जुगल पुरोहित
"तुम्ही या युद्धनौकेवर एकटे असलात तरीही तुम्हाला तुमचा मार्ग शोधता येतो का?"
विक्रांत युद्धनौकेवर एक नौदल अधिकारी हजर होते त्यांच्याशी बोलता बोलता मी हा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर ते म्हणतात, "आता समजतं, पण तेच समजायला मला दोन महिने गेले."
2 सप्टेंबर रोजी भारताच्या नौदल ताफ्यात सर्वांत मोठी युद्धनौका असलेली विक्रांत सामील होणार आहे. या कार्यक्रमावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. विक्रांत युद्धनौकेची बांधणी करायला तब्बल 13 वर्षं एवढा कालावधी लागला.
संस्कृतमध्ये विक्रांतचा अर्थ आहे शूर.
विक्रांत जेव्हा भारताच्या नौदलात सामील होईल तेव्हा तिच्या पुढे INS जोडलं जाईल. या प्रक्रियेला म्हणतात कमिशनिंग.
या युद्धनौकेत 2300 कंपार्टमेंट आहेत. या युद्धनौकेवर जाताच ती युद्धनौका आहे याचा आपल्याला विसर पडतो, इतकी ती मोठी आहे. या युद्धनौकेची लांबी 262 मीटर तर उंची 60 मीटर इतकी आहे. त्यामुळे जरी या युद्धनौकेवर जोरदार लाटा आदळल्या तरी त्याचा तितकासा परिणाम जाणवत नाही.
युद्धनौकेवर असलेले रुंद रस्ते, रुंद पायऱ्या यामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागी जायला तेवढं काही कष्ट पडत नाही. युद्धनौकेवर असलेल्या एअर कंडिशनरमुळे बाहेरचा दमटपणाही जाणवत नाही.
आता विक्रांत हे नाव तसं आपल्या ओळखीचंच. भारताच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचंही नाव विक्रांतच होतं. ब्रिटनच्या रॉयल नेव्हीकडून विक्रांतची खरेदी करण्यात आली होती. आणि 1961 मध्ये तिची कमिशन प्रोसेस पूर्ण करण्यात आली. 1997 मध्ये INS विक्रांत डिकमिशन करण्यात आली. अर्थात तिला भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलं. बऱ्याच मिल्ट्री ऑपरेशन्स मध्ये विक्रांतने महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला होता.
नव्या युद्धनौकेबाबत बोलायचं झालंच तर यावर जवळपास 1700 लोक काम करू शकतील. सध्या या युद्धनौकेवर 2000 अतिरिक्त लोक काम करत आहेत. म्हणजे हे काम तसं टेक्निकल आहे, ज्यात केबल्स चेक करणं, पॉलिशिंग करणं, इंटेरियरचं काम करणं अशा गोष्टी सुरू आहेत.
यानंतर मी टीसीआर म्हणजेच थ्रॉटल कंट्रोल रूम मध्ये गेलो.
वरिष्ठ इंजिनिअरिंग ऑफिसर असलेले लेफ्टनंट कमांडर साई कृष्णन सांगतात, "टीसीआर म्हणजेच आपण या युद्धनौकेच्या हृदयात आहोत. इथूनच गॅस टर्बाइन इंजिन चालवलं जातं. त्यामुळेच तर हे शहरासारखी दिसणारी युद्धनौका तरंगते."
या युद्धनौकेवर असलेल्या चार इंजिन्समधून 88 मेगावॅटची पॉवर मिळते. इथं काम करणारे लोक सांगतात की, 'ही पॉवर एखाद्या शहराला पुरेशी असते.'
यानंतर नौदलात ज्याला 'गॅले' म्हटलं जातं ते ठिकाण येत. तिथं एक कॉफी मशीन, स्वच्छ खुर्च्या, टेबल आणि बरेचसे कंटेनर ठेवले होते. या ठिकाणाला कॅन्टीन किंवा पॅन्ट्री म्हणता येईल. विक्रांतमध्ये अशा तीन पॅन्ट्री आहेत. एक ऑफिसरने माहिती देताना सांगितलं की, "जर या तीन गॅले एकत्र केल्या तर किमान 600 लोक एकत्र जेवू शकतील."
