शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

जिओ फोनधाकरांना द्यावा लागणारा IUC चार्ज असा असेल

तुम्ही जिओ वापरत असाल, तर 10 ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून एअरटेल किंवा व्होडाफोनसारख्या इतर कंपन्यांना फोन करण्यासाठी प्रति मिनिट दराने सहा पैसे आकारले जाणार आहेत.
 
जिओ कार्डधारकांकडून अन्य जिओ ग्राहकांना फोन करण्यासाठी मात्र कोणतंही शुल्क आकारले जाणार नाही.
 
जिओ ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कवर फोन करण्यासाठी 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतचं रिचार्ज व्हाउचर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या व्हाउचरमुळे जिओ ग्राहकांना IUC मिनिटं मिळणार आहेत.
 
जिओ ग्राहक जितकी IUC व्हाउचर घेतील तितका डेटा त्यांना जिओ कंपनीतर्फे विनामूल्य दिला जाणार आहे.
 
IUC रिचार्ज काय आहे?
IUC म्हणजेच इंटरकनेक्शन यूजेज चार्ज. दोन टेलिफोन कंपन्या आपल्या ग्राहकांच्या फोनकॉलसाठी जी रक्कम आकारतात तिला IUC म्हणतात.
 
सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर तुमच्याकडे जिओचं कार्ड आहे आणि तुमच्या मित्राकडे एअरटेलचं कार्ड आहे. जेव्हा तुम्ही जिओवरून एअरटेलवर फोन लावता तेव्हा तुम्हाला IUC अंतर्गत प्रति मिनिटासाठी 6 पैसे शुल्क आकारलं जाणार आहे.
 
रिलांयस कंपनीने जिओ लाँच केल्यानंतर IUC साठी अन्य टेलिकॉम कंपन्यांना 13,500 कोटी रुपये दिले होते.
 
जिओ नेटवर्कवर दिवसाला 25 ते 30 कोटी मिस्ड कॉल येतात.
 
तसंच जिओ नंबरवर दररोज 65 ते 75 कोटी मिनिटांचे कॉल दुसऱ्या नेटवर्कवर केले जातात, अशी माहिती रिलायन्सनं दिली.
 
जिओनं हे पाऊल का उचललं?
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) बदलत्या धोरणांमुळे IUC शुल्कांमधले हे बदल करावे लागले, असं जिओतर्फे सांगण्यात आलं.
 
जिओ दीर्घकाळापासून IUC शुल्कासाठी मोठी रक्कम दुसऱ्या कंपन्यांना देत आहे, तसंच 2019 सालानंतर IUC शुल्क संपुष्टात येईल असा विश्वास जिओला वाटतो आहे. ट्रायनं सर्व भागधारकांकडून या विषयावर मतं मागवली आहेत.
 
IUC शुल्काचा इतिहास पाहिला तर 2011 सालापासून IUC शुल्क संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं समजतं. 2017 साली ट्रायने प्रति मिनिट 14 पैसेवरून 6 पैसे IUC शुल्क आकारायला सुरुवात केली.
 
याबरोबरच 1 जानेवारी 2020 सालापर्यंत IUC शुल्क पूर्णपणे बंद केले जाईल, असंही ट्रायनं म्हटलं होतं. परंतु यावर पुन्हा एकदा विचारविनिमय करण्यात येईल, असंही ट्रायनं नमूद केलं होतं.
 
2016 साली जिओ लाँच करताना कुठल्याही नेटवर्कवरच्या फोनसाठी ग्राहकांकडून पैसे आकारले जाणार नाहीत, असं जिओनं म्हटलं होतं.
 
जिओकडे सध्याच्या घडीला देशातील सर्वांत जास्त ग्राहकाधार आहे, असं असूनही जिओनं हा निर्णय का घेतला असा प्रश्न उपस्थित होतो.
 
टेलिकॉम क्षेत्रातले तज्ज्ञ प्रशांतो बॅनर्जी सांगतात की, रिलायन्स जिओ आता कुठल्याही प्रकारचं नुकसान सहन करू शकत नाही.
 
ते पुढे सांगतात की, "रिलायन्स IUC शुल्कासाठी आत्तापर्यंत स्वतःच्या खिशातून खर्च करत होती. परंतु त्यांना आता कुठलीही गुंतवणूक करणं शक्य नाही. आता त्यांना नफा कमवणं गरजेचं आहे. ट्राय भविष्यकाळात जो निर्णय घेईल त्यामुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये यासाठी रिलायन्सनं आपली धोरणं बदलली आहेत."
 
या निर्णयाचा रिलायन्सला फायदा होईल?
रिलायन्स आपल्या ग्राहकांकडून जे पैसे घेईल ते थेट एअरटेल आणि दुसऱ्या टेलिकॉम कंपन्यांना देणार आहे, त्यामुळे रिलायन्सला फायदा होईल असं वाटत नाही.
 
याबरोबरच कंपनीतर्फे IUC व्हाउचरच्या खरेदीवर मोफत डेटाही देण्यात येणार आहे.
 
परंतु IUC शुल्काचा नीट बारकाईनं अभ्यास केला, तर असं दिसतं की ज्यांचा ग्राहकाधार जास्त आहे त्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.
 
रिलायन्स जिओच्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकावरून जिओकडे 35 कोटी ग्राहकाधार असल्याची माहिती मिळते आहे. तर ट्रायच्या माहितीनुसार जिओकडे 30 कोटी ग्राहकाधार आहे.
 
एअरटेल आणि रिलायन्स जिओच्या ग्राहकाधारात वरकरणी फरक दिसत नाही.
 
परंतु जिओ वारंवार नव्या आणि आकर्षक योजना आणत असल्यानं हळूहळू एअरटेलची पिछेहाट होत असल्याचं चित्र दिसत आहे.
 
प्रशांतो बॅनर्जी सांगतात की, "या निर्णयामुळे रिलायन्सचा थेट फायदा होत असल्याचं दिसत नाहीये. तर IUC शुल्क संपुष्टात येण्यावर रिलायन्सच्या सर्व योजना टिकून असल्याचंही चित्र आहे. ट्रायनं 2017 साली IUC शुल्क कमी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा रिलायन्सला चांगलाच फायदा झाला होता. तेव्हा कंपनीकडे ग्राहकाधारही कमी होता."
 
"असं असलं तरीही या निर्णायामुळे जिओचा ग्राहकाधार कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाच जणांच्या एका कुटुंबात तिघांकडे जिओ असेल, तर घरातल्या उर्वरीत दोघांनी जिओ कार्ड घेण्याची शक्यता जास्त झाली आहे.''