेने सांगून मी निघालो. ज्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही त्याची चर्चा का करायची.
 
10) सुप्रियाला मंत्रिपदाची ऑफर होती
मोदींनी मला राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली नव्हती. हे जरूर सांगितलं होतं, की तुमच्यासोबत काम करायला आनंद होईल आणि सुप्रिया संसदेत चांगलं काम करते, तिलाही मंत्रिमंडळात सहभागी करण्यात मला आनंद होईल. पण राष्ट्रपती करण्याबाबत सांगितलं नव्हतं आणि माझ्याही ते मनात नाहीत.
 
11) उद्धव ठाकरेंना पवारांचा आदेश
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला अजिबात तयार नव्हते. पण तीन पक्षांमध्ये सहज एकवाक्यता होऊ शकते, असं त्यांचंच नाव होतं. अखेर मी म्हटलं, की माझा आदेश आहे. ते म्हणाले, की तुम्ही आदेश आहे असं म्हणता तर मी स्वीकार करतो.
 
12) अमित शाहांना पराभूत कसं केलं?
नरेंद्र मोदींची चिंता नाही. मात्र अमित शाहांबद्दल काळजीपूर्वक पावलं टाकावी लागतील. अमित शाहांची अशी पावलं होती, की काहीही झालं तरी महाराष्ट्र हाती घ्यायचा. ही लढाई सोपी नाही. इथे निव्वळ आक्रमकता चालत नाही, बुद्धिमत्ताही पाहिजे आणि जनमानसाचा पाठिंबाही पाहिजे. या तीन गोष्टी एकत्र असल्या तर आपण त्यांचा पराभव करू शकतो, ही भूमिका माझ्या मनात ठाम होती.