गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जून 2019 (10:40 IST)

भाजप म्हणतंय मुख्यमंत्री आमचा, तर शिवसेनेचा नारा 'जय श्री राम'चा

लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेनेने केलेली युती विधानसभेलाही कायम राहणार असल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगितलं जात असलं तरी 'मुख्यमंत्री भाजपचाच असेल असं बघा,' असा सूर अमित शाह यांचा दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत निघाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या.
 
याला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दुजोरा दिला. यामुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेमध्ये ठिणगी पडणार का? विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेने राम मंदिराच्या मुद्यांवरून भाजपवर दबाव आणायला सुरुवात केलीये का? गोडी गुलाबीमध्ये पार पडलेल्या लोकसभेनंतर शिवसेना भाजप वादाचा 'सामना' पुन्हा बघायला मिळणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
'मुख्यमंत्री भाजपचाच होईल यात शंका नाही'
लोकसभा निवडणुकीमध्ये स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेबरोबर भाजपची युती झाली. पण या मनधरणी मागे दडलंय काय? याची चर्चा होत असताना शिवसेनेकडून अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाची मागणी केली गेली. भाजपने या मागणीवर फार प्रतिक्रिया दिली नाही.
 
पण आता लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर मात्र भाजपकडून 'मुख्यमंत्री आमचाच असणार!' हे उघडपणे सांगितलं जातंय. विधानसभा निवडणुकीत युती करा पण मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच ठेवा असा आदेश अमित शाह यांनी दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत दिल्याच बोललं गेलं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बातम्यांना दुजोरा दिला.
 
मुनगंटीवार म्हणाले "राज्यात आमचे ४१ खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल! केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मित्रपक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि भाजपचाच मुख्यमंत्री होण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करण्याचे आदेश दिले आहेत."
 
शिवसेनेच्या नाराजीवर बोलताना मुनगंटीवार म्हणतात, "मिले सूर मेरा तुम्हारा ये दोस्ती हम नही तोडेंगे असं म्हणत आम्ही काम करत राहू!"
 
या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, "युती करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि उध्दव ठाकरे यांच्यामध्ये हा ठराव झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे हे निर्णय घेतील. पण अंतिम शब्द हा उध्दव ठाकरे यांचाच असेल."
 
पण अडीच वर्षं मुख्यमंत्री पदाची मागणी करणारे शिवसेना नेते रामदास कदम यांनी मात्र या विषयावर मौन बाळगलं आहे. त्यामुळे शिवसेना आता उघडपणे आपल्या मागण्या न सांगता कोणतं दबावतंत्र वापरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
भाजपमध्ये येणार्‍या आमदारांच्या काही जागा या शिवसेनेकडे आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्रिपदाबाबत काय आश्वासन भाजपने दिलंय? हे उघडपणे शिवसेनाही बोलत नाही आहे आणि मुख्य्यमंत्रीही ते स्पष्ट करताना दिसत नाहीयेत. आता तर वादाला सुरुवात झालीये. यापुढे अनेक वाद समोर येतील असं मिड-डे वृत्तपत्राचे शहर संपादक संजीव शिवडेकर यांना वाटतं.
 
शिवसेनेचं पुन्हा जय श्रीरामचं दबावतंत्र ?
लोकसभा निवडणुकीआधी उध्दव ठाकरेंनी शिवसेनेच्या खासदारांसह अयोध्या वारी करत भाजपची राम मंदिरावरून कोंडी केली. भाजपला राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला पाठींबा दर्शवण्याखेरीज पर्याय उरला नाही. आता विधानसभा निवडणुकांआधी पुन्हा एकदा उध्दव ठाकरे अयोध्या वारी करणार असल्याचे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत.
 
संजय राऊत यांनी म्हटलंय, "२०१४ च्या निवडणुकीत राम मंदिर बांधण्याच वचन आम्ही लोकांना दिलं पण मंदिर बांधू शकलो नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राम मंदिराच्या मुद्द्यावरून आम्ही लोकांकडे मतं मागितली. आम्ही निवडून आल्यावर पुन्हा अयोध्येत येणार असं म्हटलं होतं."
 
राऊत पुढे म्हणतात, "निवडणूक जिंकलो आणि रामाला विसरलो असं आम्ही नाही करणार. आम्ही जाण्याने मंदिर बांधण्याचं काम लवकर सुरू होईल. जर यावेळी मंदिराचं काम सुरू नाही केलं तर लोकांचा सरकारवर विश्वास राहणार नाही. भाजपकडे आता ३०३ खासदार आहेत. बहुमताचं सरकार आहे. मंदिर बांधण्यासाठी अजून काय पाहिजे? अजून जास्त दिवस राम मंदिराचा विषय चालवला तर लोक जोडे मारतील."
 
शिवसेना-भाजप आणि मुख्यमंत्रीपदाचा वाद यावर अधिक भाष्य करताना इंडियन एक्स्प्रेसच्या वरिष्ठ संपादक शुभांगी खापरे म्हणतात, "केंद्रात आणि राज्यात आता भाजप प्रभावशाली आहे. लोकसभेत मिळालेल्या बहुमतामुळे आता शिवसेनेला भाजपबरोबर जाण्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही. त्यांनी 4 वर्ष भाजपवर टीका केली. पण आता युती झाल्यावर कशावर बोलणार त्यामुळे विधानसभेला शिवसेनेला एक अजेंडा घेऊन लोकांसमोर जावं लागेल. त्यासाठी राम मंदिराचा मुद्दा शिवसेना पुढे करतंय. पण मुख्यमंत्रिपदाबाबत बोलायच झालं तर आताची परिस्थिती पाहता शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असं वाटत नाही."
 
मुनगंटीवार यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता शिवसेनेनेच्या सुत्रांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "युती करताना मुख्यमंत्र्यांनी स्वत: जे जाहीर केले आहे त्यात तसूभरही फरक होणार नाही. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच असेल अशा बातम्यांना कोणीही महत्त्व देऊ नये," असं शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाने सांगितलं.