बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 10 जून 2019 (10:58 IST)

दुष्काळ : पाण्यासाठी हाणामारी व्हायची म्हणून आता या गावात रेशनकार्डावरच पाणी दिलं जातं

पाण्यासाठी गावकरी धावत्या टँकरवर चढायचे. कधी हाणामारीही व्हायची.
 
यात कोणाचा अपघात व्हायची किंवा कोणाला तरी इजा व्हायची शक्यता होती म्हणूनच आता बुलडाण्यातल्या चिंचोली गावात रेशनकार्ड आणि कुटुंबाचं कार्ड तयार करून प्रत्येकी 200 लिटर पाणी दिलं जातं.
 
बुलडाणा जिल्ह्यातल्या सगळ्याच धरणांनी तळ गाठलाय. मोठी, मध्यम, लघु अशा 70 टक्के धरणांमध्ये पाणीसाठा शून्यावर गेला आहे.
 
याच भागात अनेक वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसणारं चिंचोली गाव आहे. या गावात पाण्याची स्थिती इतकी गंभीर झाली आहे की तिथे आता रेशन कार्डानुसार पाणीवाटप केलं जातं.
 
गावात पहाटे 5 वाजता पाण्याचा टँकर येतो. तेव्हापासून चिंचोली गावच्या मीरा दाबेराव पाण्यासाठी बाहेर पडतात. हातात मावतील तेवढी भांडी आणि डोक्यावर कळशी घेऊन लांबलचक रांगेत त्या पाण्याची वाट पाहत बसतात. पण अनेकदा त्यांचा नंबर येईपर्यंत पाणी संपून जातं आणि त्यांना रिकाम्या हात परतावं लागतं.
 
मीरा सांगतात, "दुष्काळामुळे आमची काही जनावरं आम्ही विकली आहेत तर काहींना आमच्या नातेवाईकांकडे पाठवलं आहे. गावातल्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गावात दिवसाला दोन टँकर येतात, त्यांच्यावरच सगळी भिस्त असते. कधी कधी रेशनचा नंबर येईपर्यंत पाणी संपून जातं."
 
पुढे बोलताना त्या म्हणतात "काही दिवसांपूर्वी राजकीय नेत्यांनी या भागात दुष्काळ दौरा केला होता. त्यांनी पाणी मिळेल अशी आश्वासनं दिली पण इथला पाण्याचा प्रश्न सुटला नाही. आमच्या गावामध्ये पाणी देण्याचं आश्वासन देणाऱ्यांना आम्ही मतदान करतो. पण प्रत्येक वेळी पोकळ आश्वासनच पदरी पडत असेल तर पाणी मागायचं तरी कोणाकडे असा प्रश्न आम्हाला पडलाय."
 
'पुरेसे टँकर नाहीत'
 
चिंचोली गावाची लोकसंख्या 3560 आहे. एवढ्या लोकसंख्येसाठी दिवसातून 2 टँकर अपुरे पडतात.
 
सकाळी साडेपाच आणि दुपारी बारा वाजता गावामध्ये पाण्याचा टँकर येतो. शेतकऱ्यांना दुपारी कामाची लगबग असते. पण तरीही त्यांना सगळी कामं सोडून टँकरची वाट बघावी लागते. ठरल्या वेळेवर टँकर येत नाही म्हणून गावकऱ्यांना तासनतास ताटकळावं लागतं.
 
ग्रामस्थ रमेश वानखडे त्यापैकीच एक आहे. पाण्याचा टँकर आला की त्यांना शेतातलं काम सोडून यावं लागतं. ते म्हणतात, "सलग पाच वर्षांपासून गावामध्ये पाण्याची टंचाई आहे. गावाला टँकरने होणारा पाणीपुरवठा पुरेसा नाही. गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी दिवसाला किमान 4 ते 5 टँकरची आवश्यकता आहे. पण आमच्या नशिबी दोनच टँकर आहेत. एका कुटुंबाला मिळणारं पाणी त्यांच्या गरजेच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यात गुरंढोरं कशी जगवायाची हा प्रश्न आहे."
 
रमेश वानखडे यांनीही त्यांची गुरढोर नातेवाईकांकडे सोपवली आहेत. पण त्यांच्याजवळ असणारी जनावरं जगवण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागतेय.
 
ते सांगतात, "पाणी नसल्याने अनेक जनावरांचा मृत्यू झालाय. तर अनेक जनावरं मरणाच्या दारात आहेत. दोन-तीन महिन्यांपूर्वी टँकर गावामध्ये शिरताच पाण्यासाठी भांडण व्हायची. हाणामाऱ्याही झाल्या. म्हणून सरपंचांनी रेशनकार्डावर पाणीवाटप करण्याचा निर्णय घेतला. आता भांडण कमी झालीत पण नंबर येईपर्यंत पाणी संपून जातं."
 
चिंचोली गावाचे रहिवासी सखाराम भांजवधेंनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "दोन वर्षांपासून टँकर सुरू झालेत. गावापासून 4 किलोमीटर अंतरावर धरणातल्या पाण्याची पाईपलाईन आलेली आहे. तीच पाईपलाईन गावापर्यंत आली तर पाण्याची समस्या दूर होईल."
 
सरपंच संजय इंगळे यांनी रेशनकार्डावर पाणीवाटपाची संकल्पना अमलात आणली आहे.
 
"गावामध्ये खूप दुष्काळ असल्याने शासनाने टँकर मंजूर केले. पण तीन महिन्यांपासून पाण्यासाठी नागरिक चालत्या टँकरवर चढत होते. पाण्यामुळे कुणाचा अपघात होऊ नये म्हणून रेशनकार्ड आणि कुटुंबाचं कार्ड तयार करून प्रत्येकी 200 लिटर पाणी देण्याचं आम्ही ठरवलं," इंगळे सांगतात.
 
गावात 11 हातपंप आणि 5 सरकारी विहिरी आहे. पण हे सगळे कोरडेठाक पडलेत असंही इंगळे सांगतात.
 
गावापासून जवळच वाण धानोडी धरणप्रकल्प आहे. या प्रकल्पातून पाणी मिळावं यासाठी गावकरी आग्रही आहोत. त्यासाठी त्यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
 
सरपंच संजय इंगळे यांनी गावाला धानोडी धरणाचं पाणी मिळावं यासाठी 'संवादसेतू' या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे.  

नितेश राऊत