शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (11:39 IST)

...म्हणून अजित पवारांवर विश्वास ठेवला होता

शरद पवार यांनी भाजपवर डाव उलटवला अशी चर्चा असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या घडामोडींवर मौन सोडले आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते असल्याने भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, असे शहा यांनी सांगितले. 
 
निवडणूक निकालानंतर राज्यात तब्बल महिनाभर रंगलेल्या राजकीय नाट्याचा मंगळवारी शेवट झाला. भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यंत्रिपदाची शपथ घेणार्‍या अजित पवार यांनी माघार घेऊन राजीनामा
दिल्यामुळे भाजपचे सरकार अवघ्या 80 तासांत कोसळले. त्यानंतर आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आज (गुरूवारी) शपथ घेणार आहेत. 
 
अचानक फिरलेल्या राजकारणावर पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी तूर्त काही बोलण्यास नकार दिला. योग्यवेळी योग्य ते बोलेन, असे ते म्हणाले. मात्र, अमित शहा यांनी भाष्य केले. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते होते. सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता.
 
भाजपला पाठिंबा देताना राज्यपालांनी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली होती. राष्ट्रवादीने सुरुवातीला जेव्हा सरकार बनविण्यास असर्थता व्यक्त केली होती. तेव्हा राज्यपालांना दिलेल्या पत्रावर अजित पवार यांचीच सही होती. आमच्या समर्थनासाठी त्यांनी दिलेल्या पाठिंबा पत्रावरदेखील त्यांची सही होती. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला, असे ते म्हणाले. अजित पवारांवरआरोप असलेल्या कुठल्याही प्रकरणाची फाइल बंद करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
दरम्यान, फडणवीस यांची गणिते चुकल्याने पक्षातील त्यांच्या विरोधकांनी उचल खाल्ली आहे. पक्षात
पद्धतशीरपणे साइडलाइन केले गेलेले व निवडणुकीत तिकीटही नाकारले गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील नेतृत्वावर टीकेची तोफ डागली आहे. त्यामुळे फडणवीस यांना पुढे अडचणींना तोंड द्यावे  लागण्याची शक्यता आहे.