बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शनिवार, 20 एप्रिल 2019 (15:31 IST)

पुण्यातले सुदानचे विद्यार्थी म्हणतात, 'युद्धात फार गमावलं, आता शांतता हवी'

सुदान हा आफ्रिकेतील देश सध्या स्थित्यांतरातून जात आहे. 30 वर्षांपासून देशावर एकहाती राज्य कारणारे ओमर अल बशीर यांना लष्काराने पदच्युत केलं आहे. त्यांना पदावरून हटवल्याचा आनंद पुण्यात शिकणाऱ्या सुदानमधील विद्यार्थ्यांना आहे.
 
1989पासून बशीर सत्तेत होते. दक्षिण सुदान आणि सुदान अशी फाळणी झाल्यानंतर तिथला संघर्ष अधिकच चिघळला आहे. गेल्या काही वर्षांत गरिबी, बेरोजगारी, महागाईने कळस गाठला आहे. यामुळं अनेक नागरिकांनी इतर देशांत स्थायिक होण्याचा पर्याय स्वीकारला आहे. सुदान आणि भारताचे संबंध चांगले असल्याने सुदानमधील विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी येतात. यातील काही विद्यार्थी पुण्यातही आहेत.
 
त्यातील काही विद्यार्थ्यांशी बीबीसी मराठीने संवाद साधला आणि सुदानमधील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
मोगताब आणि अबू बक्र गेली आठ वर्षं पुण्यात राहतात. मोगताब बी. कॉमचं शिक्षण घेत आहे. मोगदाबचं घर सुदानच्या राजधानीपासून जवळ आहे.
 
त्याच्या घरापासून नाईल नदी अगदी जवळ आहे. "लहानपणी पोहायला खेळायला तिथेच असायचो" अशी आठवण तो सांगतो. मोगताबाचे वडिल शेती करतात, तर आई गृहिणी आहे. मोगताबला 7 भावंडं आहेत.
 
शालेय शिक्षण अरेबिक भाषेत झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी तो पुण्यात आला. मात्र भाषेचा मोठा अडसर समोर होता. पुण्यात पहिले सहा महिने इंग्रजी शिकल्यानंतर त्याने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याला फुटबॉल खेळायला खूप आवडतं.
 
सुदानमधील आंदोलनं, निदर्शनं या सगळयांबद्दल तो दुःखाने बोलतो. "सुदानमधील परिस्थिती अतिशय वाईट आहे. बशीर यांचं सरकार गेलं याबद्दल नक्कीच आनंद आहे. देशात महागाई भ्रष्टाचार वाढला आहे. अनेक समस्यांना देश ग्रासला आहे," असं तो म्हणाला.
 
सुदानमधील आंदोलनात महिलांचा सहभाग मोठा आहे. सोशल मीडियावर 22 वर्षीय अला साराह या सुदानी आंदोलनकर्त्या तरुणीचे फोटो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. याबद्दल तो म्हणाला, "महिलांबद्दल सुदानमध्ये चांगलं वातावरण आहे. महिला शिकू शकतात, नोकरी करू शकतात. एकूण या आंदोलनात महिलांच उत्स्फूर्त सहभाग आहे."
 
अबू बक्र महमूद हा पुण्यात एमबीएचं शिक्षण घेतोय. त्याचा कलामसार हा यूट्यूब ब्लॉग सुदानमध्ये खूप प्रसिद्ध आहे. देशाच्या स्थितीवर तो आपल्या यू ट्यूब ब्लॉगमधून बोलतो, प्रश्न मांडत विडंबन करतो.
 
"आम्हाला लोकशाही हवी आहे. मिलिट्री काऊन्सिलने दोन वर्षं सत्तेत राहाणार असल्याचं म्हटलं आहे. पण आम्हाला ते नको आहे. वर्षभरात आम्हाला लोकशाही हवी आहे," असं अबू म्हणतो."
 
अबू बक्रचे आई-वडील आणि त्याचे भाऊ बहीण सौदी अरेबियामध्ये राहतात. आपल्या आजोळी सुदानमध्ये अबू अधूनमधून जातो.
 
पुण्यात घर शोधण्यात येते अडचण
पुण्यात अनेक सोसायट्यामध्ये परदेशी मुलाना घर मिळायला अडचण येत असल्याचं मोगतबाने सांगितलं. अनेक ठिकाणी 'फॉरेनर नॉट अलाऊड' अशा पाट्या पहिल्या की वाईट वाटत अस दोघेही सांगतात. अनेकदा ब्रोकरकडूनच घर मिळत असल्याचा त्यांचा पुण्यातला अनुभव आहे. भारत सरकारने सुदान देशातल्या मुलांच्या समस्यांकडे लक्ष द्यावं, त्यांची अशी अपेक्षा आहे.
 
भारतात शिक्षणाची संधी, संस्कृती आणि खादयसंस्कृती
भारत सरकारने आम्हाला शिक्षणात अनेक सवलती दिल्या आहेत. इथले लोक प्रेमळ असल्याचं दोघे सांगतात.
 
सुदान देशातल्या अरबी भाषेत शिक्षण घेतल्यानंतर पुढच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना भारत देश आवडतो.
 
भारतातल्या अनुभवाबद्दल दोघेही भरभरून बोलतात. इतर कोणत्याही शहरांपेक्षा पुणे जास्त आवडतं असं ते सांगतात. पुण्यातील खाद्यपदार्थांचे फॅन झालेले हे दोघेही सुदानमध्ये भारतासारखी लोकशाही हवी, असं सांगतात.

हलिमाबी कुरेशी