शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 25 सप्टेंबर 2019 (10:52 IST)

पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकेच्या टीमने जेव्हा बंदुकीच्या गोळ्या, ग्रेनेड, रॉकेटचा मारा झेलला होता...

श्रीलंकेचा क्रिकेट संघ वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानमध्ये दाखल झाला आहे. दहा वर्षांपूर्वी जे घडलं होतं त्या जखमेचे व्रण अजूनही भरलेले नाहीत. काय घडलं होतं तेव्हा?
 
लाहोरमधल्या त्यांच्या हॉटेलला सुरक्षारक्षकांनी वेढा दिला होता. टेस्टचा दुसरा दिवस त्यांच्या बॅट्समननी गाजवला होता. पाकिस्तानला रोखायचं कसं याच्या योजना मनात आखत श्रीलंकेचे खेळाडू आवरून बसमधून गड्डाफी स्टेडियमच्या दिशेने निघाले. या बसच्या बरोबरीने अंपायर्स आणि मॅचरेफरी यांना घेऊन जाणारी मिनीव्हॅनही होती.
 
गाड्यांचा ताफा लिबर्टी स्क्वेअर याठिकाणी पोहोचला. काही कळायच्या आत, बंदुकीच्या गोळ्यांनी परिसर निनादून गेला. या परिसरात लपलेल्या 12 कट्टरतावाद्यांनी श्रीलंकेच्या खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला केला होता.
 
सुरुवातीला त्यांनी बसच्या चाकांना लक्ष्य केलं. त्यानंतर त्यांनी बसच्या दिशेने थेट हल्ला केला. काहीतरी भयंकर घडतंय हे लक्षात आल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी बसमध्येच खाली वाकत, आडवं पडत बचाव केला.
 
कट्टरतावाद्यांनी हल्ला केल्यानंतर या बसच्या रक्षणासाठी असलेल्या पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल हल्ला चढवला. एखाद्या हॉलीवूडपटात दाखवली जाते अशी धूमश्च्रकी झाली. या गोळीबारात सहा पोलीस आणि दोन सर्वसामान्य नागरिकांना जीव गमवावा लागला. कट्टरतावाद्यांनी बसच्या दिशेने रॉकेटही दागलं होतं. मात्र सुदैवाने ते एका इलेक्ट्रिकच्या खांबाला जाऊन धडकलं.
 
श्रीलंकेच्या खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसचा ड्रायव्हर मेहर मोहम्मद खलीलने प्रसंगावधान दाखवत बस सुरूच ठेवली. हल्ला झाल्यानंतरही त्याने बस स्टेडियमच्या दिशेने नेली. यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंचे प्राण वाचले. हल्लेखोऱ्यांनी बसच्या खालच्या बाजूस ग्रेनेड फेकलं होतं. सुदैवाने ते बस त्याठिकाणाहून निघून गेल्यावर फुटल्याने जीवितहानी टळली.
 
अंपायर आणि मॅचरेफरी यांना घेऊन जाणाऱ्या मिनीव्हॅनवरही हल्ला करण्यात आला होता. या गाडीत सायमन टॉफेल, स्टीव्ह डेव्हिस, नदीम घौरी, अहसान रझा, अंपायर्स परफॉर्मन्स मॅनेजर पीटर मॅन्युअल, लायसन अधिकारी अब्दुल सामी आणि मॅचरेफरी ख्रिस ब्रॉड होते. हल्ल्यात मिनीव्हॅन चालकाचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळीने अहसान रझा जखमी झाले. त्यांच्या शरीरातून बरंच रक्त वाहिलं. ख्रिस ब्रॉड यांनी त्यांना आधार दिला. सुरक्षारक्षकांनी व्हॅनवर ताबा मिळवून गाडी स्टेडियमच्या दिशेने नेली.
 
सुरक्षा यंत्रणांकडील कॅमेऱ्यात अत्याधुनिक शस्त्रं आणि सॅक पाठीवर घेऊन आलेले कट्टरतावादी पाहायला मिळाले. ते सगळे सकाळी 8.39वाजता त्या परिसरात पोहोचले. हल्ल्याचा व्हीडिओ जगभर प्रसारित झाला आणि एकच खळबळ उडाली. कट्टरतावाद्यांकडे एके-47, हँड ग्रेनेड, आरपीजी लाँचर्स, क्लेमोयर्स आणि ज्वालाग्राही स्फोटकं होती.
 
अनपेक्षित अशा या जीवघेण्या हल्ल्याने श्रीलंकेचे खेळाडू, अंपायर्स-मॅचरेफरी हादरून गेले. श्रीलंकेच्या खेळाडूंना स्टेडियमध्ये नेण्यात आलं. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांना मैदानातूनच पाकिस्तान हवाई दलाच्या मी-17 हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्यात आलं. विमानतळावरही कोलंबोला जाणाऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली आणि हल्ला झाल्याच्या काही तासात श्रीलंकेचा संघ मायदेशी परतला. अंपायर्स आणि मॅचरेफरी यांचीही त्यांच्या मायदेशात जाण्याची तात्काळ व्यवस्था करण्यात आली.
 
