सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जुलै 2022 (13:18 IST)

भगवंत मान दुसऱ्यांदा विवाहबद्ध, पत्नी गुरप्रीत कौर कोण आहेत?

पंजाबचे मुख्यमंत्री आज गुरुवारी (7 जुलै) चंदीगढमध्ये एका खासगी समारंभात विवाहबद्ध झाले आहेत. 48 वर्षीय भगवंत मान यांचं हे दुसरं लग्न आहे. डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी ते विवाहबद्ध झाले आहेत.
 
गुरप्रीत कौर कोण आहेत यांच्याबद्दल सोशल मीडिया वर चर्चा सुरू आहेत. गुरप्रीत कौर यांचं कुटुंब कुरुक्षेत्र जिल्ह्यातील पेहोवा नगरातील आहेत.
 
गुरप्रीत कौरच्या गावातील शेजारी पलविंदर यांनी बीबीसी पंजाबीचे सहयोगी पत्रकार कमल सैनी यांना सांगितलं की, त्यांच्या वडिलांचं नाव इंद्रजित सिंह आणि आईचं नाव राज कौर आहे.
 
गुरप्रीतच्या वडिलांचे चुलत भाऊ गुरिंदरजित सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांच्या कुटुंबाची शेती आहे. त्यात तीन भावांची 150 एकरांची शेती आहे.
 
ते म्हणाले, "गुरप्रीतचे वडील जमीन कंत्राटी शेती करतात. मात्र ते पहिल्यापासून शेती करत होते."
 
या कुटुंबाची शेती पेहोवाच्या मदनपूर गावात आहे. 2007च्या आधी गुरप्रीत कौरचं कुटुंब मदनपूर गावात राहात होतं मात्र नंतर ते शहरात रहायला आले आहे.
 
डॉ. गुरप्रीत कौर कोण आहेत ?
या गावातील शेजारी पलविंदर यांच्या मते हे कुटुंब पंजाबमधील लुधियानाचा आहे. अनेक दशकांपूर्वी गुरप्रीत कौरचे आजोबा हरियाणामध्ये आले होते.
 
गुरप्रीत कौर तीन बहिणींमध्ये सगळ्यात लहान आहेत. त्यांची मोठी बहीण अमेरिकेत आहे आणि त्यांची दुसरी बहीण ऑस्ट्रेलियात आहे. दोघीही उच्चशिक्षित आहेत.
 
गुरप्रीत कौर उच्चशिक्षित आहेत. त्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी अंबाला स्थित महर्षी मार्कंडेयश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि रिसर्च मधून MBBS केलं आहे. तिथेही त्या कायम टॉपर होत्या.
 
"त्या अतिशय हुशार आहेत आणि त्यांनी सुवर्णपदक मिळवलं आहे," असं गुरिंदरजित सिंग सांगतात.
 
सध्या गुरप्रीत त्यांच्या वडिलांबरोबर चंदीगडला राहतात. मागच्या वर्षी त्यांनी तिथे एक घर विकत घेतलं. त्यांचे कुटुंब हरियाणाच्या पेहोवाला येत जात राहतात,
 
गुरिंदरजित सिंह आधी काँग्रेसशी निगडीत होते. गेल्या वर्षी ते आम आदमी पार्टीत गेले. गुरप्रीतच्या वडिलांना राजकारणात फारसा रस नाही, असं ते सांगतात. ते धार्मिक आहेत आणि बराचसा वेळ ते गुरुद्वारात असतात.
 
गुरप्रीतचे वडील आधी त्यांच्या गावात सरपंच होते. आता त्यांचे छोटे भाऊ सरपंच आहेत. भगवंत मान यांनी 2015 मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नी इंद्रपीत कौर यांच्यापासून घटस्फोट घेतला होता.
 
पहिल्या बायकोपासून त्यांना दोन मुलं आहेत. त्यांची मुलगी आणि दोन मुलं अमेरिकेत राहतात. मान यांच्या शपथविधीला त्यांची दोन्ही मुलं आली होती.