1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जुलै 2022 (14:59 IST)

शिवसेनेचं 'ठाणं' एकनाथ शिंदेंच्या ताब्यात, 66 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

shinde thane group
ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे 66 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामील झालेत. शिवसेना नगरसेवकांनी बुधवारी (6 जुलै) मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला.  
 
ठाण्याचे माजी महापौर आणि नगरसेवक नरेश म्हस्के बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "शिवसेना नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. आम्ही सर्व शिंदे यांच्यासोबत आहोत." ठाण्यातील नगरसेवकांनी शिंदे गटाला दिलेल्या पाठिंब्याबाबत शिवसेना नेत्यांची अजून प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
 
ठाण्यात शिवसेनेचे 67 नगरसेवक आहेत. त्यापैकी फक्त एक नगरसेविका नंदिनी विचारे उद्धव ठाकरेंसोबत राहिल्या आहेत. नंदिनी विचारे, शिवसेना खासदार राजन विचारेंच्या पत्नी आहेत.  
 
आमदारांपाठोपाठ नगरसेवकांनी साथ सोडल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. ठाणे गेली 35 वर्ष शिवसेनेचा गड राहिलंय. हा बालेकिल्ला वाचवण्याचं मोठं आव्हान आता उद्धव ठाकरेंसमोर आहे. 
 
ठाण्यातील 66 शिवसेना नगरसेवक शिंदे गटात 
एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडानंतर खासदार उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गट जातील अशी चर्चा सुरू होती. त्यातच, ठाण्यातील 66 नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. 
 
पक्षातील सर्वात मोठ्या बंडाचा सामना करणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. बुधवारी (6 जुलै) शिवसेनेच्या ठाण्यातील नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर त्यांची भेट घेतली. शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना एकमताने शिंदे यांना पाठिंबा जाहीर केलाय. 
 
ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "शिवसेना नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतलीये. आम्ही सर्व शिंदे यांच्यासोबत आहोत. आम्ही त्यांना पाठिंबा दिलाय." 
 
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेच्या ठाण्यातील नगरसेवकांनी पोस्टर्स आणि बॅनर लाऊन शिंदेंचं उघड समर्थक केलं. तर, रस्त्यावर उतरून शक्तिप्रदर्शनही करण्यात आलं होतं. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाण्यातील शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. 
 
महाराष्ट्रतील सत्तांतर नाट्यादरम्यान ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी शिंदे यांना खुलं समर्थन दिलं असलं तरी, शिंदेगटात ते सामील झाले नव्हते. बुधवारी या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. 
 
नगरसेवकांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत पत्रकारांशी बोलताना शिंदे गटातील वरिष्ठ आमदार दीपक केसरकर म्हणाले, "आपल्या मनातील कोणीतरी नेता होतो. आपल्यातील मुख्यमंत्री होतो. ही भावना नगरसेवक आणि जिल्हापरिषद सदस्यांना सुखावून गेली असणार. ही फक्त सुरूवात आहे. या पुढे हा ओघ अधिक जास्त वाढेल."
 
उद्धव ठाकरेंसोबत कोण उरलं? 
ठाण्यातील संपूर्ण शिवसेनाच एकनाथ शिंदे यांनी फोडल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेच्या एकमात्र नगरसेविका नंदिनी विचारे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत असल्याचं चित्र दिसतंय. याचं कारण, एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांमध्ये नंदिनी विचारे उपस्थित नव्हत्या.
 
नंदिनी विचारे शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या पत्नी आहेत. बुधवारी शिवसेनेने राजन विचारे यांची लोकसभेत शिवसेना पक्षाचा प्रतोद (व्हिप) म्हणून नियुक्ती केलीये.
 
खासदार राजन विचारे आणि नंदिनी विचारेंनी एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राजकीय भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. राजन आणि नंदिनी विचारे यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. 
 
ठाण्यातील पक्षीय बलाबल कसं आहे?
ठाणे महापालिकेत एकूण 131 नगरसेवक आहेत
शिवसेनेचे 67 नगरसेवक. यातील 66 नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा
शिवसेनेसोबत उरलाय फक्त एक नगरसेवक
भाजपकडे आहेत 23 नगरसेवक
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 34 नगरसेवक
कॉंग्रेसच्या नगरसेवकांची संख्या 3
ठाण्यात मनसेचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही
ठाण्याचा गड राखण्याचं उद्धव ठाकरेंसमोर आव्हानं? 
ठाणे महापालिकेवर गेली 35 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. आनंद दिघेंपासूनच ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडाने शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला मोठा सुरूंग लागला.
 
एकनाथ शिंदे यांनी त्यांची राजकीय कारकीर्द ठाण्यातून आनंद दिघेंसोबत सुरू केली. पण, दिघे यांच्या मृत्यूनंतर शिंदे यांनी ठाण्यावर एकहाती वर्चस्व निर्माण केलं. एकनाथ शिंदे चारवेळा ठाण्यातून आमदार म्हणून निवडून आलेत. शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा जबरदस्त प्रभाव आहे. 
 
ठाण्यातील वरिष्ठ राजकीय विश्लेषक कैलाश महापदी सांगतात, "राजन विचारेंची प्रतोद म्हणून नियुक्ती, म्हणजे ठाण्याचा गड राखण्यासाठी उद्धव ठाकरेंची अखेरची धडपड आहे." 
 
ठाण्यातील सर्व शिवसेना नेते सोडून जात असताना खासदार शिवसेनेसोबतच आहे असं दाखवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे, असं राजकीय जाणकार पुढे सांगतात. 
 
शिवसेनेला स्थापनेनंतर सत्ताकारणात पहिली सत्ता ठाण्याने दिली. मुंबईत भगवा फडकण्याअगोदर शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष ठाण्याने निवडून दिला होता.  
 
राजकीय विश्लेषक संतोष प्रधान सांगतात, "ठाणे आणि शिवसेना हे एक वेगळं समीकरण आहे. ठाण्यात बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ठाकरे नावाचं वलय अजूनही कायम आहे. त्यामुळे नगरसेवक शिंदे गटात सामील झाले तरी, मतदार उद्धव ठाकरेंसोबत राहू शकतात." 
 
ते पुढे म्हणाले, "नगरसेवकांनी शिंदे गटात सामील होणं हे अपेक्षित होतं. पण, यापुढे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई आहे. नेत्यांनी गट बदलला तरी उद्धव ठाकरेंची शिवसेना ठाण्यात संपली असं म्हणता येणार नाही." 
 
नगरसेवकांच्या शिंदे गटात सामील होण्याबाबत बोलताना ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ सांगतात, "उद्धव ठाकरेंना आता शून्यातून विश्व निर्माण करावं लागेल. ठाण्यात शिवसेनेचा संपूर्ण आराखडा उद्धव ठाकरेंना नव्याने आखावा लागणार आहे." 
 
एकनाथ शिंदे बंड पुकारल्यापासून सातत्याने बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं नाव घेत आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतानाही त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं. तर, ठाण्यात आल्यानंतर शिंदेंनी पहिल्यांना आनंद दिघे यांचं स्मारकावर जाऊन दर्शन घेतलं. 
 
मिलिंद बल्लाळ पुढे सांगतात, "ठाण्यातील शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे समीकरण तोडणं उद्धव ठाकरेंसाठी फार अवघड आहे. हे तोडण्यासाठी त्यांना भावनिक सूत्र लागेल."