रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जुलै 2022 (14:49 IST)

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्येच तब्बल ६६ नगरसेवक फुटले

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्येच सेनेला मोठे भगदाड पडले आहे. माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह तब्बल ६६ नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या सर्वांनी भेट घेतली. आम्ही सर्व जण तुमच्यासोबत असल्याची ग्वाही त्यांनी शिंदे यांना दिली. शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याबद्दल या सर्व नगरसेवकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
 
एकनाथ शिंदे हे ठाण्याचेच आहे. ठाणे शहर जिल्ह्यासह परिसरात शिवसेनेचा विस्तार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. विधीमंडळातील तब्बल ४० आमदार फोडण्यात शिंदे यांना यश आले आहे. आता नगरसेवकांनीही शिंदेगटात प्रवेशाचा सिलसिला सुरू केला आहे. येत्या काही महिन्यातच ठाणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या तोंडावरच विद्यमान ६६ नगरसेवकांसह माजी नगरसेवक आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने ही बाब पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रचंड अडचणीची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.