शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 10 मे 2022 (15:21 IST)

श्रीलंका : सरकारविरोधी आंदोलकांनी राजपक्षेंचं घर पेटवलं, एका खासदाराचा मृत्यू

Sri Lanka - Violence
आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेत सरकार विरोधी आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांच्या वडिलोपार्जीत घरासह सत्ताधारी पक्षाच्या 15 हून अधिक सदस्यांची घरं आणि कार्यालय आंदोलनकर्त्यांनी जाळली आहेत.
 
हिंसा वाढत असल्याने राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांनी सोमवारी (9 मे) रात्री दोन दिवसांसाठी कर्फ्यू लागू केला आहे. तसंच पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर आंदोलनकर्त्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न लष्कर आणि पोलिसांकडून केला जात आहे. यावेळी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.
 
देशभरात सुरू असलेल्या हिंसेदरम्यान झालेल्या गोळीबारात एका खासदारासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 190 हून अधिक लोक जखमी झाल्याचंही वृत्त आहे.
 
दरम्यान, श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांनी कार्यालय सोडावं यासाठी जनतेकडून दबाव टाकला जात आहे.
 
श्रीलंकेत गेल्या महिन्याभरापासून वाढती महागाई आणि वीज कपात यावरून आंदोलन सुरू आहे. 1948 साली श्रीलंकेला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आतापर्यंतचे हे सर्वांत गंभीर आर्थिक संकट आहे.
 
हिंसा कशी सुरू झाली?
श्रीलंकेतील मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिंदा राजपक्षे यांनी आपल्या सरकारी निवासस्थानाजवळ दिलेल्या भाषणात म्हटलं की, ते कोणत्याही आव्हानाला घाबरत नाहीत.
 
या भाषणानंतर त्यांच्या समर्थकांनी आंदोलनकर्त्यांवर हल्ला करण्यास सुरूवात केली. पोलिसांनीही जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. हा जमाव फेस ग्रीन याठिकाणी वळला जिथे गेल्या महिन्याभरापासून शांततेत आंदोलन सुरू होतं. याठिकाणी आंदोलनकर्ते आणि राजपक्षे समर्थक यांच्यात जोरदार हाणामारी झाली. पोलिसांनी अश्रूधुराच्या गोळ्या झाडल्या आणि जमावाला पांगवण्यासाठी पाण्याचा माराही सुरू केला.
 
या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरात इतर अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांच्या वाहनांवरही हल्ले झाले. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या मालमत्तेचीही अनेक ठिकाणी तोडफोड केली गेली. काही ठिकाणी जाळपोळ झाल्याच्या घटनांचीही नोंद झाली आहे.
 
राजपक्षे कुटुंबाचे हंबनटोटा येथील वडिलोपार्जीत घर आणि कुरूनेगलामधील महिंदा राजपक्षे यांचे घर जाळण्यात आले. या घटनांनंतर राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने कर्फ्यू लागू केल्याची घोषणा केली.