शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जुलै 2020 (14:36 IST)

खऱ्या सुरमा भोपालीने जगदीप यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती तेव्हा

अभिनय आणि विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या जगदीप (सैयद इश्तियाक अहमद जाफरी) यांचं निधन झालंय. बुधवारी (8 जुलै) संध्याकाळी मुंबईतल्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.
 
ते 81 वर्षांचे होते. कॅन्सर आणि वृद्धत्वाच्या व्याधींनी त्यांना ग्रासलं होतं. बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमार त्यांचं निधन झालं आणि गुरुवारी (9 जुलै) सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं जगदीप यांच्याशी कौटुंबिक संबंध असणारे प्रोड्युसर महमूद अली यांनी सांगितलंय.
 
जगदीप यांच्या निधनाबद्दल बॉलिवुडमधून शोक व्यक्त करण्यात येतोय.
 
आणखीन एक तारा आकाशात गेल्याचं अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलंय.
 
तर जॉनी लिव्हर यांनी जगदीप यांना श्रद्धांजली वाहत आपण आपल्या पहिल्याच सिनेमात या दिग्गज अभिनेत्यासोबत काम केल्याचं म्हटलंय.
 
जगदीप यांच्या आठवणी जागवत अभिनेता अजय देवगणने ट्वीट केलंय, "जगदीप साहेबांच्या निधनाची दुःखद बातमी आताच समजली. त्यांना स्क्रीनवर पाहणं हा नेहमीच आनंददायी अनुभव होता. जावेद आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. जगदीप साहेबांना नमन."
 
अभिनेते जगदीप यांनी बॉलिवुडच्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये केलेल्या भूमिका लोकप्रिय झाल्या. 'शोले' मधलं त्यांनी वठवलेलं सूरमा भोपालीचं पात्र अजूनही लोकांच्या लक्षात आहे. 'अंदाज अपना अपना' या सिनेमातली त्यांची भूमिकाही अतिशय लोकप्रिय होती.
 
सिने दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी ट्वीट केलंय, "सात दशकं आपलं मनोरंजन करणाऱ्या जगदीप साहेबांचं निधन झाल्याचं ऐकून वाईट वाटलं. जावेद - नावेद आणि पूर्ण जाफरी कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे."
 
जगदीप यांनी जवळपास 400 सिनेमांमध्ये काम केलं. त्यांचं मूळ नाव होतं - सैयद इश्तियाक अहमद जाफरी. 29 मार्च 1939 ला त्यांचा जन्म झाला. प्रसिद्ध अभिनेते जावेद जाफरी आणि नावेद जाफरी हे त्यांचे मुलगे आहेत.
 
1951 मध्ये बी. आर. चोप्रांच्या 'अफसाना' या सिनेमापासून जगदीप यांनी त्यांच्या फिल्म करियला सुरुवात केली. या सिनेमात जगदीप एक बाल कलाकार होते. यानंतर अब दिल्ली दूर नहीं, मुन्ना, आर पार, दो बीघा जमीन आणि हम पंछी एक डाल के या सिनेमांतही त्यांनी भूमिका केल्या.
 
अशी झाली सिनेक्षेत्रात एन्ट्री
वर्षं होतं 1953 आणि सिनेमा होता बिमल रॉय यांचा - दो बिघा जमीन. बलराज सहानी आणि निरुपा रॉय यांच्यासारखे दिग्गज कलाकार सिनेमात होते. बलराज सहानींनी आपल्या अभिनयाने हा सिनेमा गाजवला होता.
 
पण या सगळ्या दिग्गजांसोबतच एका बालकलाकाराने आपल्या अभिनयाने सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं. हा होता लालू उस्ताद नावाचा बूट पॉलिश करणारा एक लहान मुलगा.
 
हाच लालू उस्ताद पुढे जाऊन जगदीप म्हणून ओळखला जाऊ लागला आणि विनोदी भूमिकांसाठी ओळखला जाऊ लागला.
 
