1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (14:51 IST)

Sidharth Shukla ची मृत्यूआधी लिहिलेली 'ही' होती अखेरची पोस्ट

बिग बॉस-13 चा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे.
 
"साधारण साडेदहाच्या आसपास सिद्धार्थला रुग्णालयात आणण्यात आलं, तेव्हाच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप लगेच सांगता येणार नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच त्याबाबत अधिक माहिती देता येईल," असं कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी बीबीसीला सांगितलं आहे.
 
30 ऑगस्टला सिद्धार्थ शुक्लाने केलेलं ट्वीट त्याची अखेरची सोशल मीडिया पोस्ट ठरली. पॅरालिंपिकमध्ये अवनी लेखरा आणि सुमित अंतील यांनी भारतासाठी सुवर्ण पदक मिळवल्यानंतर सिद्धार्थने ही पोस्ट लिहिली.
 
भारतीयांची अभिनास्पद कामगिरी असं म्हणत या दोघांचं कौतुक त्याने केलं होतं. तसंच सुवर्ण पदकासोबत विश्व विक्रम केल्याचाही उल्लेख त्याने केला होता.
 
सिद्धार्थ शुक्ला एक लोकप्रिय अभिनेता तर होताच पण बीग बॉस 13 मध्ये मोठ्या संख्येने त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली. सोशल मीडियावर गेल्या दोन वर्षांत तो सातत्याने चर्चेत राहिलेला अभिनेता आहे.
 
ट्वीटरवर सिद्धार्थ शुक्लाचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर 3.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.
 
22 ऑगस्टला सिद्धार्थने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यात त्याने आपल्या चाहत्यांना धन्यवाद म्हटलं. सोशल मीडियावर माझी सुरक्षा करण्यासाठी आणि कायम माझ्यासोबत राहण्यासाठी धन्यवाद, असं तो म्हटला होता.
 
सिद्धार्थ शुक्लाने 23 जुलै रोजी केलेल्या ट्वीटचीही आता चर्चा होत आहे. या ट्वीटमध्ये त्याने लिहिलं आहे की, "नाम करो तो कुछ ऐसा की लोग तुम्हे हराने की कोशीश नहीं बल्की साझीश करे."
 
तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा मिळवल्यानंतरही सिद्धार्थने आपलं मत जाहीरपणे मांडलं होतं. आपल्या ट्वीटमध्ये त्याने अफगाणिस्तानात ज्या महिला आपल्या हक्कासाठी उभ्या राहिल्या त्यांना त्याने सलाम केला. तर इन्स्टाग्रामवरही आपला फोटो पोस्ट करत अफगाणिस्तानसाठी दु:ख व्यक्त केलं.
 
सिद्धार्थ सातत्याने ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर सक्रिय होता. पण बिग बॉसमध्ये असताना आपल्याला सोशल मीडियातील अनेक गोष्टी आजही कळत नसल्याचं त्याने म्हटलं होतं. इन्स्टाग्राम लाईव्ह कसं करायचं याबाबतही त्याने आपला अनुभव शेअर केला होता.
 
सोशल मीडियावर होणारी तुलना गंभीरतेने घेऊ नका, असा सल्लाही सिद्धार्थने काही दिवसांपूर्वीच आपल्या चाहत्यांना दिला होता. याबाबत ट्विट करताना त्याने मुंगी आणि हत्तीचे इमोजी वापरत सोशल मीडियावर मुंगी सुद्धा हत्तीपेक्षा मोठी दिसते, असं ट्वीट केलं होतं.
 
देशासह परदेशातही सिद्धार्थ शुक्लाचे चाहते मोठ्याप्रमाणावर आहेत. विशेषत: बिग बॉस 13 मध्ये सिद्धार्थ आणि त्याची मैत्रीण शेहनाज गिल यांची जोडी सुपरहीट ठरली होती. त्यामुळे दोघांच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. या जोडीला त्यांच्या चाहत्यांनी 'सिदनाझ' असं विशेष नाव दिलं होतं.
 
#SIDNAAZ या ट्रेंडने गेल्या काही काळात बॉलीवूडमधील सुपरहीट जोडींनाही मागे टाकलं होतं. दोघांनी काही दिवसांपूर्वीच डान्स दिवाने या रिअॅलिटी शोला हजेरी लावली होती.
 
बिग बॉसनंतरही सिद्धार्थ आणि शेहनाज अनेकदा एकत्र दिसले. दोघांचे दोन म्यूजिक अॅल्बम वर्षभरात प्रसिद्ध झाले. दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचीही चर्चा कायम सुरू होती. मात्र दोघांनीही आम्ही केवळ मित्र आहोत, असं स्पष्ट केलं होतं.