पुढे गेल्यावर डाव्या हाताला क्वार्टर्स आहेत. सध्या इथे प्लॅस्टिकमध्ये गाद्या बांधून ठेवल्या आहेत. जेव्हा लोक इथं राहायला येतील तेव्हा त्या बंक बेडचा वापर करतील.
यासोबतच विक्रांतवर मोठं मेडिकल फॅसिलिटी सेंटर सुद्धा आहे. इथं 16 बेड आहेत, 2 ऑपरेशन थिएटर आणि एक लॅब आहे. सोबतच आयसीयू आणि सीटी स्कॅनची सुविधा सुद्धा आहे. इथं पाच मेडिकल ऑफिसर्स, 15 पॅरामेडिकल ऑफिसर्स आहेत. नौदलात असलेलं हे आजवरचं सर्वात मोठं मेडिकल फॅसिलिटी सेंटर असल्याचं सांगितलं जातं.
युद्धनौकेच्या काही भागांत गेल्यावर जहाजावर असल्याचा फिल येतो. पण हे साधासुध जहाज नाहीये. या जहाजावर 30 फायटर प्लेन आणि हेलिकॉप्टर ठेवण्याची सोय आहे.
या युद्धनौकेच्या क्षमतेबद्दल बोलायचं झाल्यास INS विक्रमादित्यवर याच्यापेक्षा जास्त एअरक्राफ्ट ठेवता येतात. तर यूके रॉयल नेव्हीच्या क्वीन एलिझाबेथवर 40 आणि यूएस नेव्हीच्या निमित्झ क्लासवर 60 पेक्षा जास्त एअरक्राफ्ट ठेवता येतात.
या युद्धनौकेच्या मागच्या भागात दोन रशियन 'मिग-29 के' फायटर प्लेन तर अर्ली वॉर्निंग कामोव -31 हे हेलिकॉप्टर ठेवण्यात आलेत.
यानंतर आम्ही त्या अशा डेकवर गेलो जिथे एअरक्राफ्ट टेकऑफ आणि लँडिंग करतात. विक्रांतची वेगवेगळ्या गोष्टींसाठी चाचणी घेण्यात आली. पण फ्लाईंग ऑपरेशनसाठीची टेस्ट अजून बाकी आहे. ही टेस्ट कदाचित या वर्षाअखेर होण्याची शक्यता आहे.
लेफ्टनंट कमांडर सिद्धार्थ सोनी फ्लाइट डेक ऑफिसर आणि हेलिकॉप्टर पायलट आहेत. ते सांगत होते की, "या युद्धनौकेवर असणारा फ्लाइट डेक 12,500 स्क्वेअर मीटर इतका आहे. म्हणजे एका हॉकी स्टेडियमचा अर्धा भाग म्हणता येईल. इथून एकाचवेळी 12 फायटर प्लेन आणि सहा हेलिकॉप्टर उडवता येतात. हे आमच्या जुन्या एअरक्राफ्ट कॅरिअरपेक्षा खूप मोठं आहे. जर तुमच्याकडे जास्त जागा असेल तर तुम्ही जास्त एअरक्राफ्ट ठेवू शकता."
विक्रांतची खास गोष्ट काय असेल तर तुम्ही रशियन अमेरिकन आणि भारतीय एअरक्राफ्ट एकाच ताफ्यात ठेऊ शकता.
45,000 टन वजनाची ही शक्तिशाली युद्धनौका आता शत्रूंच्या टार्गेटवर आली आहे. चीनने आपल्या युद्धनौकेवर 'एअरक्राफ्ट कॅरियर किलर हायपरसोनिक' मिसाईल ठेवल्याचा प्रचार सुरू केलाय.
हे कॅरिअर स्वरक्षण कशाप्रकारे करत?
कॅप्टन रजत कुमार सांगतात, "हे कॅरियर कधीच एकट्याने प्रवास करत नाही, त्याच्यासोबत इतरही युद्धनौका असतात. ज्यामुळे या जहाजची ताकद वाढते. यात युद्धनौका, अँटी सबमरीन वॉरफेयर आणि अँटी एअर सारखी क्षमता असते. विक्रांत सुद्धा अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे.