हल्ल्याचा व्हीडिओ जगभर प्रसारित झाला आणि एकच खळबळ उडाली. श्रीलंकेचे खेळाडू तसंच अंपायर्स-मॅचरेफरी यांच्यासाठी जगभरातून प्रार्थना करण्यात आल्या. एखाद्या पाहुण्या संघावर अशा पद्धतीने जीवघेणा हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ होती.
 
श्रीलंकेच्या संघातील थिलान समरावीरा, कुमार संगकारा, थारंगा पर्णविताना, अजंथा मेंडिस, चामिंडा वास, महेला जयवर्धने, सुरंगा लकमल यांचा जखमींमध्ये समावेश होता.
 
समरावीरा आणि पर्णविताना यांच्या दुखापती गंभीर असल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आवश्यक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं.
 
बसला स्टेडियमपर्यंत नेत श्रीलंकेच्या खेळाडूंचा जीव वाचवण्यात मोलाची भूमिका बजावणारे बसचालक खलील यांना त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी 'तम्घा-ए-शुजात' पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
हल्ल्याची पार्श्वभूमी
सुरक्षिततेच्या मुद्यावरून पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय संघ खेळण्यास नकार देत. मे 2002 मध्ये न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी न्यूझीलंडचा संघ ज्या हॉटेलात थांबला होता त्याच्यासमोर आत्मघातकी बाँबस्फोट झाला. न्यूझीलंडचा संघ दौरा रद्द करून मायदेशी परतला. मात्र पुढच्या वर्षी म्हणजे 2003 मध्ये न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानला गेला. सुरक्षिततेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला जाणं नाकारलं होतं.
 
2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं कारण देत भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला. हाय प्रोफाईल मालिका रद्द झाल्याने पाकिस्तानचं आर्थिक नुकसान झालं. ते भरून काढण्यासाठी आयत्या वेळी श्रीलंकेला निमंत्रण देण्यात आलं.
 
श्रीलंकेचा संघ त्या दौऱ्यात तीन वनडे आणि दोन टेस्ट खेळणार होता. श्रीलंकेने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. कराची इथं झालेली पहिली टेस्ट अनिर्णित झाली होती. श्रीलंकेने 644 धावा केल्या. महेला जयवर्धने (240) तर थिलान समरावीरा (231) यांनी द्विशतकी खेळी साकारल्या.
 
पाकिस्तानने 765 धावांचा डोंगर उभारला. युनिस खानने 313 धावांची विक्रमी खेळी केली. कामरान अकमलने 158 धावा केल्या. श्रीलंकेने दुसऱ्या डावात 5 बाद 144 अशी मजल मारली. युनिस खानला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. दोन्ही संघांना आघाडी घेता आली नाही.
 
'त्या' मॅचचं आणि सीरिजचं काय झालं?
 
दहशतवादी हल्ल्याचा फटका बसलेल्या त्या टेस्टमध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्या अंगलट आला कारण श्रीलंकेने 606 धावांचा डोंगर उभारला. थिलान समरावीराने सलग दुसऱ्या सामन्यात द्विशतकी खेळी केली. त्याने 214 धावांची मॅरेथॉन खेळी केली. कर्णधार संगकाराने 104 तर तिलकरत्ने दिलशानने 145 धावांची खेळी केली. पाकिस्तानतर्फे उमर गुलने 6 विकेट्स घेतल्या.
 
दुसऱ्या दिवसअखेर पाकिस्तानने 1 बाद 110 असं खणखणीत प्रत्युत्तर दिलं होतं. तिसऱ्या दिवशी हल्ला झाल्यानंतर मॅच रद्द करण्यात आली. स्कोअरकार्डमध्ये या टेस्टचा निकाल अनिर्णित असा दाखवण्यात येतो. मालिकेचा निकाल 0-0 असा नोंदवण्यात आला.
 
कट्टरवादी हल्ल्यामुळे सामना रद्द होण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
 
हल्ला कोणी केला?
हल्ला झाल्यानंतर लगेच लष्कर-ए-तय्यबा संघटनेवर संशयाची सुई होती. पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी अल कायदा संघटनेवर संशय व्यक्त केला.
 
श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या हल्ल्यामागे एलटीटीईचा (लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ इलम) हात असू शकतो असं मत व्यक्त केलं होतं. काही युरोपीय गुप्तचर संघटनांनी या मताला दुजोरा दिला होता.
 
हल्ला होऊ शकतो असा इशारा देण्यात आला होता, मात्र सुरक्षा यंत्रणांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं. या हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि अन्य कट्टरवादी 2016 मध्ये करण्यात आलेल्या एका ऑपरेशनदरम्यान मारले गेले.
 
