शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 10 मे 2022 (15:14 IST)

पाकिस्तान ऑनर किलिंग: बहिणीच्या मॉडेलिंगवर नाराज भावाने झाडली गोळी

भारतातील हैदराबाद शहरात ज्याप्रमाणे ऑनर किलिंगचा प्रकार घडला होता अगदी तसाच प्रकार पाकिस्तानची फॅशन मॉडेल सिद्रा खालिद या तरुणीबरोबर घडला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील ओकरा या भागात राहणाऱ्या सिद्रा खालिदची हत्या तिचा धाकटा भाऊ हमजा खालिद याने केली आहे. ऑनर किलिंगच्या नावाखाली सिद्राला गोळ्या घालून ठार मारल्याचा आरोप हमजावर आहे.
 
ओकरा येथील रेनाला सिटीचे एसएचओ इन्स्पेक्टर जावेद खान, म्हणाले, "सिद्रा खालिदला मॉडेलिंगची आवड होती आणि ती फैसलाबादमध्ये मॉडेलिंग करायची. ती रमजानच्या महिन्यात ओकरा येथील तिच्या घरी आली होती. ईदनंतर ती जेव्हा पुन्हा तिच्या कामावर जायला निघाली तेव्हा तिच्या जाण्यावर कुटुंबातील सदस्यांनी आक्षेप घेतला."
 
सिद्राच्या हत्येमागच्या कारणाबाबत इन्स्पेक्टर जावेद म्हणाले की, मॉडेलिंग सोडावं म्हणून कुटुंबीयांनी सिद्रावर खूप दबाव आणला होता आणि हेच हत्येचं कारण होतं. सिद्रा खालिदच्या आईच्या तक्रारीवरून या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
 
22 वर्षीय सिद्रा खालिदने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. तिला आणखी तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेल्या 20 वर्षीय हमजाने सिद्राची हत्या केली.
 
इन्स्पेक्टर जावेद खान म्हणाले, "सिद्राचे कुटुंबीय तिला मॉडेलिंग सोडून घरी राहायला सांगत होते. पण तिला मॉडेलिंगला करायचंच होतं. यातूनचं तिचा लहान भाऊ हमजाबरोबर तिचा वाद झाला."
 
हत्येच्या वेळी सिद्रा आणि हमजाचे वडीलही घरात हजर होते. त्यांनीही सिद्राला थांबवण्याचा प्रयत्न केला. सिद्राने त्यांचं ही म्हणणं ऐकून घ्यायला नकार दिल्यावर मात्र तिच्या भावाने वडिलांच पिस्तुल घेऊन गोळी झाडली. ती गोळी बरोबर सिद्राच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या भागात लागली आणि सिद्राचा जागीच मृत्यू झाला.
 
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच हत्येसाठी वापरलेल्या शस्त्रासह आरोपीला अटक केली आहे. आरोपी हमजा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या ऑनर किलिंगमध्ये कुटुंबातील इतर सदस्यांचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
 
पाकिस्तान आणि ऑनर किलिंग
मानवाधिकार संस्था, ह्युमन राइट्स वॉचने आपल्या 2021 च्या अहवालात असा अंदाज वर्तवलाय की, पाकिस्तानमध्ये दरवर्षी एक हजार महिलांची ऑनरच्या नावाखाली हत्या होते. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालात सांगितलंय की, गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगचे 478 गुन्हे दाखल झाले आहेत.
 
मात्र ऑनर किलिंगच्या नावाखाली होणाऱ्या हत्यांचे प्रमाण अधिक असल्याचं महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांचं म्हणणं आहे. कारण प्रत्येक गुन्हा पोलिसांत नोंदविला जातोच असं नाही.
 
पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने आपल्या अहवालात इस्लामाबादच्या नूर मकादमच्या हत्येचा संदर्भ देताना लिहिलंय की, 2021 मध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या महिलांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर महिला हक्क कार्यकर्त्या नूर या आणीबाणी लागू करण्याची मागणी करत होत्या.
 
पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगच्या नावाखाली होणाऱ्या हत्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यावर देशभरात चर्चाही होत आहे. ऑनर किलिंगच्या या घटनांमध्ये मृतांचे कुटुंबीय म्हणजे पती, वडील, मुलगा, भाऊ, चुलत भाऊ आणि काका यांचा सहभाग असतो. या खुनांच्या मागे असलेली कारण म्हणजे त्यांच्या आवडीनुसार लग्न करण्यापासून ते मोबाईल फोन वापरणे, सोशल मीडियावर स्वतःचे फोटो अपलोड करणे अशा गोष्टी आहेत.
 
मात्र इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, आजही पाकिस्तानमध्ये चित्रपट आणि टीव्हीमध्ये काम करणे, मॉडेलिंग करणे हा पेशा मुलींसाठी योगय असल्याचं मानलं जात नाही.
 
सिद्रा खालिदप्रमाणेच, मॉडेल कंदील बलोचची ही 2016 मध्ये तिचा भाऊ वसीम खान याने गळा दाबून हत्या केली होती. कंदील बलोच ही सोशल मीडियावर फेमस मॉडेल होती. कंदील बलोचच्या हत्येनंतर पाकिस्तानच्या संसदेत एक नवा कायदा संमत करण्यात आला. या कायद्यांतर्गत ऑनर किलिंग प्रकरणात मृताच्या कुटुंबीयांनी माफ केल्यानंतरही आरोपी शिक्षेपासून वाचू शकणार नाहीत.
 
पाकिस्तानच्या प्रभावशाली धार्मिक नेत्यांनी इस्लामिक कायद्यांचा हवाला देऊन हा नवा कायदा गैर-इस्लामी असल्याचं म्हटलं. मात्र तरीही तो कायदा पाकिस्तानच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केला. पाकिस्तानच्या नागरिकांनीही या कायद्याचं खूप कौतुक केलं.
 
कंदील बलोच हत्या प्रकरणात तिचा भाऊ वसीम खान याला तीन वर्षांपूर्वीच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु लाहोर उच्च न्यायालयाने या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याची निर्दोष मुक्तता केली.
 
साक्षीदारांनी आपले जबाब मागे घेतल्याने आणि संबंधित पक्षकारांमधील परस्पर सामंजस्यामुळे असं घडलं. लाहोर उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कंदील बलोचच्या न्यायासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची मात्र निराशा झाली.