रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 6 जुलै 2022 (12:57 IST)

इंग्लंडमध्ये बोरिस जॉन्सन सरकार संकटात, 2 मंत्र्यांचे राजीनामे

boris johnson
UKमध्ये बोरिस जॉन्सन सरकार संकटात सापडलं आहे. लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या क्रिस पिंचर यांना बोरिस यांनी सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याचा वाद उफाळून आला आहे.
 
2019 मध्ये क्रिस पिंचर यांना बोरिस सरकारमध्ये जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या त्यावेळी त्यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची पूर्व कल्पना होती अशी कबुली UKचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी एका मुलाखतीत दिली आहे. ही एक खूप मोठी चूक होती असंसुद्धा त्यांनी मान्य केलंय.
 
पण त्यांची ही मुलाखत प्रसिद्ध झाल्याच्या काही तासांमध्येच त्यांच्या सरकारमधल्या 2 महत्त्वाच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.
 
मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री 11 च्या सुमारास अर्थमंत्री ऋषी सूनक आणि आरोग्य मंत्री साजिद जावेद या मंत्र्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर तिथे अनेक घडामोडी घडल्या आहेत.
 
ऋषी सूनक यांच्या राजीनाम्याची घोषणा करताना म्हटलं, "सरकारने त्यांच्या संपूर्ण क्षमतेने काम करायला हवं ही लोकांची अपेक्षा अगदीच योग्य आहे. मला वाटतं की आपण त्यासाठी लढायला हवं. म्हणून मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशासमोर अनेक आव्हानं आहेत."
 
तर साजिद जावेद यांच्या मते बोरिस जॉन्सन राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून सरकार चालवण्यास असमर्थ आहे. त्यामुळे ते या सरकारमध्ये राहू इच्छित नाहीत. अनेक खासदारांनी आणि जनतेचा विश्वास जॉन्सन यांच्यावरून उडाला आहे असंही ते म्हणाले.
 
सध्या शिक्षण मंत्री नाधिम झाहवाल यांना अर्थमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तर स्टीव्ह बर्कले यांच्याकडे आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
 
मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टर्नर यांच्या मते बोरिस सरकार आता कोसळण्याच्या बेतात आहे.
 
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मागच्याच महिन्यात विश्वासदर्शक ठराव जिंकला आणि पुढचं वर्षभर तरी त्यांच्या सरकारला धोका नाही. फक्त नियमात बदल झाला तर ही परिस्थिती बदलू शकते.