हल्ल्याचा परिणाम; पाकिस्तानचा दौरा करण्यास संघांचा नकार
या भीषण हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय संघांनी पाकिस्तानमध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव खेळायला नकार देण्यास सुरुवात केली. यामुळे पाकिस्तानला मायदेशात होणाऱ्या मालिकांचे सामने दुबई, शारजा आणि अबू धाबी याठिकाणी खेळावे लागले. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे काही सामने तर इंग्लंडमध्ये लॉर्ड्स आणि हेडिंग्ले अशा तटस्थ ठिकाणी खेळवण्यात आले.
 
2015 मध्ये म्हणजेच हल्ल्यानंतर सहा वर्षांनंतर झिम्बाब्वेने पाकिस्तानात खेळण्याची तयारी दर्शवली. अभूतपूर्व सुरक्षेत वनडे आणि ट्वेन्टी-20 सामने खेळवण्यात आले. दौरा निर्विघ्नपणे पार पडला.
 
दोन वर्षांनंतर पाकिस्तान सुपर लीगची फायनल लाहोरच्या गड्डाफी स्टेडियमध्ये खेळवण्यात आली. दोन्ही संघांपैकी डेव्हिड मलान, मार्लन सॅम्युअल्स, डॅरेन सॅमी, ख्रिस जॉर्डन, मॉर्न व्हॅन व्हॅक, शॉन अर्व्हाइन, रायद इमरिट हे विदेशी खेळाडू पाकिस्तानात खेळले.
 
पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतावं यासाठी पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन असे तीन सामने खेळवण्यात आले. श्रीलंका आणि पाकिस्तान यांचा दौरा युएईत झाला, मात्र शेवटची मॅच पाकिस्तानात खेळवण्यात आली. गेल्या वर्षी पाकिस्तान सुपर लीगचे तीन सामने खेळवण्यात आले. काही महिन्यांनंतर वेस्ट इंडिज संघाने पाकिस्तानचा छोटेखानी दौरा केला.
 
आता दौरा का?
आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांनुसार प्रत्येक संघाला अन्य संघाशी खेळणं अनिवार्य असतं. फ्यूचर टूर प्रोग्रॅम अंतर्गत दौऱ्यांची आखणी होते. त्यानुसार श्रीलंकेला यंदा पाकिस्तानचा दौरा करणे अपेक्षित आहे.
 
या दौऱ्यात श्रीलंकेचा संघ तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 खेळणार आहे. हा टप्पा निर्विघ्नपणे पार पडला तर श्रीलंकेचा संघ टेस्ट मॅचेससाठी पुन्हा एकदा पाकिस्तानचा दौरा करेल.
 
श्रीलंकेच्या अनेक खेळाडूंची माघार; पर्यायी संघाची घोषणा
दहा वर्षांपूर्वी जे घडलं ते श्रीलंकेचे खेळाडू विसरलेले नाहीत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सुरक्षिततेसंदर्भात हमी देऊनही श्रीलंकेच्या दहा खेळाडूंनी माघार घेतली आहे.
 
निरोशन डिकवेला, कुशल परेरा, धनंजय डिसिल्व्हा, थिसारा परेरा, अकिला धनंजया, लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, सुरंगा लकमल, दिनेश चंडिमल, दिमुथ करुणारत्ने यांनी दौऱ्याच्या वनडे आणि ट्वेन्टी-20 टप्प्यातून माघार घेतली आहे.
 
इतक्या खेळाडूंनी माघार घेतल्यानंतरही श्रीलंका बोर्डाने दौऱ्याचा हट्ट सोडला नाही. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने वनडे संघाचं नेतृत्व लहिरू थिरिमानेकडे तर ट्वेन्टी-20 संघाची धुरा दासून शनकाकडे सोपवली आहे.
 
प्रमुख खेळाडूंनी माघार घेतल्याने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
 
या दौऱ्याला टेरर अलर्ट
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान दौऱ्यासाठी संघ जाहीर केल्यानंतर, श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाने या दौऱ्याला असलेला टेरर अलर्ट उघड केला आहे.
 
श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली. श्रीलंकेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना हल्ला होऊ शकतो असं पाकिस्तानातील काही विश्वसनीय सूत्रांकडून समजल्याचं पत्रकात म्हटलं आहे.
 
दौऱ्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने काळजीपूर्वक विचार घ्यावा, परिस्थितीचा पुन्हा आढावा घ्यावा असं पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे.
 
दरम्यान श्रीलंकेतील या घडामोडींवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्वीट केलं आहे. श्रीलंका संघाच्या दौऱ्यादरम्यान कोणत्याही हल्ल्याच्या शक्यतेसंदर्भात माहिती मिळालेली नाही, असं पीसीबीने म्हटलं आहे.
 
आयसीसीकडून अंपायर्स-मॅचरेफरींची घोषणा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या मालिकेसाठी अंपायर्स आणि मॅचरेफरींची घोषणा केली आहे. वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड बून मॅचरेफरी असतील तर जोएल विल्सन आणि मायकेल गॉग अंपायर्स असतील. होम अंपायर म्हणून अलीम दार, अहसान रझा, सोझैब रझा आणि आसिफ याकूब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.