शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जुलै 2022 (17:05 IST)

कोल्हापूरमध्ये लग्नाची वरात पाण्याच्या टँकरवरून, हनिमूनच्या आधी जोडप्यानं घातली अनोखी अट

SARFARAZ SANADI/BBCनवरदेव आणि नवरीची घोडी, हत्ती आणि पालखीमध्ये बसून वरात निघालेली सर्वांनीच पाहिली आहे. पण कधी टँकरवरून निघालेली वरात तुम्ही पाहिली आहे का?
 
नसेल तर आता आम्ही तुम्हाला अशाच एका प्रकाराविषयी सांगणार आहोत. कोल्हापुरात अशीच एक आगळीवेगळी मिरवणूक निघाली जिची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
 
कोल्हापूर शहरातील पाणी समस्येवर लक्ष वेधण्यासाठी नवीन जोडप्याने चक्क पाण्याच्या टँकरवरून आपली वरात काढली आहे.
 
त्यांची ही वरात संपूर्ण कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरत आहे. विशाल कोळेकर आणि अपर्णा साळुंखे हे काल लग्नाच्या बंधनात अडकले. यानंतर रात्री हलगी-घुमक्याच्या तालात मंगळवार पेठेतून ही वरात निघाली.
 
आपल्या बायकोला पाणी भरण्याचा त्रास नको म्हणत नवऱ्या मुलाने शक्कल लढवत पाण्याचे टँकर मागवले.
 
त्यानंतर ते टँकर फुलांनी सजण्याऐवजी चक्क घागरींनी सजवले. वरातीमध्ये सहभागी झालेल्या मंडळींनी डोक्यावर घागर-हंडे घेतले आणि वधू-वराला टँकरवर बसवले.
 
पुढे मग हल्गीच्या नादात कोल्हापुरातील महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, खासबाग येथून ही वरात निघाली.
 
ही वरात जेवढी लक्षवेधी होती तेवढंच लक्षवेधी होता तो या टँकरवर लावलेला बोर्ड. हा बोर्ड पाहून हसावं की रडावं अशी परिस्थिती अनेकांसाठी निर्माण झाली.
 
जोपर्यंत परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही,असा बॅनर टँकरच्या दोन्ही बाजूला लावण्यात आला होता.
 
त्यामुळे मग अनेकांना हसू आवरत नव्हते. तर काहीजण मात्र पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जोडप्यानं लढवलेली ही अनोखी शक्कल पाहून त्यांचं कौतुक करत होते.