शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (19:40 IST)

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मुख्यालयाचा पत्ता बदलला?

uddhav eaknath shinde
दीपाली जगताप
 
शिवसेना पक्षावर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय वारसा हक्कावर दावा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आपल्या गटाचं तात्पुरतं मध्यवर्ती कार्यालय जाहीर केल्याचं दिसतं.
 
मुंबईतील दादर येथील 'शिवसेनाभवन हे शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय आहे. पण आतापर्यंत शिवसेनेच्या प्रत्येक संघटनात्मक कामासाठी वापरला जाणारा 'सेनाभवनचा' पत्ता न वापरता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या लेटरहेडवर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता बदललेला दिसतो.
 
हे प्रकरण नेमकं काय आहे? एकनाथ शिंदे यांनी 'प्रति शिवसेना भवन' सुरू केलंय का? शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयावरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात नव्या वादाला तोंड फुटणार का? आणि ठाणं हे नवीन राजकीय सत्ताकेंद्र बनतंय का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
 
शिंदे गटाचं 'प्रति शिवसेना भवन'?
एकनाथ शिंदे यांच्याकडून 27 ऑगस्ट 2022 रोजी एक नियुक्ती पत्र माध्यमांना देण्यात आलं. या पत्रावरील पत्त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यामुळेच नव्या चर्चेला सुरूवात झाली.
 
हे पत्र आहे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांची मुंबई 'विभाग-11 प्रमुखपदी' नियुक्ती केल्याचं.
 
शिवसेनेच्या लेटरहेडवर हे पत्र लिहिलेलं असून यात म्हटलंय की, 'शिवसेना मध्यवर्ती कार्यालय - आनंदआश्रम, श्री भवानी चौक, टेंभी नाका, ठाणे (पश्चिम)-1.
 
महत्त्वाचं म्हणजे या पत्रावर मुख्यनेते या पदाचा उल्लेख असून एकनाथ शिंदे यांची मुख्यनेता, शिवसेना म्हणून स्वाक्षरी आहे.
 
यापूर्वी शिंदे गटातील माहीमचे आमदार सदा सरवणकर यांनी नवीन शिवसेना भवन दादर येथे उभारलं जाईल असं वक्तव्य केलं होतं.
 
दादर येथे स्वतंत्र शिवसेना भवन स्थापन करणार असं ते म्हणाले होते. सदा सरवणकर याबाबत म्हणाले होते की, "दादर येथे येत्या 15-20 दिवसांत शिंदे गटाचं हे कार्यालय सुरू करण्यात येईल. तसंच एकनाथ शिंदे प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय सुरू करणार असून, त्यापैकी मुंबईचं कार्यालय दादर परिसरात असेल."
 
दरम्यान, ठाण्यात टेंभी नाका येथील आनंद दिघे यांच्या कार्यालयाला आनंद आश्रम असं म्हटलं जातं. याच आनंद आश्रमचा उल्लेख आता एकनाथ शिंदे यांच्या पत्रात मध्यवर्ती कार्यालय, शिवसेना म्हणून करण्यात आला आहे.
 
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून ते दोन नेत्यांची नावं प्रामुख्याने घेतात. पहिलं नाव म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दुसरं नाव म्हणजे ठाण्याचे शिवसेनेचे नेते आणि जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांचं.
 
त्यामुळे ठाण्यात आनंद आश्रम या जागेला राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. परंतु आनंद आश्रम हे शिंदे गटाचं मुख्यालय असणार आहे का? याबाबत एकनाथ शिंदे किंवा गटातील इतर प्रवक्त्यांकडून कोणतीही घोषणा झालेली नाही.
 
शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आमचं मुख्यालय हे दादर इथेच असणार आहे. त्याचं काम सुरू आहे. काम पूर्ण होईपर्यंत आम्ही टेंभी नाका हा पत्ता वापरत आहोत. त्यामुळे तोपर्यंत टेंभी नाका हे आमचं मुख्यालय असणार आहे."
 
शिंदे गटाच्या या पक्ष बांधणीच्या हालचालींवर आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिलीय.
 
प्रत्येक जिल्ह्यात शिंदे गटाची शाखा असणार आहे याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "माझ्या मतदारसंघात तरी अशी कुठली शाखा सुरू झालेली नाही. नवीन दुकान आल्यावर सर्वांना उत्सुकता तर असते. त्यामुळे सगळे फेरफटका मारायला जातात. पुन्हा जुन्या दुकानात येतातच," असा टोला त्यांनी लगावला.
 
शिंदे आणि ठाकरे गटाच्या या हालचालींचा राजकीय अर्थ काय?
एकाबाजूला उद्धव ठाकरे पक्षबांधणीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दुसऱ्याबाजूला शिंदे गटालाही आपली बाजू मजबूत करायची आहे.
 
एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकतीच एक महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी शिंदे गटाकडून पाच विभागप्रमुख आणि तीन महिला संघटकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात मुंबईसाठी पाच विभागप्रमुख तर तीन विभाग संघटकांना पक्ष बांधणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 
दादर-माहीम वडाळा या विभाग क्रमांक 10 मधून गिरीश धानूरकर यांची विभागप्रमुखपदी तर प्रिया गुरव यांची विभागसंघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
तर भांडुप विक्रोळी, मुलुंड या विभाग क्रमांक 7 मधून माजी आमदार अशोक पाटील यांची विभागप्रमुखपदी तर राजश्री मांदविलकर यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
या घडामोडींवरून हे स्पष्ट आहे की आपल्या गटाचा विस्तार करण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
 
उद्धव ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वीच संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्याचं जाहीर केलं. याशिवाय, शिवसेना नेते लीलाधर डाके यांचे पुत्र पराग डाके यांची शिवसेनेच्या सचिवपदी उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली आहे. तसंच, खासदार अरविंद सावंत आणि चिपळूणचे आमदार भास्कर जाधव यांची शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती केली आहे.
 
शिवसेना पक्षप्रमुख या पदानंतर पक्षातलं हे दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे. या तिन्ही नियुक्त्याचं पत्र शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय शिवसेना भवन येथून जारी करण्यात आलं आहे.
 
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले, "ही सगळी तयारी निवडणूक आयोगात होणाऱ्या युक्तिवादासाठी केली जात आहे. मुख्यनेते-शिवसेना या पदाचा उल्लेख यापूर्वीही एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या पत्रात केला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा केला आहे. केवळ दोन तृतीयांश आमदार नाही तर संपूर्ण पक्ष आपला असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे."
 
उद्धव ठाकरे यांनी हा दावा फेटाळला आहे. शिवसेनेचे आमदार शिंदे गटात सामील झाले याचा अर्थ संपूर्ण पक्ष त्यांचा आहे असा होत नाही असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.
 
पदाधिकारी, आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ते अशा सर्वांचा मिळून पक्ष बनतो. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्याकडून विविध पदांवर नेत्यांच्या नियुक्त्या होत आहेत असंही अभय देशपांडे सांगतात.
 
ते पुढे म्हणाले, "यासंदर्भातील पुढील निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून येईल परंतु सुनावणी इतक्यात झाली नाही तर निवडणूक आयोग आपला स्वतंत्र निर्णय घेऊ शकतं. अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोग अंतरिम निर्णय जाहीर करू शकतं. तसंच, निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय सुद्धा आयोगाकडून घेतला जाऊ शकतो."
 
शिवसेना भवनाचं महत्त्व
शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाली. 1974 साली दादरमध्ये शिवसेनाभवन झाले. मधली दोन वर्षं शिवसेनेचे कार्यालय पर्ल सेंटरच्या दोन खोल्यांमध्ये होते. तिथंच शिवसेनाप्रमुख सर्वांना भेटत असत. सेनाभवन होण्यापूर्वी शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान हे सुद्धा कार्यालयासारखंच वापरलं जाई.
 
शिवसेना भवनाचे समारंभपूर्वक उद्घाटन 19 जून 1977 रोजी झाले. या पहिल्या वास्तूच्या उद्घाटनाच्यावेळेस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, "शिवसेना भवन ही शिवसैनिकांची हक्काची वास्तू आहे. तिचे आम्ही केवळ राखणदार आहोत. या वास्तूचं पावित्र्य प्रत्येकानं राखलं पाहिजे. हे भवन महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलायला लावीलच पण त्याचबरोबर हे एक सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र बनलं पाहिजे असा माझा आग्रह आहे."
 
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठीही शिवसेना भवन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सेनाभवनाशी शिवसैनिकांचं भावनिक नातं आहे.
 
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही शिवसैनिकांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी शिवसेना भवन गाठलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनीही पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठका शिवसेना भवन येथे घेतल्या.
 
ठाकरे आणि पवारांचा ठाण्यात दौरा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात 29 ऑगस्टला दिवसभर बैठका घेतल्या. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका यावेळी पार पडल्या.
 
शरद पवार आगामी काळात राज्याचा दौरा करणार असून त्यांनी ठाण्यापासूनच आपल्या या दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले, "पुण्यानंतर सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ ठाण्यात आहेत. त्यामुळे त्यादृष्टीने ठाणे महत्त्वाचं आहे."
 
शरद पवार यांच्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा आपल्या महाप्रबोधन दौऱ्याची सुरुवात ठाण्यापासून करणार आहेत. टेंभी नाका इथेच उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.
 
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि त्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात कामाला सुरूवात केलीय.
 
शिवसेनेला मुंबईआधीही ठाण्याने सत्ता मिळवून दिली होती आणि आता बंडाची सुरुवातही ठाण्यापासून झालीय. त्यामुळे ठाणे आता सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचं आहे.
 
राजकीय विश्लेषक सांगतात, 'आनंद दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आपला चांगला जम बसवला. किमान दोन पिढ्यांना तरी एकनाथ शिंदे यांनी जवळून पाहिलं आहे. ठाण्यातल्या मतदारांचं आनंद दिघे यांच्याशी भावनिक नातं आहे जसं मुंबईत बाळासाहेब ठाकरेंबाबत आपल्याला दिसतं. एकनाथ शिंदे यांनी त्यांचं राजकीय काम पुढे नेलं शिवाय बंड होण्यापूर्वी त्यांनी त्यांच्यावर धर्मवीर हा सिनेमा आणला. त्यामुळे आनंद दिघे यांचे राजकीय वारसदार आपण आहोत ही प्रतिमा ठाणेकरांसमोर तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.'