1975 मध्ये आलेल्या 'शोले'मधल्या सूरमा भोपालीच्या भूमिकेसाठी जगदीप यांना बहुतेकजण ओळखतात. पण त्यांची कारकीर्द लहान वयातच सुरू झाली होती. बालकलाकार म्हणून त्यांनी गुरुदत्तच्या आर-पार सारख्या सिनेमात काम केलं होतं.
 
विनोदी भूमिकांवरून ओळखल्या जाणाऱ्या जगदीप यांनी कधी काळी सिनेमांत मुख्य हिरोची भूमिकाही केली होती. 1957 मध्ये आलेल्या 'भाभी' सिनेमात जगदीप आणि तेव्हा नवख्या असणाऱ्या नंदावर चित्रित करण्यात आलेलं 'चली चली रे पतंग मेरी चली रे' गाणं तेव्हा गाजलं होतं.
 
तर 'पुनर्मिलन' सिनेमात रफीजींनी गायलेल्या 'पास आओ तबीयत बहल जाएगी' या गाण्यात पडद्यावर जगदीप यांचा रोमँटिक अंदाजही पहायला मिळाला होता.
 
जगदीप यांना खरी ओळख मिळवून दिली ती 1960च्या दशकात आलेल्या 'ब्रह्मचारी' सारख्या सिनेमांतल्या भूमिकांनी. या सिनेमातली त्यांची मुरली मनोहरची भूमिका वाखाणण्यात आली होती.
 
सुरमा भोपालीवरून नोटीस
पण जगदीप यांना घराघरांत नेलं ते सूरमा भोपालीने. 'हमारा नाम भी सूरमा भोपाली ऐसे ही नहीं है...' हे वाक्य ट्रेडमार्क बनलं.
 
गंमत म्हणजे संपूर्ण शोले चित्रित झाला होता आणि त्यात सूरमा भोपालीचा उल्लेखही नव्हता. तब्बसुम यांना दिलेल्या मुलाखतीत जगदीप यांनी सांगितलं होतं, "मला सिप्पीजींचा फोन आला. मी म्हटलं तुमची फिल्मतर शूट झालेली आहे. ते म्हणाले नाही, तुम्ही या. खरे सीन्स अजून बाकी आहेत."
 
खरंतर सुरमा भोपालीचा हा किस्सा खऱ्या शोलेच्या 20 वर्षं आधीच सुरू झाला होता. जगदीप एका फिल्मचं शूटिंग करत होते. यात हिरो होते सलीम खान. जावेद अख्तरही या सिनेमाशी संबंधित होते. जावेद अख्तर जगदीप यांना भोपाली लहेज्यात किस्से सांगत. तेव्हापासून जगदीप यांच्या मनात हा लहेजा बसला होता. नाहर सिंह नावाच्या एका वनाधिकाऱ्यावरून हे पात्र प्रेरित होतं.
 
हे प्रकरण इतकं वाढलं की नाहर सिंह यांनी नोटीस पाठवली आणि जगदीपना भेटायला ते सेटवर दाखल झाले. कसंबसं ते प्रकरण संपवण्यात आलं.
 
हे पात्र इतकं लोकप्रिय झालं की नंतर 1988 मध्ये जगदीप यांनी सूरमा भोपाली नावाचा एक अख्खा सिनेमाच तयार केला.
 
धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांनी यात लहानशी भूमिका केली होती. सोबत सांभा आणि कालियाही होते. हा सिनेमात देशात इतरत्र चालला नसला तरी भोपाळमध्ये चांगला चालला.
 
अंदाज़ अपना अपना
सूरमा भोपालीचं पात्र जगदीप यांना यश आणि प्रसिद्धी देऊन गेलं आणि त्यांच्या कारकीर्दीतला अडथळाही ठरलं. अंदाज अपना अपना सिनेमात त्यांनी सलमान खानच्या वडिलांची भूमिका केली. यातही त्यांचं नाव भोपाली होतं - बांकेलाल भोपाली.
 
जगदीप, महमूद आणि देवेन वर्मा या 3 दिग्गजांना एकत्र पाहण्याची संधी या सिनेमाने रसिकांना दिली.