मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 25 सप्टेंबर 2019 (16:38 IST)

शरद पवार: शिखर बँक घोटाळा प्रकरणी म्हणाले 'दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही'

महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालय अर्थात EDने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याचं अद्याप स्पष्ट नाही, पण या प्रकरणी आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याचं पवारांनी बुधवारी दुपारी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. मी स्वत: शुक्रवारी दुपारी 2 वाजता EDच्या ऑफिसला जाणार, असंही ते यावेळी म्हणाले.
 
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर MRA पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल झाला आहे.
 
25 हजार कोटींचा हा कथित घोटाळा असल्याचं सुरिंदर अरोरा यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. हा कथित घोटाळा उघड झाल्यानंतर 2001 मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते आणि चौकशीचे आदेशही दिले होते.
 
शरद पवार काय म्हणाले -
पूर्ण सहकार्य केलं जाईल. नक्की गुन्हा काय आहे, हे समजून घेतलं पाहिजे. मी निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात वेळ देणार आहे. गेल्या आठ-दहा दिवस मी यातच आहे.
मुंबईबाहेर मी जास्त काळ असेन. अशा प्रकारे EDला माझ्याशी काही बोलायचं असेल आणि मी उपलब्ध नसेल तर मी कुठल्या अदृश्य ठिकाणी गेलो, असा त्यांचा गैरसमाज होऊ नये म्हणून शुक्रवारी दुपारी 2 वाजता मुंबईच्या ईडीच्या ऑफिसात जाणार आहे.
EDच्या कार्यालयात शुक्रवारी जाणे आणि काय असेल तो पाहुणचार स्वीकारणे, हेच माझं पुढचं पाऊल! EDने मला बोलावलंय नाही. पण अशी कारवाई केल्याचं अधिकृत स्टेटमेंट माझ्यापर्यंत आलेलं नाही. पण त्यांनी असा निर्णय घेतलेला असेल तर त्यांना पूर्ण सहकार्य कऱण्यासाठी मी जाणार आहे.
माझ्यासंदर्भातील माहिती जी काही आवश्यक असेल ती देईनच. पाहुणचार असेल तोही घेईन. जी चौकशी सुरू आहे, ती करण्याचा त्यांना अधिकार आहे. मी त्यांना पूर्णच सहकार्य करेन. मात्र दिल्लीच्या तख्तसमोर महाराष्ट्र झुकत नाही.
मी महात्मा फुले. राजश्री शाहू आणि आबेंडकरांवर विश्वास ठेवणारा आहे. संविधानावर पूर्ण विश्वास ठेवणारा व्यक्ती. हा माझा सहकार्याचा हात EDला निश्चितपणाने देता येईल.
राज्य सरकारी बँकेच्या संचालक मंडळात अनेक पक्षाचे नेते होते. मी कुठेही संचालक राहिलेलो नाही. पण संस्थांचे महाराष्ट्राचे प्रश्न माझ्याकडे आले तर मी भूमिका घेत असतो.
खडसे पाठपुरावा करत होते, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आरोपपत्रात पवारांचं नाव नाही. तेव्हा कुणाची नावं होती आणि आता कुणाची घातलीत, हे त्यांनाच जास्त चांगलं माहिती आहे.
कारवाई सुडापोटी होतेय का, या खोलात मी जाऊ इच्छित नाही. मला महाराष्ट्रात जो काही अभूतपूर्व प्रतिसाद लाभतोय, तो पाहिल्यानंतर सूडबुद्धीची शंका अनेकांना येते. माझ्याकडे त्याची माहिती नाही.
निवडणुका आहेत आणि नेमका हा विषय निघणं, यात लोकच काय ते समजतायत.
 
काल रात्र आलेल्या या बातमीनंतर बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईच्या ED कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात त्यांनी EDच्या नावाने शिमगा काढला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती मिळाली आहे. तसंच काही पदाधिकाऱ्यांची धरपकडही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. "राज्य सरकार सुडानं वागतंय, कुणाला टार्गेट करतंय असं वाटणं चुकीचं आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ही कारवाई चाललेली आहे. यात राज्य सरकारचा हस्तक्षेप नाही," असंही ते म्हणाले.
 
"नियमांनुसार शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठा आर्थिक गुन्हा असेल तेव्हाच EDला त्याची दखल घ्यावी लागते. ED वेगळा FIR करत नाही. शंभर कोटीपेक्षा जास्त मोठ्या गुन्ह्याचा FIR थेट ईडीकडे जातो. ही तक्रार EDकडे गेली आणि त्यानुसार EDने प्राथमिक कारवाई केलेली आहे.
 
"यासंदर्भात चौकशी होईल, चौकशीत कुणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल, जे दोषी नसतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही. म्हणून आम्हाला गुंतवलं जातंय अशा प्रकारची तक्रार करणं बरोबर नाही," असं ते म्हणाले.
 
"राज्य सरकारने हे केलेलं नाही, राज्य सरकार अशा गोष्टी करत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची महायुती 100 टक्के निवडणुका जिंकणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. ते सगळ्यांना माहिती असताना राज्य सरकारला असे प्रकार करण्याची कुठलीही आवश्यकताच नाही. राजकारण कळणाऱ्या व्यक्तीला हे नक्कीच समजू शकतं, जिंकणारी लोकं, अशा प्रकारे कधीच करणार नाहीत. अकारण आमच्या सरकारवर आरोप लावणं चुकीचं आहे," असं फडणवीस म्हणाले.