तिथून निघता निघता लेफ्टनंट कमांडर चैतन्य मल्होत्रा यांची भेट झाली. त्यांची टीम विक्रांतला हवामानाचे अपडेट देते. आणि हवामानाची माहिती असणं कोणत्याही मोहिमेसाठी अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे.
लेफ्टनंट कमांडर विजय शियोरान सांगतात की, "हा भाग एखाद्या पार्किंग लॉटप्रमाणे आहे. इथं एक टीम असेल जी देखभाल आणि दुरुस्तीचे काम बघेल. याच्या अगदी वर एक फ्लाईट डेक आहे. एक स्पेशल लिफ्ट एअरक्राफ्टला या डेकवर घेऊन जाते."
ते सांगतात, "एअरक्राफ्टच्या लँडिंग आणि टेकऑफसाठी वाऱ्याचा वेग जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे माझ्या टीमची भूमिका महत्त्वाची ठरते. आम्ही सातत्याने वेगवेगळ्या स्केलवर हवामानाचं मोजमाप करतो आणि अंदाज बांधतो."
पण गरजा अजूनही संपलेल्या नाहीत
या युद्धनौकेचं वैशिष्ट्य काय असेल तर मिशनच्या गरजेनुसार संपूर्ण एअरफिल्ड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येऊ शकतं. विक्रांतच्या येण्याने आता भारताच्या ताफ्यात दोन कॅरीयर झालेत.
पण नौदलाच्या मते त्यांना अशाच आणखीन एका कॅरिअरची गरज आहे. यापूर्वीच्या नौदल प्रमुखांनी याबाबत उघड उघडपणे सांगितलं आहे.
संरक्षण उत्पादनात आपण आत्मनिर्भर व्हायला हवं म्हणून केंद्रातलं मोदी सरकार सातत्याने या गोष्टीवर भर देत आहे. मात्र तिसरं कॅरिअर तयार करायचं असेल तर त्यासाठी लागणारा फंड मंजूर झालेला नाही.
व्हाईस अॅडमिरल ए. के. चावला (निवृत्त) हे काही काळापूर्वी विक्रांतशी संबंधित होते. ते सांगतात की, 'आता निर्णय घ्यायचा की विषयच सोडून द्यायचा हाच मुद्दा उरलाय.'
व्हाइस अॅडमिरल ए. के. चावला नौदलातून निवृत्त झाले आहेत. ते सांगतात, "80 च्या दशकात आलेल्या आर्थिक उदारीकरणाच्या लाटेनंतर चीनने आपल्या नौदलावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. कारण त्यांना माहीत होतं की जर जगात महासत्ता म्हणून पुढं यायचं असेल तर नौदलाची साथ आवश्यक आहे. त्यानंतर चीनने आपल्या नौदलात नवनव्या एअरक्राफ्टची भर करायला सुरुवात केली. तुम्हाला एका रात्रीत एअरक्राफ्ट बनवता येत नाहीत. त्यासाठी वेळ लागतो. आपल्याला संरक्षणासाठी विक्रांत सारख्या आणखीन युद्धनौकांची आवश्यकता आहे."
चीनने 2012 ते 2022 दरम्यानच्या काळात दोन एअरक्राफ्ट कमिशन केलेत. आणि आता तिसऱ्या आणि आत्तापर्यंतच्या सर्वांत मोठ्या एअरक्राफ्टवर त्यांचं काम सुरू आहे. चीनने आपल्या नौदलाची क्षमता इतकी वाढवलीय की आता चीनने अमेरिकेच्या नौदलालाही मागे टाकलंय.
आणि शेवटी...
युद्धनौकेच्या बाहेरच्या बाजूला नेव्हल बँड आपली रिहर्सल करतोय. सोबतच क्रेनने अवजड वस्तू उचलल्या जात आहेत, तिकडे मोठ्याने सायरन वाजतोय. सरकारी मालकी असलेल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेडने आता सुटकेचा नि:श्वास सोडलाय.
