मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जुलै 2022 (11:45 IST)

शापोर मोइनियान : चीनसाठी हेरगिरी करणारा अमेरिकन सैनिक

अमेरिकेच्या हवाई तंत्रज्ञानासंबंधीची गुप्त माहिती चीनला विकल्याचं अमेरिकन लष्करात पायलट म्हणून काम केल्यानंतर निवृत्त झालेले शापोर मोइनियान यांनी मान्य केलंय.
 
अमेरिकेच्या न्याय मंत्रालयानं म्हटलं की, 67 वर्षीय शापोर मोइनियान यांनी निवृत्तानंतर लष्करात कंत्राटदार म्हणूनही काम केलं होतं.
 
त्यावेळी मोइनियान यांनी चीनसोबतच्या औपचारिक संबंधांची माहिती दिली नव्हती. त्यांनी कंत्राटदार असताना अमेरिकेच्या हवाई तंत्रज्ञानाशी संबंधित गुप्त माहिती गोळा केली आणि त्यानंतर ती हजारो डॉलरच्या बदल्यात चीनला विकली.
 
मोइनियान यांना अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीच्या नॉन-क्रिमिनल रेकॉर्डमध्ये चुकीची माहिती देण्याच्या आरोपाखालीही दोषी ठरवण्यात आलंय.
 
एफबीआयचे सॅन डिएगो कार्यालयाचे प्रभारी विशेष एंजट स्टेसी फोय यांनी सांगितलं की, "हे एक ताजं उदाहरण आहे की, कशा पद्धतीनं चिनी सरकार अमेरिकेच्या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून आपल्या संरक्षण क्षमता वाढवत आहे."
 
न्याय मंत्रालयानं सांगितलं की, "मोइनियान हेलिकॉप्टर पायलट म्हणून अमेरिका, जर्मनी आणि दक्षिण कोरियामध्ये सेवा पूर्ण केल्यानंतर 1977 आणि 2000 सालांदरम्यान अमेरिकेच्या लष्कराशी संबंधित खासगी क्षेत्रात उतरले."
 
अशी चोरली माहिती
लष्करी कंत्राटदार म्हणून मोइनियान यांनी नॉन-क्रिमिनल रेकॉर्डच्या आधारावर संरक्षण विभागातून सिक्युरिटी इंटेलिजियन्स क्लिअरन्स मिळवण्यात यश मिळवलं. त्या आधारावर एक सिव्हिलियन कर्मचारी म्हणून त्यांनी लष्कराची गुप्त माहिती मिळवली.
 
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "चीनच्या एका अज्ञात व्यक्तीनं मोइनियान यांच्याशी संपर्क केला होता आणि त्यांनी चीनच्या एव्हियशन इंडस्ट्रीबद्दल सल्ला दिला."
 
न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "शापोर मोइनियान यांच्यावर एका चिनी व्यक्तीच्या सांगण्यावरून मान्यताप्राप्त कंत्राटदार म्हणून काम करण्याचा आरोप आहे. त्या चिनी व्यक्तीने स्वत:ला एक भरती करणाऱ्या कंपनीचा तज्ज्ञ एजंट सांगितलं होतं."
 
चीनचे 'पेड एजंट' होतं मोइनियान
अधिकाऱ्यांच्या म्हण्यानुसार शापोर मोइनियान चिनी सरकारचे 'पेड एजंट' होते. त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलंय आणि अमेरिकेची बाजू कमकुवत केलीय. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही.
 
अमेरिकेत परतल्यानंतर मोइनियान यांनी हवाई विभागाशी संबंधित माहिती मिळवून पेन ड्राइव्हमधून ट्रान्सफर करणं सुरू केलं.
 
सप्टेंबर 2017 मध्ये मोइनियान यांनी परदेश प्रवास केला आणि शांघाय विमानतळावर चिनी सरकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. हवाई विभागाशी संबंधित माहिती त्या पेन ड्राईव्हमधून त्या चिनी अधिकाऱ्याला दिली.
 
मोइनियानने लोकांकडून सेल फोन आणि इतर उपकरणं मिळवली, जेणेकरून गुप्त माहिती आणि सूचना इलेक्ट्रॉनिक मार्गानं ट्रान्स्फर केलं जाऊ शकेल. त्यानंतर मोइनियान यांनी सावत्र मुलीच्या दक्षिण कोरियाई बँकेच्या खात्यात पेमेंटची व्यवस्था केली.
 
'हा अमेरिकन लष्करासोबत विश्वासघात'
दक्षिण कॅलिफोर्निया (सॅन डिएगो) च्या अटर्नी रँडी ग्रसमॅने सांगितलं की, "देशाच्या माजी सैनिकानं देशासोबत केलेला हा विश्वासघात आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही. अमेरिका या प्रकरणामुळे चिंतेत आहे आणि सक्रीयपणे याची चौकशी केली जाईल."
 
परदेशी सरकारांच्या सांगण्यावरून अमेरिकन तंत्रज्ञान आणि गोपनीय माहिती चोरणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्याविरोधात खटला चालवलाच जाईल.
 
अमेरिकेच्या न्याय विभागाच्या कागदपत्रांनुसार, मोइनियान यांनी हाँगकाँग आणि इंडोनेशियाचा प्रवास, चिनी अधिकाऱ्यासोबत बैठक, सेल फोन आणि पैसे मिळवणं आणि सिक्युरिटी इंटेलिजियन्सचा फॉर्म भरताना ती माहिती लपवणं इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.
 
मार्च 2017 मध्ये मोइनियान यांनी हाँगकाँगचा प्रवास केला, तिथं त्यांनी चिनी एजंटसोबत चर्चा केली आणि पैशांच्या बदल्यात अमेरिकेतल्या डिझाईन किंवा वेगवेगळ्या विमानांची माहिती आणि साहित्य पुरवण्याची सहमती दर्शवली.
 
मोइनियान यांनी त्यांच्याशी चर्चेदरम्यान जवळपास 7 हजार डॉलर आणि 10 हजार डॉलरपर्यंत रक्कम घेतली. या बैठकीत किंवा नंतरच्याही बैठकांमध्ये मोइनियान यांना माहिती होतं की, समोरील व्यक्ती चीनचे कर्मचारी आहेत आणि चिनी सरकारच्या आदेशानं काम करत आहेत.
 
कठोर शिक्षा मिळेल...
मोइनियान यांनी सावत्र मुलीला सांगितलं की, परदेशात त्यांच्या कंसल्टिंगच्या कामाचं पेमेंट मिळालं होतं. त्यानंतर त्यांच्या मुलीनं त्यांना पैसे ट्रान्सफर करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या.
कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, शापोर मोइनियान यांना पाच वर्षांपर्यंत शिक्षा आणि परदेशी एजंटच्या रुपात काम केलं म्हणून 2 लाख 50 हजार दंड, त्याचसोबत सुरक्षेशी संबंधित फॉर्म भरताना खोटं बोलले म्हणून 10 वर्षांचा तुरुंगवास आणि अतिरिक्त दंडाचाही सामना करावा लागू शकतो.
 
कोर्टाचा अंतिम निर्णय दोन महिन्यांनंतर 29 ऑगस्टला सुनावला जाणार आहे.