जानेवारी 2003 मध्ये तत्कालीन सरकारने या युद्धनौकेच्या उभारणीसाठी मंजुरी दिली होती. 2007 मध्ये प्रत्यक्षात युद्धनौकेच्या बांधणीला सुरुवात झाली. पण युद्धनौका बांधणीच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र वेळ झाला. या दुसऱ्याच टप्प्यात युद्धनौकेवर हत्यार, प्रपल्शन सिस्टीम आणि एव्हीएशन कॉम्प्लेक्स लोड होणार होते.
सीएसएलचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर असलेले मधु नायर सांगतात, "ही युद्धनौका उभारण्यासाठी 13 वर्षं लागली. त्यांना कमी वेळात हे काम पूर्ण करायचं होतं. 13 वर्षं हा थोडा थोडका वेळ नाहीये. आम्ही अजून चांगलं करू शकलो असतो. पण आपण हे पहिल्यांदाच केलंय त्यामुळे दुःख करण्याचं काही कारणही नाहीये."
चीनचा आक्रमक वेग आणि त्यांनी केलेल्या प्रगतीवर ते म्हणाले, "चीनशी तुलना करताना आपल्याला आपल्या पूर्ण इकोसिस्टमवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. चीन तर अमेरिका आणि ब्रिटनपेक्षाही वेगाने प्रगती करतोय."
विक्रांतच्या निर्मितीमुळे या संस्थेचा आत्मविश्वास वाढलाय. त्यामुळे आता ते मोठी क्षमता असलेल्या प्रकल्पात गुंतवणूक करत आहेत.
यावर नायर सांगतात, "आम्ही आता एका नव्या डॉकमध्ये गुंतवणूक करतोय. या डॉकमुळे भारतात पुढच्या जनरेशनचे एअरक्राफ्ट तयार होतील. 2024 मध्ये हे तयार होतील. आम्हाला वाटतं की यासाठी लवकरच मंजुरी मिळेल. जर असं झालंच तर त्याची डिलिव्हरी सुद्धा लवकरच देता येईल."
विक्रांतच्या निर्मितीसाठी 20 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.
या युद्धनौकेवर असलेल्या 76 टक्के वस्तू इंडियन मेड आहेत. सुमारे 500 भारतीय कंपन्यांनी या कामात सहभाग घेतला. या युद्धनौकेच्या निर्मितीकडे भारतीय संरक्षण क्षेत्रातील गुंतवणूक म्हणून पाहिलं जातंय. सरकारच्या मते, सलग 13 वर्षं चाललेल्या या युद्धनौका बांधणीतून 15000 रोजगाराची निर्मिती झाली.
आकडेवारी बाजूला ठेवत सीएसएलच्या जनरल मॅनेजर डिझाईन अंजना केआर या प्रवासाला भावनात्मक प्रवासाची सुरुवात असल्याचं सांगतात.
अंजना केआर पुढे सांगतात, "मी 2009 पासून या मटेरियल डिपार्टमेंटमध्ये डिझायनिंगचं काम पाहते आहे. युद्धनौकेवर लागणाऱ्या महत्त्वपूर्ण वस्तूंच्या खरेदीतही माझा सहभाग होता. हे काम खूप आव्हानात्मक होतं. कधी कधी सगळे मार्ग बंद झालेत असं वाटायचं. पण भारतीय नौदलाने दिलेल्या साथीमुळे आम्ही इथवरचा प्रवास पूर्ण करू शकलो."
2013 साली पहिल्यांदाच विक्रांतची ट्रायल घेण्यात आली. तेव्हापासून ते आजपर्यंत जेवढ्या काही ट्रायल्स झाल्या त्या आम्ही आई - वडिलांच्या भावनेने अगदी जवळून पहिल्या.
चेहऱ्यावर मोठं हसू आणत अंजना सांगतात, "ही युद्धनौका अगदी माझ्या मुलींसारखी आहे. याला बऱ्याच वर्षांपासून आम्ही तयार केलंय, अगदी लहान मुलांना मोठं करतात तसं. सिंगल लाईनच्या एका डिजाईनपासून ते आता मोठं जहाज बनलं आहे. आता सगळं जग ही युद्धनौका बघेल. मुलीचं लग्न होऊन ती जेव्हा सासरी जाते तसा काहीसा अनुभव मला या युद्धनौकेच्या बाबतीत आला. आता नौदलाने याची नीट काळजी घ्यावी म्हणजे झालं."